

ब्राऊन ब्रेड किंवा आटा ब्रेड हा पांढऱ्या ब्रेडपेक्षा आरोग्यासाठी चांगला पर्याय मानला जातो. त्यामुळे अनेकजण ब्रेड खरेदी करताना त्याचा रंग आणि पाकिटावर लिहिलेल्या '१००% होल व्हीट' या दाव्यावर विश्वास ठेवतात. मात्र, केवळ ब्रेडचा रंग किंवा पॅकेटवरील दावे पाहून तो आरोग्यदायी आहे, असा निष्कर्ष काढणे योग्य नाही. नुकतेच ब्रिटानिया कंपनीला '१००% होल व्हीट ब्रेड'च्या दाव्याप्रकरणी केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (CCPA) १ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. त्यामुळे ब्रेड खरेदी करताना त्यातील घटक, मैद्याचे प्रमाण आणि पोषणमूल्ये तपासणे महत्त्वाचे आहे. नेमका कोणता ब्रेड निवडावा आणि खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी, जाणून घेऊया.
ब्रिटानियाला १ लाखांचा दंड का ठोठावला?
ब्रिटानिया कंपनी आपल्या ब्रेडची जाहिरात '१००% होल व्हीट ब्रेड' अशी करत होती. मात्र, संबंधित उत्पादनामध्ये संपूर्ण गव्हाच्या पिठाचे प्रमाण ६२ टक्के असल्याचे आढळले. उर्वरित ३८ टक्क्यांमध्ये तांदळाच्या कोंड्यासह इतर घटकांचा समावेश असल्याचे प्राधिकरणाच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
तपासादरम्यान कंपनीनेही ब्रेडमध्ये ६२ टक्के संपूर्ण गव्हाचे पीठ असल्याचे मान्य केले. कंपनीच्या मते, हा दावा ब्रेडमध्ये वापरलेल्या गव्हाच्या पिठासंदर्भात होता. मात्र, '१००% होल व्हीट ब्रेड' असे लिहिल्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना संपूर्ण ब्रेड हा गव्हाच्या पिठापासूनच बनवलेला आहे, असा अर्थ लागू शकतो, असे प्राधिकरणाने स्पष्ट केले.
त्यामुळे दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीप्रकरणी कंपनीला १ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. तसेच प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि सोशल मीडियावरील संबंधित जाहिरात बंद करण्याचे निर्देश देण्यात आले असून, १५ दिवसांच्या आत अनुपालन अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.
होल व्हीट ब्रेडबाबत FSSAI चे नियम काय सांगतात?
भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) ब्रेडच्या प्रकारानुसार त्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या पिठाच्या प्रमाणाबाबत नियम निश्चित केले आहेत. त्यानुसार ब्रेडच्या नावावरून त्यातील गव्हाच्या पिठाचे प्रमाण समजून घेणे महत्त्वाचे आहे.
होल व्हीट ब्रेड : वापरलेल्या एकूण पिठापैकी किमान ७५ टक्के संपूर्ण गव्हाचे पीठ (आटा) असणे आवश्यक आहे.
व्हीट ब्रेड किंवा ब्राऊन ब्रेड : वापरलेल्या एकूण पिठापैकी किमान ५० टक्के संपूर्ण गव्हाचे पीठ असणे आवश्यक आहे.
व्हाईट ब्रेड : यामध्ये प्रामुख्याने रिफाइंड गव्हाचे पीठ म्हणजेच मैद्याचा वापर केला जातो.
इथे एक गोष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे. हे प्रमाण ब्रेड बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या एकूण पिठाच्या मिश्रणाशी संबंधित आहे. ब्रेड तयार करताना पाणी, यीस्ट, मीठ आणि इतर घटकांचाही वापर केला जातो. त्यामुळे पिठाच्या मिश्रणातील संपूर्ण गव्हाच्या पिठाचे प्रमाण आणि तयार ब्रेडमधील त्याचे प्रमाण या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.
ब्रेड खरेदी करताना 'या' ४ गोष्टी तपासा
१. पॅकेटच्या पुढील बाजूपेक्षा घटकांची यादी वाचा
ब्रेडच्या पाकिटावर मोठ्या अक्षरांत काय लिहिले आहे, यापेक्षा मागील बाजूला दिलेली घटकांची यादी अधिक महत्त्वाची आहे. त्यामध्ये Whole Wheat Flour किंवा Whole Wheat Atta याचा उल्लेख आहे का, हे तपासा.
