फोटो सौ : IANS
क्रीडा

Aus vs Eng, Ashes Test Series : ऑस्ट्रेलियाचे तिसऱ्या विजयासह ॲशेसवरही वर्चस्व

कर्णधार पॅट कमिन्स (४८ धावांत ३ बळी), वेगवान मिचेल स्टार्क (६२ धावांत ३ बळी) आणि फिरकीपटू नॅथन लायन (७७ धावांत ३ बळी) या अनुभवी गोलंदाजांच्या त्रिकुटाने रविवारी पुन्हा एकदा छाप पाडली.

Krantee V. Kale

ॲडलेड : कर्णधार पॅट कमिन्स (४८ धावांत ३ बळी), वेगवान मिचेल स्टार्क (६२ धावांत ३ बळी) आणि फिरकीपटू नॅथन लायन (७७ धावांत ३ बळी) या अनुभवी गोलंदाजांच्या त्रिकुटाने रविवारी पुन्हा एकदा छाप पाडली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा ८२ धावांनी पराभव केला. याबरोबरच त्यांनी ॲशेसवरील वर्चस्व अबाधित राखताना पाच लढतींच्या मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतली.

ॲडलेड ओव्हल येथे झालेल्या या लढतीत पाचव्या दिवशी इंग्लंडला विजयासाठी आणखी २२८ धावांची, तर ऑस्ट्रेलियाला फक्त चार बळींची आवश्यकता होती. ६ बाद २०७ धावांवरून जेमी स्मिथ (६०), विल जॅक्स (४७) व ब्रेडन कार्स (नाबाद ३९) या तळाच्या फलंदाजांनी झुंज देण्याचा प्रयत्न केला. अखेरीस ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा दुसरा डाव १०२.५ षटकांत ३५२ धावांत गुंडाळला. स्कॉट बोलंडने जोश टंगला बाद करून कांगारूंच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. स्टार्क, कमिन्स, लायन यांनी प्रत्येकी ३ बळी मिळवले. स्टीव्ह स्मिथच्या अनुपस्थितीतही कांगारूंनी चमकदार कामगिरी केली. पहिल्या डावात शतक, तर दुसऱ्या डावात अर्धशतक साकारणारा यष्टिरक्षक ॲलेक्स कॅरी सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. पहिल्या दोन्ही कसोटीत कांगारूंनी इंग्लंडला ८ गडी राखून धूळ चारली. स्टार्क दोन्ही लढतींमध्ये सामनावीर ठरला. त्यामुळे इंग्लंडला मालिकेतील आव्हान टिकवून ठेवण्यासाठी ही लढत जिंकणे गरजेचे होते. मात्र ते पुन्हा अपयशी ठरले. २०११नंतर इंग्लंडला ऑस्ट्रेलियात एकदाही कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. आता २६ डिसेंबरपासून मेलबर्नला चौथी, तर ४ जानेवारीपासून सिडनीला पाचवी कसोटी खेळवण्यात येईल. बेन स्टोक्सच्या नेतृत्वात आणि ब्रँडन मॅकलमच्या प्रशिक्षणात इंग्लंडला गेल्या दोन वर्षांत सातत्याने कसोटीत संघर्ष करावा लागला आहे. त्यामुळे त्यांना बॅझबॉल शैलीबाबत विचारविनिमय करावा लागणार आहे.

१८८२-८३ पासून ऑस्ट्रेलिया-इंग्लंड यांच्यात खेळवण्यात येणाऱ्या कसोटी मालिकेस ॲशेस असे संबोधले जाते. २०२३मध्ये इंग्लंड येथे अखेरची ॲशेस मालिका झाली होती. त्यामध्ये दोन्ही संघांना २-२ अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले. त्यामुळे तूर्तास ऑस्ट्रेलियाकडे ॲशेस करंडक आहे. कारण २०२१-२२मध्ये त्यांनी मायदेशात ही मालिका जिंकली होती. आता चार वर्षांनी पुन्हा एकदा कांगारूंनी ॲशेसवरील वर्चस्व राखले आहे.

संक्षिप्त धावफलक

ऑस्ट्रेलिया (पहिला डाव) : ३७१

इंग्लंड (पहिला डाव) : २८६

ऑस्ट्रेलिया (दुसरा डाव) : ३४९

इंग्लंड (दुसरा डाव) : १०२.५ षटकांत सर्व बाद ३५२ (झॅक क्रॉली ८५, जेमी स्मिथ ६०; पॅट कमिन्स ३/४८, नॅथन लायन ३/७७)

सामनावीर : ॲलेक्स कॅरी

Kolkata Hotel Fire: हॉटेलमध्ये आगीचा भडका! झोपेतच ९ जणांचा दुर्दैवी अंत, ६ जण जखमी; VIDEO

भारतातील रुग्णालयांचे दर हे हिमनगाचे टोक; आरोग्य सेवा क्षेत्र भांडवलप्रधान असल्याचा नॅटहेल्थचा अहवाल

कोरमअभावी टाटा सन्सची AGM अखेर तहकूब

Mumbai : पालिका मुख्यालयातील उपाहारगृह तत्काळ सुरू करा; महापौर रितू तावडेंचे निर्देश

परिणामांबाबतचा संदेश स्पष्ट; कृती, संवेदनशीलतेचे प्रदर्शन, Meta सोबतच्या चर्चेवर सरकारी अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया