चॅम्पियन्सच्या किताबासाठी आज दुबईत महासंग्राम; १२ वर्षांनी जेतेपद मिळवण्याचे भारताचे लक्ष्य; झुंजार वृत्तीच्या न्यूझीलंडशी गाठ X-@musti24606
क्रीडा

चॅम्पियन्सच्या किताबासाठी आज दुबईत महासंग्राम; १२ वर्षांनी जेतेपद मिळवण्याचे भारताचे लक्ष्य; झुंजार वृत्तीच्या न्यूझीलंडशी गाठ

दुबई : चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत आतापर्यंत प्रतिस्पर्धी संघांना धूळ चारत अपराजित राहिलेला भारतीय संघ जेतेपदासाठी रविवारी न्यूझीलंडशी भिडणार आहे. संयुक्त अरब अमिरातीतील दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या लढतीत चॅम्पियन्सचा किताब मिळवण्याचे लक्ष्य ठेवून दोन्ही संघ मैदानात उतरतील. हा सामना जिंकून १२ वर्षांचा विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न रोहित सेनेचा असेल.

Swapnil S

दुबई : चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत आतापर्यंत प्रतिस्पर्धी संघांना धूळ चारत अपराजित राहिलेला भारतीय संघ जेतेपदासाठी रविवारी न्यूझीलंडशी भिडणार आहे. संयुक्त अरब अमिरातीतील दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या लढतीत चॅम्पियन्सचा किताब मिळवण्याचे लक्ष्य ठेवून दोन्ही संघ मैदानात उतरतील. हा सामना जिंकून १२ वर्षांचा विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न रोहित सेनेचा असेल.

सलग तिसऱ्यांदा आणि एकंदर पाचव्यांदा चॅम्पियन ट्रॉफीची अंतिम फेरी गाठणाऱ्या भारतीय संघाला १२ वर्षांनी पुन्हा एकदा ही स्पर्धा जिंकण्याची सुवर्णसंधी आहे. २००२ मध्ये सौरव गांगुली, तर २०१३ मध्ये महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी उंचावली होती. २०१७ मध्ये भारताला अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागला. त्यानंतर आता ८ वर्षांनी आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत भारताला पुन्हा एकदा जेतेपद खुणावत आहे. २००० मध्ये न्यूझीलंडने भारताला चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत धूळ चारली होती. त्याचा वचपा घेण्याचे भारताचे ध्येय असेल. आतापर्यंत स्पर्धेत अपराजित राहिलेल्या भारताने साखळी स्पर्धेत अनुक्रमे बांगलादेश, पाकिस्तान, न्यूझीलंड या संघांना नमवले. तर उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचा अडथळा ओलांडून भारताने अंतिम फेरीत धडक मारली.

दुसरीकडे मिचेल सँटनरच्या नेतृत्वात खेळणाऱ्या न्यूझीलंडने तिसऱ्यांदा अंतिम फेरी गाठली आहे. कोणत्याही आयसीसी स्पर्धेमध्ये किमान उपांत्य फेरी गाठणारा संघ अशी न्यूझीलंडची ओळख आहे. भारताविरुद्ध या संघाने नेहमीच चांगली कामगिरी केली आहे. अ-गटातून दुसऱ्या स्थानासह आगेकूच करणाऱ्या न्यूझीलंडला साखळी फेरीत भारताकडून पराभव पत्करावा लागला. मात्र यावेळी ते अधिक तयारीनिशी मैदानात उतरतील. उपांत्य सामन्यात किवी संघाने दक्षिण आफ्रिकेवर मात केली. वर्ष २००० मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या न्यूझीलंडला २००९ मध्ये उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्यामुळे आता दुसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकण्याचे किवी संघाचे लक्ष्य असेल.

विराटसह फलंदाजी लयीत

भारताची फलंदाजी या स्पर्धेत उत्तम लयीत आहे. विराटने भारतासाठी स्पर्धेत सर्वाधिक धावा केल्या आहेत. मधल्या फळीत मुंबईकर श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, के. एल. राहुल व हार्दिक पंड्या सातत्याने योगदान देत आहेत. शुभमन गिल व रोहितची बॅट गेल्या काही सामन्यांपासून शांत आहे. त्यामुळे त्यांच्याकडूनही धडाकेबाज सलामीची अपेक्षित आहे. अक्षर पटेल व रवींद्र जडेजा मधल्या फळीत उपयुक्त योगदान देत आहेत. त्यामुळे भारताचे फलंदाजी खोलवर पसरलेली आहे.

शमी आणि फिरकीपटूंवर भिस्त

स्पर्धेत मोहम्मद शमीने भारतासाठी आतापर्यंत सर्वाधिक बळी मिळवले आहेत. त्याला दुसरा वेगवान गोलंदाज म्हणून हार्दिक पंड्या उत्तम साथ देत आहे. मात्र मुख्य लक्ष हे भारतीय फिरकीपटूंवर असेल. वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव या फिरकी जोडीपासून किवींना सावध राहावे लागेल. मधल्या षटकांत अक्षर, जडेजा बळी घेण्यासह धावांवर अंकुश ठेवत आहेत.

