Neeraj Chopra  Credit: DD Sports Twitter
क्रीडा

Paris 2024 Olympics: गोल्डन बॉयकडे आज लक्ष! प्राथमिक फेरीत नीरजसह किशोरकडून चमक अपेक्षित

गोल्डन बॉय म्हणून ओळखला जाणारा भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा मंगळवारी त्याच्या अभियानाला प्रारंभ करणार आहे. सुवर्णपदकासाठी प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या २६ वर्षीय नीरजव्यतिरिक्त भारताचा अन्य स्पर्धक किशोर जेनाकडूनही चमकदार कामगिरी अपेक्षित आहे.

Swapnil S

पॅरिस : गोल्डन बॉय म्हणून ओळखला जाणारा भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा मंगळवारी त्याच्या अभियानाला प्रारंभ करणार आहे. सुवर्णपदकासाठी प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या २६ वर्षीय नीरजव्यतिरिक्त भारताचा अन्य स्पर्धक किशोर जेनाकडूनही चमकदार कामगिरी अपेक्षित आहे.

२०२०च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये नीरजने ऐतिहासिक सुवर्णपदकाला गवसणी घातली होती. त्यानंतर जागतिक, आशियाई स्पर्धेतही नीरजने सुवर्ण काबिज केले. डायमंड लीगचे विजेतेपद मिळवून नीरजने संपूर्ण विश्वात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. सध्या भारताला यंदाच्या ऑलिम्पिकमधील पहिल्या सुवर्णपदकाची अद्यापही प्रतीक्षा आहे. त्यामुळे आता नीरजवरच तमाम चाहत्यांच्या आशा टिकून आहेत.

स्नायूंच्या दुखापतीतून सावरत नीरज ऑलिम्पिकमध्ये दुसरे सुवर्णपदक पटकावण्यास सज्ज आहे. नीरजचा ब-गटात समावेश असून त्याला पाकिस्तानचा अर्शद नदीम आणि जर्मनीचा १९ वर्षीय मॅक्स डेनिंगकडून कडवे आव्हान मिळेल. नीरजने अद्याप एकदाही ९० मीटरहून दूर भालाफेक केलेली नाही. ८९.९४ मीटर ही त्याची आजवरची सर्वोत्तम कामगिरी आहे.

नीरज-ब गटात असून भारताचा अन्य स्पर्धक किशोर अ-गटात आहे. त्याला जर्मनीचा जुलियन वेबर व चेक प्रजासत्ताकच्या जेकब वॅडलेजकडून आव्हान मिळेल. किशोरच्या प्राथमिक फेरीला दुपारी १.५० वाजता, तर नीरजच्या फेरीला दुपारी ३.२० वाजता सुरुवात होईल. नीरज व किशोर यांनी गेल्या वर्षी आशियाई स्पर्धेत अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदक जिंकले होते. त्यामुळे दोघांकडही भारतीयांचे लक्ष लागून आहे.

> आतापर्यंत फक्त ४ भालाफेकपटूंनी सलग दोन ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकलेले आहे. नीरजला या पंक्तीत सहभागी होण्याची संधी आहे.

प्राथमिक फेरीविषयी हे महत्त्वाचे

> प्राथमिक फेरीत ३२ भालाफेकपटू सहभागी होणार असून त्यांना २ गटांत विभागण्यात आले आहे.

> नीरज ब-गटात, तर किशोर अ-गटात आहे. ८४ मीटरहून अधिक अंतरावर भालाफेक करणारे १२ भालाफेकपटू अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील.

> गुरुवार, ८ ऑगस्ट रोजी अंतिम फेरी खेळवण्यात येईल.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक