Asian Games 2026 : ॲथलेटिक्समध्ये पदक लयलूट; महिलांच्या लांब उडीत ॲन्सीला, उंच उडीत नाशिकच्या सर्वेशला रौप्यपदक  (Photo-X)
क्रीडा

Asian Games 2026 : ॲथलेटिक्समध्ये पदक लयलूट; महिलांच्या लांब उडीत ॲन्सीला, उंच उडीत नाशिकच्या सर्वेशला रौप्यपदक

जपान येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत रविवारी भारतीय क्रीडापटूंनी ॲथलेटिक्सच्या विविध प्रकारांत उत्कृष्ट कामगिरी करत पदकांची कमाई केली.

Swapnil S

नागोया : जपान येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत रविवारी भारतीय क्रीडापटूंनी ॲथलेटिक्सच्या विविध प्रकारांत उत्कृष्ट कामगिरी करत पदकांची कमाई केली. पुरुषांच्या उंच उडीत सर्वेश कुशारे आणि महिलांच्या लांब उडीत ॲन्सी सोजन यांनी रौप्यपदक पटकावले. तसेच ३००० मीटर स्टीपलचेस शर्यतीत पारुल चौधरी आणि महिलांच्या २०० मीटर शर्यतीत हरिता भद्रा यांनी कांस्यपदक मिळवले.

आयची-नागोया येथे १९ सप्टेंबरपासून २०वी आशियाई क्रीडा स्पर्धा सुरू झाली आहे. २०२३च्या आशियाई स्पर्धेत भारताने १०६ पदके जिंकली होती. त्यामुळे यंदा भारतापुढे ही पदकसंख्या ओलांडण्याचे आव्हान आहे. ४ ऑक्टोबरपर्यंत रंगणाऱ्या या स्पर्धेत भारताने आतापर्यंत ३७ पदकांची कमाई केली आहे. यामध्ये ४ सुवर्ण, १६ रौप्य व १७ कांस्यपदकांचा समावेश आहे. आठव्या दिवशी म्हणजेच रविवारी भारताने दिवसभरात सात पदके पटकावली. तूर्तास भारत पदकतालिकेत १२व्या क्रमांकावर असून चीन ११९ सुवर्णपदकांसह थाटात अग्रस्थानी विराजमान आहे.

दरम्यान, पुरुषांच्या उंच उडीच्या अंतिम फेरीत नाशिकच्या सर्वेशने बहुतांश वेळ आघाडी घेतली होती. मात्र, २.२५ मीटरची उडी पहिल्या प्रयत्नात पार करण्यात अपयश आल्याने त्याला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. चायनीज तैपेईच्या चाओ सुआन-फुने हे अंतर पहिल्याच प्रयत्नात पार करत सुवर्णपदक जिंकले, तर कुशारेने दुसऱ्या प्रयत्नात हे अंतर पार करत रौप्यपदक निश्चित केले.

महिलांच्या लांब उडीमध्ये ॲन्सीने ६.५३ मीटरची सर्वोत्तम उडी मारून रौप्यपदक पटकावले. चीनच्या हुआंग यिंगयिंगने अखेरच्या प्रयत्नात ६.५५ मीटर उडी मारून सुवर्णपदक आपल्या नावावर केले. भारताच्या शैली सिंगला या प्रकारात ६.४२ मीटर कामगिरीसह चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागल्याने तिचे कांस्यपदक थोडक्यात हुकले, तर चीनच्या मेंगयी तानने ६.४६ मीटर कामगिरीसह कांस्यपदक मिळवले.

महिलांच्या २०० मीटर शर्यतीत हरिता भद्राने २३.२० सेकंदाची वेळ नोंदवत कांस्यपदक जिंकले. तिने जपानच्या इडो अबिगेरफुकाला एका सेकंदाच्या शतांशाने मागे टाकले. या शर्यतीत सिंगापूरच्या शांती परेराने २२.७८ सेकंदासह सुवर्ण, तर चीनच्या चेन युजीने २२.९३ सेकंदासह रौप्यपदक जिंकले. भारताची उन्नती अयाप्पा बोलँड २३.४८ सेकंदासह सहाव्या स्थानावर राहिली.

महिलांच्या ३००० मीटर स्टीपलचेसमध्ये पारुल चौधरीने ९:०८.६७ अशी वैयक्तिक सर्वोत्तम वेळ नोंदवत सलग दुसरे कांस्यपदक पटकावले. बहरिनच्या विनफ्रेड यावीने सुवर्ण जिंकले.

३७ भारताने रविवारी दिवसभरात सात पदकांची कमाई केली. यामध्ये ४ रौप्य व ३ कांस्यपदकांचा समावेश होता. सध्या ४ सुवर्ण, १६ रौप्य, १७ कांस्य अशा एकूण ३७ पदकांसह भारत पदकतालिकेत १२व्या क्रमांकावर आहे.

डेकॅथलॉनमध्ये तेजस्विनला कांस्य

दोन दिवस चाललेल्या आणि अत्यंत कठीण अशा १० क्रीडाप्रकारांच्या ‘डेकॅथलॉन’ स्पर्धेत तेजस्विन शंकरने ७९३४ गुण मिळवत कांस्यपदक पटकावले. याआधीच्या आवृत्तीत त्याने रौप्यपदक जिंकले होते. जपानच्या मारुयामाने ८१२३ गुणांसह सुवर्णपदक जिंकले, तर चीनच्या चेन एक्सने ८०१२ गुण मिळवून रौप्यपदक आपल्या नावे केले. “मी रौप्यपदक किमान जिंकायला हवे होते. मात्र कांस्यपदकावर समाधान मानावे लागले,” असे तेजस्विन म्हणाला. २७ वर्षीय तेजस्विनने काही महिन्यांपूर्वीच ग्लासगो येथील राष्ट्रकुल स्पर्धेत ऐतिहासिक कांस्यपदक जिंकले होते. त्यामुळे डेकॅथलॉनमध्ये तेजस्विनच्या रुपात भारताला उत्तम खेळाडू गवसला आहे.

Mumbai : झाडांसाठी नवी एसओपी; चेंबूर दुर्घटनेनंतर २६ वॉर्डांत अधिकारी

ST तील दोषी अधिकाऱ्यांना बढती; सक्षम प्राधिकाऱ्यांचे निर्णय वादाच्या भोवऱ्यात

बोईंगच्या मॅक्स विमानांमध्ये सदोष सॉफ्टवेअर; ऑटोमेटेड फ्लाईट गायडन्स सिस्टमवर परिणाम होणार

सोन्या-चांदीच्या बाजारात अस्थिरता राहण्याची शक्यता; अमेरिकेची आकडेवारी, पश्चिम आशियातील तणावाचा परिणाम राहणार

महाराष्ट्राचे नवे केमिकल, पेट्रोकेमिकल धोरण ऑक्टोबरमध्ये; 'असोचेम' च्या शिफारशींवर शिक्कामोर्तब होणार