युजीन जागतिक युवा २० वर्षांखालील अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या आशिष यादवने पुरुषांच्या भालाफेक प्रकारात रौप्यपदक जिंकून देशाचे पदकांचे खाते उघडले आहे.
दुसरीकडे, राष्ट्रीय वरिष्ठ विक्रमधारक पूजा सिंह हिने महिलांच्या उंच उडी प्रकारात अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. शुक्रवारी झालेल्या भालाफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीत १९ वर्षीय आशिष यादव याने तिसऱ्या प्रयत्नात ७४.०९ मीटर भाला फेकून रौप्यपदकावर आपले नाव कोरले. या स्पर्धेत उतरलेला दुसरा भारतीय खेळाडू टी. धरणीधरन याने ७२.३५ मीटर कामगिरीसह सहावे स्थान पटकावले.
आशिषची ही कामगिरी मार्च महिन्यात पटियाला येथे झालेल्या 'इंडियन ओपन' स्पर्धेतील त्याच्या ७४.४९ मीटरच्या वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरीपेक्षा अवघ्या ४० सेंटीमीटरने कमी राहिली. दोन वेळच्या ऑलिम्पिक पदक विजेत्या नीरज चोप्रानंतर या स्पर्धेत भालाफेकीत पदक जिंकणारा आशिष हा दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. नीरजने २०१६ मध्ये पोलंड येथे झालेल्या स्पर्धेत ८६.४८ मीटर भाला फेकून सुवर्णपदक जिंकले होते आणि जागतिक ज्युनियर विक्रम रचला होता.
या प्रकारात दक्षिण आफ्रिकेच्या जॅन-हेड्रिक हेमन्स याने आपल्या सहाव्या व अंतिम प्रयत्नात ८०.५० मीटर कामगिरी नोंदवत सुवर्णपदक मिळवले, तर डॉमिनिकाच्या अडिसन जेम्स याने ७३.८९ मीटर कामगिरीसह कांस्यपदक जिंकले.
पुरुषांच्या ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत दिवशी ४५.८१ सेकंदांची वेळ नोंदवून २० वर्षांखालील गटात राष्ट्रीय विक्रम मोडणारा मोहम्मद अशफाक अंतिम फेरीत ४६.२० सेकंदांच्या वेळेसह आठव्या स्थानावर राहिला. या शर्यतीत अमेरिकेच्या जयडेन डिलॉन याने ४४.४७ सेकंदांच्या स्पर्धा विक्रमासह सुवर्णपदक तर त्याचाच देशसहकारी क्विन्सी विल्सन याने ४४.६२ सेकंदांसह रौप्यपदक पटकावले. दक्षिण आफ्रिकेच्या लिंडर्ट कुकेमोअर याने ४४.९६ सेकंदांची वेळ नोंदवत कांस्यपदक पटकावले.
दरम्यान, पूनमला महिलांच्या भालाफेकच्या अंतिम फेरीत स्थान मिळवता आले नाही. पात्रता गटात ती आठव्या, तर एकूण क्रमवारीत १३व्या स्थानावर राहिली. तिची दिवसातील सर्वोत्तम कामगिरी ४८.८१ मीटर इतकी होती.
उंचउडीत पूजा सिंह अंतिम फेरीत
दुसऱ्या बाजूला, १९ वर्षीय पूजा सिंह हिने महिलांच्या हायजम्य पात्रता फेरीत १.७९ मीटरची उंची पार करत अंतिम फेरी गाठली. दोन पात्रता गटांमधील ज्या १४ खेळाडूंनी १.७९ मीटरची उंची यशस्वीरीत्या पार केली, त्या सर्वांना अंतिम फेरीत स्थान देण्यात आले. पूजाच्या नावावर १.९३ मीटरचा राष्ट्रीय वरिष्ठ विक्रम आहे.
लांबउडीत शाहनवाझ, जिथीन अंतिम फेरीत
पुरुषांच्या लांब उडीच्या पात्रता फेरीत शाहनवाझ खान आणि जितिन अर्जुन यांनी अंतिम फेरीत प्रवेश केला. शाहनवाझने अ गटामध्ये चौथे, तर एकूण क्रमवारीत पाचवे स्थान मिळवले. त्याने तिसऱ्या आणि अंतिम प्रयत्नात ७.७३ मीटर लांब उडी मारत अंतिम फेरीतील स्थान निश्चित केले. जितिन अर्जुननेही अंतिम फेरी गाठली. त्याने तिसऱ्या आणि अंतिम प्रयत्नात ७.५७ मीटर अंतराची नोंद करत एकूण १२वे स्थान मिळवले. अंतिम फेरीसाठी पात्र ठरलेल्या खेळाडूमध्ये तो शेवटच्या म्हणजेच १२व्या स्थानावर राहिला.
मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्याकडून अभिनंदन
देहराडून : उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी शनिवारी भारतीय भालाफेकपटू आशिष यादवचे अभिनंदन केले आहे. आशिषच्या या यशाबद्दल अभिनंदन करताना मुख्यमंत्री धामी यांनी म्हटले की, "आशिष यादवने जागतिक युवा अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये ७४.०९ मीटरच्या शानदार फेकीसह रौप्यपदक पटकावले आहे. ही उत्कृष्ट कामगिरी त्याच्या प्रतिभा, मेहनत आणि समर्पणाची पावती आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल आशिष यादवचे हार्दिक अभिनंदन आणि आगामी उज्ज्वल भविष्यासाठी अनेक शुभेच्छा."