क्रीडा

क्रीडारसिकांसाठी पर्वणी!

ट्वेन्टी-२० विश्वचषक, फिफा विश्वचषक या स्पर्धाही होणार असल्याने एकूणच आगामी काळ क्रीडारसिकांसाठी पर्वणी ठरणार आहे.

ऋषिकेश बामणे

जगभरातील क्रीडारसिकांसाठी ऑगस्ट महिना मनोरंजनाच्या खमंग मेजवानीचा ठरत आहे. महिन्याच्या सुरुवातीला बर्मिंगहॅम येथील राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय क्रीडापटूंच्या यशाचे साक्षीदार झाल्यानंतर आता चाहत्यांना क्रिकेटमधील आशिया चषक क्रिकेट आणि टेनिसमधील अमेरिकन ओपन या दोन महत्त्वाच्या स्पर्धांचे वेध लागले आहेत. त्याशिवाय पुढील काही महिन्यात ट्वेन्टी-२० विश्वचषक, फिफा विश्वचषक या स्पर्धाही होणार असल्याने एकूणच आगामी काळ क्रीडारसिकांसाठी पर्वणी ठरणार आहे.

तूर्तास रविवार, २८ ऑगस्ट या दिवसाकडे भारतीय क्रीडाप्रेमी लक्ष ठेवून आहेत. दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारत-पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी आशिया चषकात आमनेसामने येणार आहेत. जवळपास वर्षभराच्या अवधीने या दोन मातब्बर संघांमधील झुंज अनुभवायला मिळणार असल्याने एव्हाना या लढतीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. गतवर्षी पाकिस्तानने ट्वेन्टी-२० विश्वचषकात भारताला १० गडी राखून सहज धूळ चारली होती. विशेष म्हणजे त्यावेळीसुद्धा संयुक्त अरब अमिराती म्हणजेच यूएईमध्येच हे दोन संघ एकमेकांविरुद्ध उभे ठाकले होते. यंदा आशिया चषकही तिकडेच होत असल्याने भारताला त्या पराभवाची परतफेड करण्याची संधी आहे. उभय संघ आशिया चषकात आतापर्यंत १४वेळा आमनेसामने आले असून भारताने आठ, तर पाकिस्तानने पाच लढतींमध्ये विजय मिळवला आहे. एक लढत रद्द करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे भारताने २०१८मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली सर्वाधिक सातव्यांदा आशिया चषक उंचावला होता. त्यावेळी पाकिस्तानला भारताने सहज नमवले होते. यंदा मात्र पुन्हा ट्वेन्टी-२० स्वरुपात आशिया चषक खेळवण्यात येत असून आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या दृष्टीने या स्पर्धेचे जेतेपद मिळवणे भारतासाठी मौल्यवान ठरणार आहे. मूळात पाकिस्तानविरुद्ध कोणत्याही क्षेत्रातील झुंज असले तरी भारतीय पाठिराख्यांना विजयच हवा असतो. त्यामुळे आशिया चषक भारतीय संघ जिंकेल की नाही, हे गुलदस्त्यात असले तरी पाकिस्तानविरुद्ध आपले खेळाडू विजयाचा ध्वज नक्की उंचावतील, अशी अपेक्षा आहे.

दुसरीकडे टेनिसप्रेमींसाठी अमेरिकन ओपन स्पर्धासुद्धा तितकीच जिव्हाळ्याची. चार प्रतिष्ठित ग्रँडस्लॅम स्पर्धांपैकी एक म्हणून ओळखली जाणारी हार्ड कोर्टवरील स्पर्धा २९ ऑगस्टपासून सुरू होईल. यामधून भारताच्या सानिया मिर्झाने आधीच दुखापतीमुळे माघार घेतली असल्याने प्रामुख्याने दुहेरीत रोहन बोपण्णावर भारतीय चाहत्यांच्या नजरा खिळतील. एकेरीच्या पात्रता लढती अद्याप सुरू असल्याने सुमित नागल, रामकुमार रामनाथन, युकी भाम्ब्री आणि प्रज्ञेश गुणेश्वरन यांच्यापैकी एखादा मुख्य फेरीत मजल मारण्याची कमाल करणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

पीट सॅम्प्रस, बोरिस बेकर, आंद्रे आगासी, स्टेफी ग्राफपासून ते रॉजर फेडरर, राफेल नदाल, नोव्हाक जोकोव्हिच, सेरेना विल्यम्स यांसारख्या खेळाडूंचा वारसा लाभलेल्या टेनिस क्रीडाप्रकारालाही कोरोना काळात मोठा फटका बसला. परंतु यंदाच्या वर्षातील ऑस्ट्रेलियन, फ्रेंच आणि विम्बल्डन या ग्रँडस्लॅम स्पर्धांना चाहत्यांचा उदंड प्रतिसाद लाभला. त्यामुळे अमेरिकन ओपनमध्येही रोमांच अनुभवायला मिळेल, अशी आशा आहे. स्पेनच्या राफेल नदालला जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात असले तरी जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेल्या नोव्हाक जोकोव्हिचकडून कडवी झुंज मिळू शकते. मात्र जोकोव्हिचच्या स्पर्धेतील समावेशाबाबत अद्याप संभ्रम कायम आहे. तसेच गतविजेता डॅनिल मेदवेदेव आणि ग्रीसचा स्टेफानोस त्सित्सिपास यांना कमी लेखणे चुकीचे ठरेल. महिलांमध्ये मात्र सेरेनाला विक्रमी २४वे ग्रँडस्लॅम पटकावण्यासाठी सर्वस्व पणाला लावावे लागेल. सेरेनाची ही अखेरची ग्रँडस्लॅम स्पर्धा असेल. तिला सिमोना हॅलेप, बार्बोरा क्रेजिकोव्हा, नाओमी ओसाका या खेळाडूंकडून कडवी झुंज मिळेल.

क्रिकेट आणि टेनिस वगळता रविवारीच जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेचा अंतिम सामनासुद्धा रंगणार आहे. भारताचा एस. एस. प्रणॉय एकेरीत, तर दुहेरीत चिराग-साित्त्वकची जोडी अंतिम फेरीत धडक मारण्यासह पदक पटकावून भारतासाठी हा दिवस आणखी विशेष करणार का, याकडे तमाम देशवासियांचे लक्ष लागले आहे.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी