क्रीडा

अजिंक्य नाईक पुन्हा MCA च्या अध्यक्षपदी

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची पुन्हा एकदा बिनविरोध निवड झाली आहे. अध्यक्षपदाच्या शर्यतीतील इतर उमेदवारांनी माघार घेतल्याने अजिंक्य एमसीएचे अध्यक्ष म्हणून सलग दुसऱ्यांदा निवडून आले.

Swapnil S

मुंबई : मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची पुन्हा एकदा बिनविरोध निवड झाली आहे. अध्यक्षपदाच्या शर्यतीतील इतर उमेदवारांनी माघार घेतल्याने अजिंक्य एमसीएचे अध्यक्ष म्हणून सलग दुसऱ्यांदा निवडून आले.

प्रसाद लाड, जितेंद्र आव्हाड, विहंग सरनाईक, मिलिंद नार्वेकर, शाह आलम शेख आणि डायना एडल्जी यांनी अध्यक्षपदासाठीचा अर्ज मागे घेतला. त्यामुळे अजिंक्य यांची या पदावर बिनविरोध निवड झाली. १२ नोव्हेंबर रोजी एमसीएची निवडणूक होणे अपेक्षित होते. निवडणुकीसाठी २४ ऑक्टोबर रोजी निवडणूक अधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या अंतिम उमेदवार यादीवर जुन्या सदस्यांनी आक्षेप घेत दाखल घेतलेली याचिका हायकोर्टाने निकाली काढली होती. मात्र अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी अन्य उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने अजिंक्य नाईक पुन्हा अध्यक्षपद भूषवतील. उपाध्यक्ष व संघटनेमधील अन्य पदासांठी मात्र निवडणूक होणार आहे. विशेषत: उपाध्यक्ष पदासाठी जितेंद्र आव्हाड आणि नवीन शेट्टी यांच्याच चुरस पाहायला मिळणार आहे.

“मी क्रिकेटमधील एक साधा कार्यकर्ता आहे. कुठलीही अपेक्षा ठेवत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शरद पवार आणि आशिष शेलार यांना वाटले मी योग्य खेळाडू आहे, त्यामुळे एमसीएच्या अध्यक्षपदासाठी माझी निवड झाली,” अशी प्रतिक्रिया अजिंक्य नाईक यांनी दिली. “आव्हान स्वीकारायचं किंवा नाही स्वीकारायचं हा प्रश्नच येत नाही. कारण हा एक खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये वेगवेगळी परिस्थिती येते, आम्ही या परिस्थितीला सकारात्मक पद्धतीने सामोरे गेलो. जर मतदारांचा पाठिंबा असेल, तर मला वाटत नाही कुठले आव्हान कठीण असेल. प्रसाद लाड, जितेंद्र आव्हाड, सरनाईक हे वरिष्ठ सदस्य आहेत. त्यांच्याकडून मी शिकत असतो. त्यांची साथ मिळणे ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. त्यांनीही माझ्यावर विश्वास दाखवला,” असेही अजिंक्य म्हणाले.

दिवंगत अध्यक्ष अमोल काळे यांचे २०२४ मध्ये निधन झाल्यावर अजिंक्य यांनी पदाची सूत्रे स्वीकारली होती. ते एमसीएचे सर्वात युवा अध्यक्ष ठरले होते. त्यांच्या कार्यकाळात वानखेडे स्टेडियमचा सुवर्णमहोत्सव साजरा करण्यात आला. तसेच शरद पवार क्रिकेट संग्रहालयसुद्धा नुकतेच सुरू करण्यात आले. याव्यतिरिक्त, मुंबईतील क्रिकेटसाठी अजिंक्य यांनी विविध उपक्रम राबवले. महिला क्रिकेटपटूंना सन्मानित करण्यासाठी त्यांनी बीकेसी येथे विशेष वॉलचे अनावरण केले. रोहित शर्मा, शरद पवार व अजित वाडेकर यांसारख्या दिग्गजांच्या नावे वानखेडेमध्ये विशेष स्टँडही सुरू करण्यात आला. अजिंक्य पुन्हा अध्यक्षपदी आल्याने मुंबई क्रिकेटचे हित साधले जाणार आहे.

पवार-फडणवीस यांची हातमिळवणी?

राज्यातील मोठे राजकीय मतभेद असतानाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी पुन्हा एकदा मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीसाठी हातमिळवणी केली आहे. या महत्त्वपूर्ण राजकीय समझोत्यामुळे अजिंक्य नाईक यांची एमसीए अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली, असे म्हटले जात आहे. मागच्या निवडणुकीत देखील अशाच प्रकारे शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची हातमिळवणी झाल्याचे पाहायला मिळाल होतं. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी नाट्यमय घडामोडी घडल्या, ज्यात पवार आणि फडणवीस यांच्यात सोमवारी सकाळी वर्षा निवासस्थानी महत्त्वाची बैठक झाली होती. या चर्चेनंतर भाजप आमदार प्रसाद लाड, राष्ट्रवादी (एसपी) आमदार जितेंद्र आव्हाड, यूबीटी सेनेचे मिलिंद नार्वेकर आणि विहंग सरनाईक या प्रमुख उमेदवारांनी आपली नावे मागे घेतली. सर्वपक्षीय नेत्यांच्या या सहमतीमुळे १२ नोव्हेंबर रोजी होणारी संभाव्य निवडणूक टळली आणि अजिंक्य नाईक यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला.

निठारी हत्याकांडातील आरोपी सुरेंद्र कोली निर्दोष; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, तात्काळ सुटका होणार

Red Fort Blast : दिल्ली स्फोटाचे पुलवामा कनेक्शन? फरिदाबादचा डॉक्टरच ‘बॉम्बर’ असल्याचा संशय

महाराष्ट्र मंत्रिमंडळ निर्णय : राज्यात न्यायालयीन सुरक्षेत मोठी वाढ; ८ हजारांहून अधिक सुरक्षारक्षकांची नियुक्ती

Mumbai : शासकीय कार्यालयांमुळे BMC ला फटका; थकवला तब्बल ₹१८०० कोटींचा मालमत्ता कर

बीएलए नियुक्तीत उदासीनता! भाजप वगळता अन्य पक्षांत निरुत्साह; मविआसह मनसेची नेमणुकीकडे पाठ