जयपूर : लोकेश राहुल दुखापतीतून सावरल्यानंतर आता लखनौ सुपर जायंट्सच्या नेतृत्वाची धुरा सांभाळण्यासाठी सज्ज झाला आहे. आता रविवारी राजस्थान रॉयल्सविरुद्ध होणाऱ्या पहिल्याच सामन्यात त्याच्या तंदुरुस्तीचा खरा कस लागणार आहे.
उजव्या पायाला वेदना होत असल्यामुळे राहुलला इंग्लंडविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांत खेळता आले नव्हते. त्याच्या मांडीवर शस्त्रक्रिया झाल्यानंतर गेल्या अनेक महिन्यांपासून तो भारतीय संघाबाहेर आहे. आता एक फलंदाज म्हणून नव्हे तर संघनायक म्हणूनही त्याच्याकडून दमदार कामगिरीची अपेक्षा लखनौला आहे. कारण गेल्या दोन मोसमात त्याने लखनौला प्ले-ऑफ फेरीपर्यंत पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका निभावली होती. त्याचबरोबर टी-२० वर्ल्डकप संघात स्थान मिळवण्याचे दडपणही त्याच्यावर असेल. प्रतिस्पर्धी राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार संजू सॅमसन हासुद्धा यष्टीरक्षक-फलंदाज म्हणून भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यामुळे त्यांच्यात यंदाच्या आयपीएलमध्ये चांगले द्वंद्व पाहायला मिळेल.
राजस्थान रॉयल्स संघ २००८च्या जेतेपदानंतर दुसरे अजिंक्यपद पटकावण्याच्या अगदी जवळ आला होता. मात्र २०२२मध्ये गुजरात टायटन्सने त्यांचे स्वप्न भंग पावले. मात्र गेल्या मोसमात त्यांची पाचव्या क्रमांकावर घसरण झाली होती. राजस्थान रॉयल्सकडे तगड्या फलंदाजांची फौज आहे. यशस्वी जैस्वाल सध्या तुफान फॉर्मात असून सॅमसनसहित ध्रूव जुरेल याने इंग्लंडविरुद्धच्या पदार्पणाच्या कसोटीत छाप पाडली होती. मधल्या फळीत रोव्हमन पॉवेल तसेच शिमरॉन हेटमायर या वेस्ट इंडिजच्या फलंदाजांचा पर्याय त्यांच्याकडे असेल.
दुसरीकडे, कर्णधार राहुल, क्विंटन डीकॉक, मार्कस स्टॉइनिस आणि निकोलस पूरन यांसारखे अनुभवी फलंदाज लखनौच्या ताफ्यात आहेत. त्याचबरोबर फिरकीमध्ये रवीचंद्रन अश्विन आणि यजुर्वेंद्र चहल यांच्या अनुभवाचा फायदा लखनौला उठवता येऊ शकतो. लेगस्पिनर रवी बिश्णोई हासुद्धा चांगली कामगिरी करण्यासाठी सज्ज असून त्याद्वारे त्याने टी-२० वर्ल्डकप संघात स्थान मिळवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्याचबरोबर अमित मिश्रा यांसारखा अनुभवी लेगस्पिनरसुद्धा लखनौकडे आहे. लखनौच्या वेगवान गोलंदाजीची भिस्त मार्क वूड आणि डेव्हिड विली यांच्याकडे असली तरी त्यांनी काही कारणास्तव आयपीएलमधून माघार घेतली आहे. त्यामुळे त्यांची उणीव वेस्ट इंडिजचा शमर जोसेफ याच्यासह मयांक यादव आणि मोहसिन खान यांना भरून काढावी लागणार आहे.
राजस्थान रॉयल्स : संजू सॅमसन (कर्णधार), जोस बटलर, शुभम दुबे, शिमरॉन हेटमायर, यशस्वी जैस्वाल, ध्रूव जुरेल, टॉम कोहलर-कॅडमोर, रियान पराग, रोव्हमन पॉवेल, कुणाल सिंग राठोड, रवीचंद्रन अश्विन, डोनोव्हॅन फरेरा, आवेश खान, ट्रेंट बोल्ट, नांद्रे बर्गर, यजुर्वेंद्र चहल, प्रसिध कृष्णा, नवदीप सैनी, संदीप शर्मा, कुलदीप सेन, आबिद मुश्ताक, तनुष कोटियन.
लखनौ सुपरजायंट्स : लोकेश राहुल (कर्णधार), क्विंटन डीकॉक, निकोलस पूरन, आयुष बदोनी, कायले मेयर्स, मार्कस स्टॉइनिस, दीपक हूडा, देवदत्त पडिक्कल, रवी बिश्णोई, नवीन उल हक, कृणाल पंड्या, युधवीर सिंग, प्रेरक मंकड, यश ठाकूर, अमित मिश्रा, शमर जोसेफ, मयांक यादव, मोहसिन खान, के. गौतम, शिवम मावी, अर्शिन कुलकर्णी, एम. सिद्धार्थ, ॲॅश्टन टर्नर, डेव्हिड विले, मोहम्मद अर्शद खान.