Breakfast Recipe : ब्रेडशिवाय बनवा खमंग पकोडे; रवा-बटाट्याची ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा

घरात ब्रेड नसला तरी नाश्त्याची चिंता नको! रवा, उकडलेले बटाटे आणि बेसन वापरून बनवा बाहेरून कुरकुरीत अन् आतून मसालेदार खमंग पकोडे. जाणून घ्या सोपी रेसिपी.
Breakfast Recipe : ब्रेडशिवाय बनवा खमंग पकोडे; रवा-बटाट्याची ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा
'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on: 

चहासोबत गरमागरम आणि कुरकुरीत भजी किंवा पकोडे खाण्याची मजाच काही और असते. त्यातही बटाट्याचं सारण भरलेले ब्रेड पकोडे अनेकांच्या आवडीचे असतात. मात्र, अचानक ब्रेड संपल्याचं लक्षात आलं तर नाश्त्याचा बेत बदलण्याची गरज नाही. कारण घरात ब्रेड नसतानाही तुम्ही अगदी ब्रेड पकोड्यांसारखा चविष्ट आणि कुरकुरीत पदार्थ बनवू शकता. यासाठी रवा, उकडलेले बटाटे आणि बेसन या नेहमीच्या पदार्थांचा वापर करता येतो. चला तर मग जाणून घेऊया ब्रेडशिवाय तयार होणाऱ्या या हटके पकोड्यांची सोपी रेसिपी.

साहित्य -

रव्याच्या आवरणासाठी :

  • १ वाटी रवा

  • २ वाट्या पाणी

  • चवीनुसार मीठ

  • १ चमचा तेल

बटाट्याच्या सारणासाठी :

  • २ ते ३ उकडलेले बटाटे

  • २ हिरव्या मिरच्या (बारीक चिरलेल्या)

  • बारीक चिरलेली कोथिंबीर

  • अर्धा चमचा लाल तिखट

  • अर्धा चमचा चाट मसाला

  • चिमूटभर गरम मसाला

  • अर्धा चमचा आमचूर पावडर

  • चवीनुसार मीठ

Breakfast Recipe : ब्रेडशिवाय बनवा खमंग पकोडे; रवा-बटाट्याची ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा
Healthy Snacks : काहीतरी चटपटीत खायचंय? स्वयंपाकघरातील 'या' पदार्थांपासून बनवा झटपट स्नॅक्स

बेसनच्या पिठासाठी :

  • १ वाटी बेसन

  • चवीनुसार मीठ

  • अर्धा चमचा हळद

  • अर्धा चमचा लाल तिखट

  • चिमूटभर खायचा सोडा (ऐच्छिक)

  • आवश्यकतेनुसार पाणी

  • तळण्यासाठी तेल

कृती -

१. रव्याचं मिश्रण तयार करा : सर्वप्रथम एका कढईत पाणी गरम करण्यासाठी ठेवा. त्यात मीठ आणि थोडं तेल घाला. पाण्याला उकळी आल्यावर त्यात हळूहळू रवा घाला आणि सतत ढवळत राहा. रव्याच्या गुठळ्या होणार नाहीत याची काळजी घ्या. मिश्रण घट्ट झाल्यावर गॅस बंद करा आणि ते थंड होण्यासाठी बाजूला ठेवा.

२. बटाट्याचं सारण बनवा : उकडलेले बटाटे चांगले मॅश करून घ्या. त्यात हिरवी मिरची, कोथिंबीर, लाल तिखट, चाट मसाला, गरम मसाला, आमचूर पावडर आणि मीठ घाला. सर्व साहित्य एकत्र करून छान मिक्स करा.

Breakfast Recipe : ब्रेडशिवाय बनवा खमंग पकोडे; रवा-बटाट्याची ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा
बाजारातून विकत आणण्याची गरज नाही; घरच्या घरी काही मिनिटांत बनवा मॅगी मसाला

३. पकोड्यांना आकार द्या : हाताला थोडं तेल लावून रव्याच्या मिश्रणाचा छोटा गोळा घ्या. हाताने तो हलका चपटा करा. त्याच्या मध्यभागी तयार केलेलं बटाट्याचं सारण ठेवा. आता रव्याच्या मिश्रणाने सारण पूर्णपणे झाकून घ्या आणि कडा व्यवस्थित बंद करा. ब्रेड पकोड्यांप्रमाणे चौकोनी, त्रिकोणी किंवा आयताकृती आकार द्या.

४. बेसनचं पीठ तयार करा : एका भांड्यात बेसन, मीठ, हळद आणि लाल तिखट घाला. त्यात थोडं थोडं पाणी टाकत गुळगुळीत आणि मध्यम घट्टसर पीठ तयार करा. हवं असल्यास त्यात चिमूटभर खायचा सोडा घालू शकता.

५. पकोडे तळून घ्या : कढईत तेल गरम करा. तयार केलेले रव्याचे पकोडे बेसनच्या पिठात बुडवून सर्व बाजूंनी व्यवस्थित कोटिंग करा. त्यानंतर गरम तेलात सोडा. मध्यम आचेवर पकोडे सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या. तयार पकोडे टिश्यू पेपरवर काढा.

या टिप्स लक्षात ठेवा

  • रव्याचं मिश्रण पूर्ण थंड झाल्यावरच पकोड्यांना आकार द्या.

  • बटाट्याचं सारण जास्त ओलसर ठेवू नका. त्यामुळे पकोडे व्यवस्थित बंद करता येतात.

  • बेसनाचं पीठ खूप पातळ किंवा खूप घट्ट करू नका.

  • पकोडे नेहमी मध्यम गरम तेलात तळा. तेल जास्त गरम असल्यास बाहेरून पकोडे लवकर लाल होतील, पण आतून नीट शिजणार नाहीत.

  • पकोडे तळताना कढईत एकाच वेळी जास्त पकोडे टाकू नका.

Breakfast Recipe : ब्रेडशिवाय बनवा खमंग पकोडे; रवा-बटाट्याची ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा
Whole Wheat Bread : ब्राऊन ब्रेड खरेदी करताय? फक्त रंग पाहून निवड करू नका; पाकिटावरील 'या' गोष्टीही तपासा

गरमागरम रव्याचे हे कुरकुरीत पकोडे हिरवी चटणी, चिंचेची गोड-आंबट चटणी किंवा टोमॅटो सॉससोबत सर्व्ह करा. सोबत एक कप वाफाळता चहा असेल तर संध्याकाळचा नाश्ता आणखी खास होईल. विशेष म्हणजे, घरात ब्रेड नसतानाही नेहमीच्या पदार्थांपासून हा हटके नाश्ता सहज तयार करता येतो.