आगरकरचा अलविदा! निवड समिती अध्यक्षपदाचा कार्यकाळ अखेर ३ वर्षांनी संपुष्टात 
क्रीडा

आगरकरचा अलविदा! निवड समिती अध्यक्षपदाचा कार्यकाळ अखेर ३ वर्षांनी संपुष्टात

राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्षपद भूषवणाऱ्या अजित आगरकरचा कार्यकाळ अखेर ३ वर्षांनी ४ ऑक्टोबर रोजी संपुष्टात आला आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) पुरुष निवड समितीमधील रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज मागवले आहेत. जुलै २०२३पासून आगरकर निवड समितीच्या अध्यक्षपदी होती.

Swapnil S

मुंबई : राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्षपद भूषवणाऱ्या अजित आगरकरचा कार्यकाळ अखेर ३ वर्षांनी ४ ऑक्टोबर रोजी संपुष्टात आला आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) पुरुष निवड समितीमधील रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज मागवले आहेत. जुलै २०२३पासून आगरकर निवड समितीच्या अध्यक्षपदी होती.

आगरकरने १८ सप्टेंबर रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीनंतर आपल्या कराराला मुदतवाढ देणार नसल्याची माहिती बीसीसीआयला दिली होती. माजी भारतीय फिरकीपटू प्रज्ञान ओझा सध्या पुरुष संघासाठी निवड समितीचा अंतरिम अध्यक्ष म्हणून काम पाहत असून, शिव सुंदर दास, अजय रात्रा आणि रुद्रप्रताप सिंह हे इतर समिती सदस्य आहेत.

बीसीसीआयने आपल्या संकेतस्थळावर पुरुष निवड समितीमधील एका जागेसाठी अर्ज मागवले असून अर्ज करण्याची अंतिम तारीख १४ ऑक्टोबर आहे. ओझाने २४ कसोटी सामने खेळले आहेत, तर चर्चा असलेल्या पार्थिव पटेलने २५ कसोटी सामने खेळल्यामुळे ते वरिष्ठतेच्या आधारावर ओझा यांच्यापेक्षा पुढे जाऊ शकतात. बीसीसीआयच्या नियमांनुसार उमेदवाराने किमान ७ कसोटी, ३० प्रथम श्रेणी सामने किंवा १० एकदिवसीय आणि २० प्रथम श्रेणी सामने खेळलेले असावेत आणि किमान पाच वर्षे आधी क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली असावी, असा नियम आहे. ओझाच्या नेतृत्वातच मंगळवारी न्यूझीलंड दौऱ्यातील टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ निवडण्यात आला.

“भारतीय क्रिकेटसाठी काही अत्यंत खास क्षणांनी युक्त असा हा कार्यकाळ होता. यात तीन आयसीसी ट्रॉफी, दोन आशिया कप विजेतेपदे आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत सलग दोन सुवर्णपदके, तसेच २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीपर्यंतची मजल यांचा समावेश आहे,” असे बीसीसीआयने ट्वीट केले. “पुरुष निवड समितीचे अध्यक्ष म्हणून तुमची निष्ठा, दृढनिश्चय आणि योगदान यांबद्दल धन्यवाद. तुमच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा,” असे बीसीसीआयने पुढे नमूद केले.

गंभीरकडून विशेष कौतुक

भारताचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनीसुद्धा आगरकर यांचे विशेष कौतुक केले आहे. ‘संघ प्रथम’ या भूमिकेवर ठाम राहिल्यामुळेच भारताला त्यांच्या कायर्काळामध्ये तीन आयसीसी स्पर्धा जिंकता आल्या. या योगदानाबद्दल इतिहास आगरकरांच्या बाजूने नक्कीच न्याय करेल, असा विश्वास गंभीर यांनी बुधवारी व्यक्त केला. आगरकरांना मुदतवाढ मिळणार का याबाबत संभ्रम होता. अखेर बुधवारी या चर्चांना पूर्णविराम लागला.

