Asian Games 2026 : सुवर्ण वर्षाव सुरूच; आशियाई स्पर्धेत भारताची दमदार कामगिरी X
क्रीडा

Asian Games 2026 : सुवर्ण वर्षाव सुरूच; आशियाई स्पर्धेत भारताची दमदार कामगिरी

भारतीय पुरुष क्रिकेट आणि हॉकी संघांनी अपेक्षेप्रमाणे आपापली विजेतेपदे कायम राखली; मात्र अमरावतीची १७वर्षीय तिरंदाज कुमकुम मोहोड आणि गोल्फपटू प्रणवी उर्स यांनी अनपेक्षित ऐतिहासिक कामगिरी करत भारताच्या अखेरच्या टप्यातील सुवर्ण वर्षावात भर घातली.

Swapnil S

नागोया : भारतीय पुरुष क्रिकेट आणि हॉकी संघांनी अपेक्षेप्रमाणे आपापली विजेतेपदे कायम राखली; मात्र अमरावतीची १७वर्षीय तिरंदाज कुमकुम मोहोड आणि गोल्फपटू प्रणवी उर्स यांनी अनपेक्षित ऐतिहासिक कामगिरी करत भारताच्या अखेरच्या टप्यातील सुवर्ण वर्षावात भर घातली. त्यांच्या कामगिरीच्या जोरावर भारताने आशियाई क्रीडा स्पर्धेत शनिवारी २१ सुवर्णांसह एकूण ८५ पदकांची कमाई करत चौथे स्थान मिळवले.

मागील स्पर्धेत भारताने मिळवलेल्या १०६ पदकांची पुनरावृत्ती यावेळी करता आली नाही. मात्र, ८५ पदकांची कामगिरी समाधानकारक ठरली. विशेषतः नेमबाज आणि बॅडमिंटनकडून अधिक अपेक्षा होत्या. भारताने अखेरीस २१ सुवर्ण, २७ रौप्य आणि ३७ कांस्यपदके मिळवली.

या २१ सुवर्णपदकांपैकी तब्बल ११ सुवर्णपदके अखेरच्या दोन दिवसांत मिळाली. शनिवारचा दिवस भारतासाठी जल्लोषाचा ठरला. क्रिकेट आणि हॉकीतील स्टार खेळाडूंनी शानदार कामगिरी करत देशाला सुवर्णपदके मिळवून दिली. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघाने पाकिस्तानचा १९ धावांनी पराभव केला. त्याचवेळी काकामिगाहारा येथे कर्णधार हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखाली भारतीय हॉकी संघाने अंतिम सामन्यात मलेशियाचा ५-१ असा धुव्वा उडवत सुवर्णपदक पटकावले. हॉकीतील या सुवर्णपदकामुळे भारताला २०२८च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकसाठी थेट पात्रताही मिळाली.

ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या अमन सेहरावत पिछाडीवरून सरशी साधत ५७ किलो वजनी गटात सुवर्णपदकाला गवसणी घातली. मात्र, शनिवारी सर्वाधिक चर्चेत राहिलेली कामगिरी होती ती कुमकुम आणि प्रणवीची. कुमकुम आशियाई क्रीडा स्पर्धेतील वैयक्तिक रिकर्व्ह प्रकारात सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला तिरंदाज ठरली, तर प्रणवीने गोल्फमध्ये सुवर्णपदकावर कब्जा केला.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

शिवाजी पार्कवर विनापरवानगी आंदोलन; ५०० जणांवर गुन्हे, दीपकेंसह आयोजकांचा समावेश

जंतरमंतरवर १५० आंदोलक ताब्यात; नेहा बोरा, योगेंद्र यादव, प्रशांत भूषण यांचा समावेश

विकेंडला घरच्यांना द्या खास ट्रीट! अशी बनवा खमंग हैदराबादी चिकन बिर्याणी

ऑक्टोबर महिना कसा जाईल? बघा तुळ आणि वृश्चिक राशीचे भविष्य

आजचे राशिभविष्य, ४ ऑक्टोबर २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत