एक्स @BCCI
क्रीडा

वानखेडेवर शर्माचा धावांचा अभिषेक! भारताचा इंग्लंडवर १५० धावांनी विजय

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर जमलेल्या दर्दी क्रीडाप्रेमींना रविवारी अभिषेक शर्माचा शतकी घणाघात पाहायला मिळाला.

ऋषिकेश बामणे

ऋषिकेश बामणे/मुंबई

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर जमलेल्या दर्दी क्रीडाप्रेमींना रविवारी अभिषेक शर्माचा शतकी घणाघात पाहायला मिळाला. अभिषेकने ५४ चेंडूंत १३५ धावांची शतकी खेळी साकारल्यामुळे भारताने इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या सामन्यात २० षटकांत ९ बाद २४७ धावांचा डोंगर उभारला. मग लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ १०.३ षटकांत अवघ्या ९७ धावांत गारद झाला. त्यामुळे भारताने १५० धावांनी धडाकेबाज विजय साजरा केला. तसेच मालिकेत ४-१ असे यश संपादन केले.

उभय संघांतील या मालिकेत भारतीय संघाने आधीच ३-१अशी विजयी आघाडी मिळवली होती. त्यामुळे वानखेडेवर प्रेक्षक मनोरंजनाच्या दृष्टीनेच आले होते. अभिषेकने चौकार षटकारांची आतषबाजी करताना चाहत्यांचे पुरेपूर मनोरंजन केले. त्याने भारतासाठी टी-२०तील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम नोंदवला. यापूर्वी शुभमन गिलने फेब्रुवारी २०२३ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध १२६ धावा केल्या होत्या; मात्र अभिषेकने रविवारी हा विक्रम मोडीत काढला.

प्रथम फलंदाजी करताना भारताने संजू सॅमसन (१६), सूर्यकुमार (२) यांना स्वस्तात गमावले; मात्र अभिषेकने तिलक वर्माच्या साथीने दमदार फटकेबाजी केली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ११५ धावांची भागीदारी रचली. तिलक २४ धावांवर बाद झाला. शिवम दुबेने तेरा चेंडूंत ३० धावा केल्या. हार्दिक पंड्या (९) व रिंकू सिंग (९ ) छाप पाडू शकले नाहीत. मात्र अभिषेकने तब्बल १३ षटकार ठोकताना भारताला २४७ धावांपर्यंत नेले. त्याने टी-२०कारकीर्दीतील दुसरे शतक झळकवले. मग मोहम्मद शमी आणि भारतीय फिरकीपटूंपुढे इंग्लंडचा संघ ढेपाळला. फिल सॉल्टने ५५ धावांची एकाकी झुंज दिली.

विरार-अलिबाग अंतर दोन तासांत पार होणार; मल्टिमॉडेल मार्गिकेला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

मराठा आंदोलनाचा विजय! अखेर मनोज जरांगे-पाटलांनी पाचव्या दिवशी उपोषण सोडले; राज्य सरकारकडून ८ पैकी ६ मागण्या मान्य

घटनेतील तरतुदींचे स्पष्टीकरण करणार, सर्वोच्च न्यायालयाची माहिती; राष्ट्रपती, राज्यपालांवर विधेयकावर कालावधीचे बंधन

चीनकडून भव्य लष्करी संचलनात अत्याधुनिक शस्त्रांचे आज प्रदर्शन

GST परिषदेची आज बैठक; दैनंदिन वापरातील वस्तूंवरील कर कमी होण्याची शक्यता