“प्रिय अजित भाई, आपल्यासोबत काम करणे हा एक अत्यंत सन्मान होता. ते तीन आयसीसी ट्रॉफी तुमच्या संघहिताच्या आणि कायम संघाला प्राधान्य देण्याच्या निधाराची साक्ष देतात. मला म्हणावे लागेल की इतिहास तुमच्याशी अधिक न्याय्य असेल. सर्व काही बदलाबद्दल मनापासून धन्यवाद आणि भविष्यातील सर्व प्रयत्नांसाठी हार्दिक शुभेच्छा,” अशी पोस्ट गौतम गंभीर यांनी केली आहे.

सध्या निवड समिती सदस्यांमध्ये ओझाकडे सर्वाधिक २४ कसोटी सामन्यांचा अनुभव असल्याने तो अध्यक्षपद भूषवत आहे. आगरकर हे पश्चिम विभागातून होेते. त्यामुळे नवीन सदस्यदेखील पश्चिम विभागातील असेल. जर त्याचा अनुभव ओझापेक्षा अधिक असला, तर तो सदस्य निवड समितीचा अध्यक्ष बनू शकतो.

सध्या भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्ध टी-२० मालिका खेळत आहे. तसेच न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ निवडण्यात आलेला आहे. मात्र एकदिवसीय व कसोटी संघ निवडेपर्यंत बीसीसीआय नवा अध्यक्ष नेमणार का, हे पाहणे रंजक ठरेल. २०२७च्या एकदिवसीय विश्वचषकाची तयारी पाहता, भारताचा न्यूझीलंड दौरा संघाच्या तयारीला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल.

ओझा अग्रेसर; दिघे, पार्थिवही शर्यतीत

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गुजरातचा पार्थिव पटेल आणि मुंबईचे समीर दिघे हे दोन माजी क्रिकेटपटू निवड समिती सदस्य होण्यासाठी उत्सुक असल्याचे समजते. दिघे यांच्याकडे एकदिवसीय व प्रथम श्रेणी क्रिकेटचा पुरेसा अनुभव आहे. त्यामुळे त्यांनी अर्ज केला, तर ओझाला कडवी झुंज मिळू शकते.

कार्यकाळात भारताची कामगिरी कशी?

आगरकर यांच्या कार्यकाळात भारताने २०२४ आणि २०२६चा टी-२० विश्वचषक तसेच २०२५ची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. या काळात त्यांनी रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या टी-२० आणि कसोटी क्रिकेटमधील निवृत्तीच्या टप्प्यासारख्या कठीण स्थित्यंतराचा यशस्वी सामना केला होता. त्यांना त्यांच्या कडक निर्णयांमुळे कठोर मानले गेले आणि २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या योजनेत रोहित व कोहली यांचा समावेश असेल किंवा नाही याबाबत त्यांनी स्पष्टोक्ती टाळली होती.

आगरकर यांच्या कार्यकाळात भारताला २०२४मध्ये न्यूझीलंडविरुद्ध मायदेशात कसोटी मालिकेत ०-३ असा पराभव पत्करावा लागला. तसेच २०२५मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धही भारत ०-२ असा पराभूत झाला. इंग्लंडला मात्र भारताने २-२ असे बरोबरीत रोखले. २०२३च्या डब्ल्यूटीसी अंतिम फेरीत भारत पराभूत झाला, तर २०२५च्या अंतिम फेरीसाठी भारताला पात्र ठरता आले नाही. त्यामुळे कसोटीमध्ये आगरकर यांच्या समितीने केलेली संघनिवड अनेकदा चर्चेचा विषय ठरली.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Nana Patekar Passes Away: 'नटसम्राट' नाना पाटेकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, गोव्यात घेतला अखेरचा श्वास

फडणवीसांच्या भेटीची कंत्राटदारांची मागणी; ८६ हजार कोटींची बिले थकीत

२०४७ पर्यंत भारत विकसित राष्ट्र; 'आम्ही हे करून दाखवू' - मोदींनी दिला नवा नारा

शेतकऱ्यांवर पशुधन विक्रीची नामुष्की; चाऱ्याअभावी जनावरांचे दर २५ टक्क्यांनी घसरले

पाणीसाठा घटला, चिंता वाढली! मोडकसागर धरणातील साठा प्रथमच ७० टक्क्यांवर; स्विमिंग पूल, मनोरंजन क्लबचे पाणी होणार बंद