काकामिगाहारा : मुसळधार पावसात झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील अंतिम साखळी सामन्यात भारतीय हॉकी संघाने बांगलादेशचा १०-० असा फडशा पाडला. कर्णधार हरमनप्रीत सिंगने साकारलेल्या शानदार हॅटट्रिकच्या जोरावर भारताने अ-गटात सलग पाचवा विजय नोंदवून अव्वल स्थान पटकावले. आता १ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या उपांत्य फेरीत भारताची पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी गाठ पडणार आहे. दुसरी उपांत्य लढत मलेशिया-दक्षिण कोरिया यांच्यात रंगेल.
भारताने अ-गटात इंडोनेशिया, श्रीलंका, जपान, दक्षिण कोरिया आणि बांगलादेशचा पराभव करत ४५ गोल फरकासह आपले वर्चस्व सिद्ध केले. आता महत्त्वाच्या उपांत्य सामन्यापूर्वी भारतीय संघाला दोन दिवसांची विश्रांती मिळणार आहे. बांगलादेशविरुद्ध भारताकडून अभिषेक (तिसरे मिनिट), जुगराज सिंग (२२वे मिनिट), कर्णधार हरमनप्रीत (२७वे, ४०वे, ४५वे मिनिट), सुखजीत सिंग (३२वे मिनिट), शिलानंद लाक्रा (४४वे, ४५ वे मिनिट), संजय (५९वे मिनिट) आणि मनदीप सिंग (६०वे मिनिट) यांनी गोल नोंदवले.
मुसळधार पावसामुळे मैदान जलमय झाले होते, तरीही भारतीय खेळाडूंनी उत्कृष्ट शारीरिक तंदुरुस्तीच्या जोरावर सामन्यावर पकड मिळवली. याआधी पाकिस्तान आणि ओमान यांच्यातील सामना मुसळधार पावसामुळे १५ मिनिटे स्थगित करावा लागला होता, ज्यामुळे पुढील सामन्यांच्या वेळेत बदल करण्यात आला आणि सामना ३० मिनिटे उशिराने सुरू झाला. सामन्याच्या तिसऱ्याच मिनिटाला संजयच्या पासवर अभिषेकने रिव्हर्स हिटद्वारे गोल करत भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली.
दुसऱ्या सत्रात पावसाचा जोर वाढल्याने मैदान तलावाप्रमाणे झाले. २२व्या मिनिटाला मनदीप सिंगला बांगलादेशच्या बचावपटूंनी रोखल्याने भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला. जुगराज सिंगचा ड्रॅग-फ्लिक बचावपटूच्या पायाला लागल्याने पंचांनी पेनल्टी स्ट्रोक दिला, ज्याचे जुगराजने गोलमध्ये रुपांतर करत आघाडी २-० केली.
मध्यंतरानंतर ३२व्या मिनिटाला दिलप्रीत सिंग आणि सुखजीत सिंग यांच्या सुरेख समन्वयातून सुखजीतने भारताचा चौथा गोल नोंदवला. ४०व्या मिनिटाला विवेक प्रसादने मिळवलेल्या पेनल्टी कॉर्नरवर हरमनप्रीतने ५-० अशी आघाडी मिळवून दिली. शिलानंद लाक्राने ४४व्या आणि ४५व्या मिनिटाला सलग दोन गोल केले. ६०व्या मिनिटाला मनदीपने गोल करत विजय पक्का केला.
महिलांची बुधवारी दक्षिण कोरियाशी गाठ
महिलांच्या विभागात ब-गटातून अग्रस्थान मिळवत आगेकूच केलेल्या भारतीय संघाची उपांत्य फेरीत दक्षिण कोरियाशी गाठ पडेल. बुधवार, ३० सप्टेंबर रोजी ही लढत होईल. भारताने साखळीत सलग पाच सामने जिंकताना अनुक्रमे उझबेकिस्तान, इंडोनेशिया, थायलंड, जपान व सिंगापूर यांना धूळ चारली. कोरियाने अ-गटातून दुसऱ्या स्थानासह आगेकूच केली. दुसऱ्या उपांत्य लढतीत चीन-जपान आमनेसामने येतील.