जोहान्सबर्ग : भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेच्या भूमीत संस्मरणीय टी-२० मालिका विजय साकारण्याची संधी आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ या चार लढतींच्या मालिकेत २-१ असा आघाडीवर आहे. त्यामुळे शुक्रवारी जोहान्सबर्ग येथे होणारा चौथा सामना जिंकून थाटात मालिका विजय साकारण्याचे भारतीय संघाचे लक्ष्य असेल.
२४ व २५ नोव्हेंबर रोजी आयपीएलची लिलाव प्रकिया होणार असून त्यापूर्वी संघमालकांचे लक्ष वेधण्याची संधी खेळाडूंना या मालिकेद्वारे लाभली. उभय संघांतील पहिल्या लढतीत भारताने सहज वर्चस्व गाजवले. संजू सॅमसनच्या शतकानंतर भारताच्या गोलंदाजांनी चमक दाखवी. दुसऱ्या लढतीत भारताला निसटता पराभव पत्करावा लागला. फिरकीपटू वरुण चक्रवर्तीने पाच बळी मिळवूनही फलंदाजीतील अपयश भारताला महागात पडले. तिसऱ्या सामत्यात मग तिलक वर्माचे पहिले झंझावाती शतक व मार्का यान्सेनच्या प्रहारानंतरही गोलंदाजांनी केलेल्या प्रभावी माऱ्यामुळे भारताने ११ धावांनी सरशी साधली. त्यामुळे आता सूर्यासेनेला मालिका विजय खुणावत आहे.
या लढतीत पुन्हा एकदा भारतीय फलंदाजांवर चाहत्यांचे लक्ष असेल. सॅमसनला गेल्या दोन लढतींमध्ये भोपळा फोडता आलेला नाही. त्यामुळे त्याच्याकडून पुन्हा मोठी खेळी अपेक्षित आहे. अभिषेक शर्माला सूर गवसला असला तरी सूर्यकुमारचा संघर्ष कायम आहे. २०२३मध्ये याच मैदानावर आफ्रिकेविरुद्ध सूर्यकुमारने अखेरचे आंतरराष्ट्रीय शतक झळकावले होते. टी-२० प्रकारात ४ शतके नावावर असलेल्या ३४ वर्षीय सूर्यकुमारने गेल्या ८ टी-२० सामन्यात एकच अर्धशतक झळकावले आहे. त्यामुळे त्याच्याकडून कामगिरीत सुधारणा अपेक्षित आहे.
दुसरीकडे एडीन मार्करमच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या आफ्रिकेलासुद्धा फलंदाजांचे अपयश सतावत आहे. हेनरिच क्लासेनला गेल्या लढतीत सूर गवसल्याने आफ्रिकेची चिंता काहीशी कमी झाली आहे. मात्र मार्करम, रीझा हेंड्रिक्स, रिकेलटन या आघाडीच्या फलंदाजांना छाप पाडता आलेली नाही. यान्सेनच्या रूपात आफ्रिकेला दमदार अष्टपैलू मिळाला आहे. वेगवान गोलंदाजी ही आफ्रिकेची ताकद असून जेराल्ड कोएट्झे, यान्सेन व अँडीले सिमलेन हे त्रिकुट धोकादायी ठरू शकेत. फिरकीपटू केशव महाराज व नकाबायोम्झी पीटर यांची जोडी उत्तम कामगिरी करत आहे. या लढतीत पावसाची मूळीच शक्यता नसून खेळपट्टी वेगवान गोलंदाजांसाठी पोषक असणार आहे.
रिंंकू, सूर्यकुमारचा संघर्ष कायम
सूर्यकुमारप्रमाणेच डावखुरा फलंदाज रिंकू सिंगचा (३ सामन्यांत २८ धावा) धावांसाठी संघर्ष सुरू असल्याने भारताची चिंता वाढली आहे. यशस्वी जैस्वाल संघात परतल्यावर सॅमसन किंवा अभिषेकपैकी एकाला संघाबाहेर करण्यात येईल, हे निश्चित. त्यातच तिसऱ्या क्रमांकावर यापुढेही तिलकला संधी देण्यात येणार असल्याचे समजते. अशा स्थितीत सूर्यकुमार व रिंकू यांच्यावरील दडपण वाढणार आहे. हार्दिक पंड्या, अक्षर पटेल व रमणदीप सिंग असे अष्टपैलू भारताच्या ताफ्यात असल्याने फलंदाजी खोलवर पसरलेली आहे.
अर्शदीप, वरुणवर गोलंदाजीची भिस्त
फिरकीपटू वरुण चक्रवर्तीला गेल्या लढतीत अपयश आले असले तरी त्यानेच या मालिकेत भारताकडून आतापर्यंत सर्वाधिक ८ बळी मिळवले आहेत. तसेच डावखुरा अर्शदीप सिंग लयीत आहे. हार्दिकची डेथ ओव्हर्समधील गोलंदाजी भारतासाठी चिंतेचा विषय आहे. रवी बिश्नोई, अक्षर हेसुद्धा फिरकीची धुरा वाहतील. रमणदीपच्या मध्यमगती गोलंदाजीचा भारतीय संघ वापर करू शकतो.
१७-१२ उभय संघांत झालेल्या ३० टी-२० सामन्यांपैकी भारताने १७, तर दक्षिण आफ्रिकेने १२ लढती जिंकल्या आहेत. एक सामना रद्द करण्यात आला होता. त्यामुळे आकडेवारीनुसार भारताचे पारडे जड असल्याचे दिसते.
भारत
सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, रिंकू सिंग, तिलक वर्मा, जितेश शर्मा, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रमणदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, विजयकुमार वैशाख, आवेश खान, यश दयाल.
दक्षिण आफ्रिका
एडीन मार्करम (कर्णधार), ओटनिल बार्टमन, जेराल्ड कोएट्झे, डोनोवन फरेरा, रीझा हेंड्रिक्स, मार्को यान्सेन, हेनरिच क्लासेन, पॅट्रिक क्रुगर, केशव महाराज, डेव्हिड मिलर, मिहलाली एमपोंग्वाना, नकाबायोम्झी पीटर, रायन रिकेलटन, अँडीले सिमलेन, ट्रिस्टन स्टब्स.