वेलिंग्टन : जगभरातील तमाम क्रीडाप्रेमींना मंगळवारी अभिषेक शर्माचा (३८ चेंडूंत ११३ धावा) रौद्रावतार पाहायला मिळाला. अभिषेकने अवघ्या ३५ चेंडूंत साकारलेल्या शतकाला वैभव सूर्यवंशीच्या (१९ चेंडूंत ४५) फटकेबाजीची सुरेख साथ लाभली. त्यामुळे भारताने वेलिंग्टन येथे मालिका विजयाभिषेक साजरा करताना तिसऱ्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडचा ६ गडी व ४० चेंडू राखून फडशा पाडला. भारताने दिवाळीपूर्वीच एकप्रकारे धूमधडाका केला, तर न्यूझीलंडचे मात्र दिवाळं निघाले.
वेलिंग्टनच्या हेन्री स्टेडियमवर झालेल्या या लढतीत न्यूझीलंडने दिलेले १९९ धावांचे लक्ष्य भारताने अवघ्या १३.२ षटकांत गाठले. याबरोबरच श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय संघाने न्यूझीलंडमधील टी-२० मालिकेत भारताचे वर्चस्व कायम राखले. अभिषेकने ९ चौकार व ११ षटकारांसह टी-२० कारकीर्दीतील चौथे शतक साकारले. वैभव व अभिषेक जोडीने ५ षटकांतच भारताचे शतक फलकावर लावून विजय पक्का केला. त्यामुळे भारताने पाच लढतींच्या मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतली. आता शुक्रवारी चौथी लढत खेळवण्यात येईल.
दरम्यान, एकीकडे भारतात नवरात्रोत्सव उत्साहात पार पडल्यानंतर आता दिवाळीचे वेध लागले असतानाच तिकडे भारतीय संघाच्या न्यूझीलंड वारीला २२ ऑक्टोबरपासून प्रारंभ झाला. न्यूझीलंडमधील मागील दोन टी-२० मालिकांमध्ये भारत अपराजित आहे. त्यामुळे अय्यरच्या नेतृत्वात भारत त्या कामगिरीची पुनरावृत्ती करणार का, याकडे लक्ष होते. अखेर त्यात भारताला यश आले. या दौऱ्यात ५ टी-२०, ५ एकदिवसीय व २ कसोटी सामन्यांचा समावेश आहे. आतापर्यंतच्या दोन्ही लढतींमध्ये भारताने अनुक्रमे ४ गडी राखून विजय मिळवताना अनुक्रमे २२६ व १८१ धावांचे लक्ष्य गाठले होते.
मंगळवारी झालेल्या तिसऱ्या सामन्यात डॅरेल मिचेलने ५२ चेंडूंत नाबाद ८९ धावांची शानदार खेळी करत न्यूझीलंडला २० षटकांत ३ बाद १९८ धावांपर्यंत पोहोचवले. फिनने २५ चेंडूंत ४०, तर बेव्हन जेकब्सने २३ चेंडूंत नाबाद ३९ धावा केल्या. फिन आणि मिचेल यांनी दुसऱ्या विकेटसाठी ८६ धावांची भागीदारी केली. मिचेल आणि जेकब्स यांनी चौथ्या विकेटसाठी आठ षटकांत ७५ धावा जोडल्या. भारताकडून अर्शदीप सिंग, नितीश रेड्डी, अक्षर पटेल यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला.
लक्ष्याचा पाठलाग करताना यावेळी संजू सॅमसनच्या जागी वैभवला अभिषेकसह सलामीला पाठवण्यात आले. हा निर्णय भलताच फलदायी ठरला. कारण या दोघांनी पहिल्या चेंडूपासूनच आक्रमण सुरू केला. जेकब डफीच्या पहिल्या षटकात भारताने २६ धावा वसूल केल्या. या धडाकेबाज फलंदाजीमुळे भारताने ५ षटकांत १०० धावांचा विक्रम केला आणि पॉवरप्लेमध्ये ११८ धावांची सर्वोच्च धावसंख्या उभारली. अभिषेक आणि वैभव यांनी पहिल्या विकेटसाठी ४३ चेंडूंत १३३ धावांची भागीदारी केली. फिशरने वैभवला बाद करून ही जोडी फोडली.
अभिषेकचा धडाका मात्र कायम राहिला. त्याने ३५व्या चेंडूवर शतक साकारले व मैदानात ध्यानस्थ मुद्रेत सेलिब्रेशन केले. ग्लेन फिलिप्सने अभिषेकला बाद केले, परंतु तोपर्यंत न्यूझीलंडचे खेळाडू पूर्णपणे खचले होते. सॅमसन (१८) व श्रेयस (५) स्वस्तात बाद झाल्यावर नमन धीरने (नाबाद ४) १४व्या षटकात विजयी चौकार लगावला. तिलक वर्मा १ धावेवर नाबाद राहिला.
आकडे चुकवू नका!
भारताने अवघ्या २.२ षटक म्हणजेच १४ चेंडूंत ५० धावा फलकावर लावल्या. टी-२० क्रिकेटमध्ये हे संयुक्त वेगवान अर्धशतक ठरले. कोलंबो किंग्ज संघाने २०२०च्या लंका प्रीमियर लीगमध्ये अशी कामगिरी केलेली.
अभिषेकने ३५ चेंडूंत शतक साकारले. भारतासाठी हे दुसऱ्या क्रमांकाचे वेगवान टी-२० शतक ठरले. सर्वात जलद शतकाचा विक्रमदेखील अभिषेकच्याच नावावर आहे. याच वर्षी १७ सप्टेंबरला अफगाणिस्तानविरुद्ध झालेल्या लढतीत अभिषेकने ३० चेंडूंत शतक साकारले होते.
भारताने पाच षटकांत १०० धावांचा टप्पा गाठला. सर्व प्रकारच्या टी-२० क्रिकेटमधील हा दुसरा सर्वात जलद १०० धावांचा टप्पा आहे. या यादीत अव्वल स्थानी स्वाटिनी हा संघ आहे, ज्यांनी या वर्षाच्या सुरुवातीला मोझांबिकविरुद्ध ४.५ षटकांत १०० धावा पूर्ण केल्या होत्या.
अभिषेक-वैभव यांनी टी-२० क्रिकेटमध्ये एखाद्या संघाकडून पॉवरप्लेमधील सर्वोत्तम अशी ११८ धावसंख्या नोंदवली. यापूर्वी हा विक्रम रोमानियाच्या (११६ वि. सर्बिया, २०२१) नावे होता.
१० षटकांच्या आत एखाद्या फलंदाजाने वैयक्तिक शतक साकारण्याची ही चौथीच वेळ ठरली. यामध्ये अभिषेकच्याच दोन शतकांचा समावेश आहे. अन्य दोन फलंदाज हे तुर्कीए व इस्टोनियाचे आहेत.
भारताने १३.२ षटकांत १९९ धावांचे लक्ष्य गाठले. टी-२० क्रिकेटमध्ये १९० पेक्षा अधिक धावांचे लक्ष्य इतक्या कमी षटकांत गाठण्याची ही दुसरी वेळ आहे. २०२४मध्ये इस्टोनियाने सायप्रसविरुद्ध १९२ धावांचे लक्ष्य १३ षटकांत गाठले होते.