नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत ‘एनडीए’ला बहुमत मिळाले तरी आता सर्व लक्ष लोकसभा अध्यक्षाच्या निवडणुकीकडे लागले आहे. रालोआतील तेलुगू देसमने लोकसभा अध्यक्षपदाची मागणी केली तरीही भाजप हे पद आपल्याकडे ठेवणार असल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे या निवडणुकीत ‘इंडिया’ आघाडी आपला उमेदवार उतरवण्याची चाचपणी करत आहे.
यंदाच्या निवडणुकीत भाजपला बहुमत न मिळाल्याने त्यांना रालोआ व जदयूची मदत घ्यावी लागली. त्यामुळे केंद्रातील रालोआ सरकारची धाकाधूक वाढीस लागली आहे. लोकसभेतील उपाध्यक्ष पद ‘इंडिया’ आघाडीला न दिल्यास लोकसभा अध्यक्षपदासाठी आपला उमेदवार रिंगणात उतरवण्याची तयारी सुरू आहे. १८ व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन २४ जूनपासून सुरू होत आहे. २६ जून रोजी लोकसभा आपल्या नवीन लोकसभा अध्यक्षाची निवड करेल. त्यामुळे विरोधी पक्षही सभापतींच्या निवडणुकीत आपला उमेदवार उभा करू शकतात, असे बोलले जात आहे. विरोधी पक्षांना उपाध्यक्षपद न दिल्यास ते अध्यक्षपदासाठी आपला उमेदवार देऊ शकतात. यासंदर्भातील अंतिम निर्णय संसदेचे अधिवेशन सुरू होण्यापूर्वी घेण्यात येऊ शकतो.