पोषणतज्ज्ञ रीमा अरोरा यांच्या माहितीनुसार, खाद्यपदार्थांमधील घटक सामान्यतः वजनानुसार उतरत्या क्रमाने दिलेले असतात. त्यामुळे यादीच्या सुरुवातीला असलेला घटक उत्पादनामध्ये तुलनेने अधिक प्रमाणात असतो. संपूर्ण गव्हाचे पीठ सुरुवातीला असल्यास तो ब्रेडमधील प्रमुख घटक असल्याचा अंदाज येऊ शकतो. मात्र, नेमके प्रमाण जाणून घेण्यासाठी पॅकेटवरील स्वतंत्र प्रमाणविषयक माहितीही तपासा.
२. ब्रेडमध्ये मैदा आहे की नाही, हे पाहा
तुम्हाला आहारातून मैदा टाळायचा असेल, तर ब्रेडच्या पाकिटावरील संपूर्ण घटकांची यादी वाचा. त्यामध्ये Maida किंवा Refined Wheat Flour असा उल्लेख आहे का, हे तपासा.
'आटा ब्रेड', 'ब्राऊन ब्रेड' किंवा 'होल व्हीट ब्रेड' अशी नावे असली, तरी त्यामध्ये मैदा अजिबात नाही, असे गृहीत धरू नका. तसेच 'झिरो मैदा' आणि '१००% होल व्हीट' हे दावे एकाच अर्थाचे नाहीत.
३. ब्रेडच्या नावाचा नेमका अर्थ समजून घ्या
नियमांनुसार, 'होल व्हीट ब्रेड'मध्ये वापरलेल्या एकूण पिठापैकी किमान ७५ टक्के संपूर्ण गव्हाचे पीठ असणे आवश्यक आहे. तर 'ब्राऊन ब्रेड' किंवा 'व्हीट ब्रेड'साठी हे प्रमाण किमान ५० टक्के आहे. त्यामुळे ब्राऊन ब्रेड म्हणजेच होल व्हीट ब्रेड असे नाही. त्याचप्रमाणे होल व्हीट ब्रेडमध्येही १०० टक्के संपूर्ण गव्हाचे पीठ असेलच, असे नाही.
४. फायबरचे प्रमाण तपासा
ब्रेड खरेदी करताना फायबरसोबतच सोडियम, अतिरिक्त साखर आणि एका सर्व्हिंगचे प्रमाणही तपासा. संपूर्ण गव्हाच्या पिठापासून बनवलेला ब्रेड म्हणजे प्रत्येक बाबतीत सर्वाधिक पौष्टिक पर्याय असेलच, असे नाही.
ब्रेडचा रंग पाहून आरोग्यदायी असल्याचा निष्कर्ष काढू नका
ब्राऊन ब्रेडचा रंग गडद असल्यामुळे तो पांढऱ्या ब्रेडपेक्षा अधिक पौष्टिक वाटू शकतो. मात्र, केवळ रंगावरून त्यामध्ये संपूर्ण गव्हाचे पीठ किती आहे, हे ठरवता येत नाही. काही ब्रेडमध्ये रंग गडद दिसण्यासाठी मोलॅसिस किंवा कॅरॅमल रंगासारख्या घटकांचा वापर केला जाऊ शकतो.
त्यामुळे ब्रेडचा रंग, नाव किंवा जाहिरातीतील दावे यांवर अवलंबून न राहता घटकांची यादी आणि पोषणमूल्यांची माहिती तपासणे अधिक योग्य ठरते.
'१००% आटा ब्रेड' बनवणे शक्य आहे का?
ब्रेड तयार करण्यासाठी वापरले जाणारे सर्व पीठ संपूर्ण गव्हाचे असू शकते. मात्र, ब्रेड बनवताना पाणी, यीस्ट, मीठ आणि इतर घटकांचाही वापर केला जातो. त्यामुळे संपूर्ण ब्रेड हा केवळ आट्याचाच बनलेला आहे, असा अर्थ होत नाही.
याच कारणामुळे '१००% होल व्हीट ब्रेड' असा दावा करताना त्याचा ग्राहकांना नेमका काय अर्थ लागू शकतो, याचा विचार करणे आवश्यक आहे. कंपनीचा दावा केवळ पिठाच्या घटकापुरता मर्यादित असला, तरी त्यातून ग्राहकांची दिशाभूल होणार नाही, याची खबरदारी घ्यावी लागते.
थोडक्यात सांगायचे तर, ब्रेड खरेदी करताना केवळ '१००% होल व्हीट', 'ब्राऊन ब्रेड' किंवा 'आटा ब्रेड' असे लिहिलेले पाहून निर्णय घेऊ नका. त्यातील संपूर्ण गव्हाच्या पिठाचे प्रमाण, मैद्याचा वापर, फायबर आणि इतर पोषणमूल्ये तपासूनच योग्य पर्याय निवडा.