विल्यम्सन, रचिनला रोखण्याचे आव्हान

न्यूझीलंडच्या फलंदाजीची भिस्त प्रामुख्याने रचिन रवींद्र, केन विल्यम्सन यांच्यावर आहे. या दोघांनीही उपांत्य फेरीत शतके झळकावली होती. त्याशिवाय विल यंग, डॅरेल मिचेल व टॉम लॅथम हे सुद्धा उत्तम लयीत आहेत. वेगवान गोलंदाज मॅट हेन्रीबाबत संभ्रम कायम आहे. उपांत्य सामन्यात हेन्रीच्या खांद्याला दुखापत झाली होती. सँटनर आणि मिचेल ब्रेसवेल यांच्यावर फिरकीची मदार आहे. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करून २६० ते २८० धावा केल्या, तर ते नक्कीच भारताला कडवी झुंज देतील.

अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास

भारत

जागतिक क्रमवारीतील स्थान : १

साखळी फेरी

वि. बांगलादेश (६ गडी राखून विजयी)

वि. पाकिस्तान (६ गडी राखून विजयी)

वि. न्यूझीलंड (४४ धावांनी विजयी)

उपांत्य फेरी

वि. ऑस्ट्रेलिया (४ गडी राखून विजयी)

सर्वाधिक धावा

विराट कोहली (४ सामन्यांत २१७ धावा)

सर्वाधिक बळी

मोहम्मद शमी (४ सामन्यांत ८ बळी)

खेळपट्टी आणि वातावरण

दुबईच्या खेळपट्टीवर दव येत नसल्याने येथे फिरकीपटू दोन्ही डावांत प्रभावी ठरू शकतात. नाणेफेकीचा कौल फारसा निर्णायक ठरणार नाही. तसेच खेळपट्टी कशा पद्धतीने तयार केली जाईल यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून असतील.

चॅम्पियन्स ट्रॉफीतील दुबईत झालेल्या यंदाच्या ४ सामन्यांपैकी ३ वेळा धावांचा पाठलाग करणारा संघ जिंकला आहे. मुख्य म्हणजे येथे फक्त एकदाच प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने २५० धावांचा पल्ला गाठला आहे.

दिवसभर येथे २५ ते ३० डीग्री सेल्सिअसमध्ये तापमान राहील. पावसाची अजिबात शक्यता नसल्याने दर्जेदार लढत अपेक्षित आहे.

अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास

न्यूझीलंड

जागतिक क्रमवारीतील स्थान : ४

साखळी फेरी

वि. पाकिस्तान (६० धावांनी विजयी)

वि. बांगलादेश (५ गडी राखून विजयी)

वि. भारत (४४ धावांनी पराभूत)

उपांत्य फेरी

वि. दक्षिण आफ्रिका (५० धावांनी विजयी)

सर्वाधिक धावा

रचिन रवींद्र (३ सामन्यांत २२६ धावा)

सर्वाधिक बळी

मॅट हेन्री (४ सामन्यांत १० बळी)

भारत-न्यूझीलंड तिसऱ्यांदा एखाद्या आयसीसी स्पर्धेच्या अंतिम फेरीत आमनेसामने येतील. यापूर्वी २०००मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीच्या, तर २०२१मध्ये जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (डब्ल्यूटीसी) अंतिम फेरीत उभय संघ एकमेकांविरुद्ध उभे ठाकले होते. मात्र दोन्ही वेळेस न्यूझीलंडने भारतावर मात केली.

भारताने एकंदर पाचव्यांदा आणि सलग तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीची अंतिम फेरी गाठली. यापूर्वी २०००, २००२, २०१३ व २०१७ मध्ये भारताने अंतिम फेरीत धडक दिली होती. २००२ व २०२३मध्ये भारताने जेतेपद मिळवले, तर २००० व २०१७मध्ये पराभव पत्करावा लागला.

न्यूझीलंडने तिसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. २०००मध्ये भारताला अंतिम फेरीत नमवणाऱ्या न्यूझीलंडला २००९मध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला. आता दुसऱ्यांदा ट्रॉफी जिंकण्याचे किवींचे लक्ष्य आहे.

शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह कोणाचे ? १४ जुलैला सुनावणी

माऊलींच्या पालखीत 'माऊली'चा अपमान; चोपदाराने वारकरी महिलेला दिलं ढकलून| Video

बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमावर मस्तानी यांच्या वंशजाचा बहिष्कार

कोकणातील कातळशिल्पांचे जतन करा; मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

दीपिका पदुकोण 'हॉलिवूड वॉक ऑफ फेम'वर झळकणार; इतिहास रचणारी ठरली पहिली भारतीय अभिनेत्री