नागोया : हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध करत सलग दुसरे सुवर्णपदक पटकावले. मंगळवारी झालेल्या एकतर्फी अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेचा १४७ धावांनी धुव्वा उडवला. फलंदाजांच्या शानदार कामगिरीनंतर गोलंदाजांनी केलेल्या प्रभावी माऱ्यामुळे महिला संघाने यंदाच्या आशियाई स्पर्धेत भारताच्या खात्यात पहिल्या सुवर्णपदकाची नोंद केली.
विक्रमी आठव्यांदा टी-२० आशिया चषक उंचावल्यानंतर भारतीय महिला क्रिकेट संघ यंदा सलग दुसऱ्या आशियाई सुवर्णाच्या निर्धाराने जपानमध्ये दाखल झाला होता. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात महिला संघाने २०२३मध्ये सुवर्णपदक पटकावले होते. यंदा महिलांच्या विभागात एकूण आठ संघ सहभागी झाले असून थेट उपांत्यपूर्व फेरीपासूनच सामने खेळवण्यात आले. भारताने उपांत्यपूर्व लढतीत जपानला, तर उपांत्य फेरीत बांगलादेशला सहज धूळ चारली. दुसरीकडे श्रीलंकेने पाकिस्तानला नमवून अंतिम फेरी गाठली होती. त्यामुळे दोन्ही संघांत कडवी झुंज अपेक्षित होते. मात्र भारताने पूर्णपणे वर्चस्व गाजवले.
कूर्गी स्पोर्ट्स पार्क, निशिन येथे झालेल्या अंतिम सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ३ बाद २१६ धावांचा डोंगर उभारला. सलामीवीर स्मृती मानधनाने ४५ चेंडूंत ७९ धावांची शानदार खेळी केली. तसेच शफाली वर्माने २९ चेंडूंत ४८, तर रिचा घोषने २२ चेंडूंत नाबाद ४९ धावा फटकावल्या. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या इतिहासातील ही सर्वोच्च धावसंख्या ठरली. शफाली व स्मृतीने १० षटकांत ९९ धावांची सलामी नोंदवली. हरमनप्रीतने १९, तर भारती फुलमाळीने नाबाद ७ धावा केल्या.
२१७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ १५.४ षटकांत अवघ्या ६९ धावांत गारद झाला. श्रीलंकेची कर्णधार चमारी अटापटू हिने २१ चेंडूंत २९ धावा केल्या, मात्र इतर कोणत्याही फलंदाजाला भारतीय गोलंदाजीसमोर टिकता आले नाही. भारताकडून दीप्ती शर्माने ६ धावा देत ३ बळी घेतले, तर शफालीने ३ धावा देत २ आणि श्री चरणी हिने २ बळी मिळवले. यापूर्वी झालेल्या कांस्यपदकाच्या सामन्यात पाकिस्तानने बांगलादेशचा ३१ धावांनी पराभव केला.
“स्पर्धेपूर्वी आम्ही अजिंक्य राहण्याबाबत आणि स्वतःसाठी निश्चित केलेल्या उच्च दर्जाच्या खेळाबाबत चर्चा केली होती. प्रत्येक खेळाडूने सकारात्मक दृष्टिकोनातून हा सामना खेळला, हे पाहून खूप समाधान वाटले. अनुभवी आणि नव्या खेळाडूंचा समतोल योग्य ठरला,” असे भारतीय कर्णधार हरमनप्रीत हिने सामन्यानंतर सांगितले. एकूणच भारताने लौकिकाला साजेसा खेळ करून जेतेपद मिळवले.
२१६ भारताने (२१६) आशियाई स्पर्धेच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या नोंदवली. यापूर्वी २०२३मध्ये हाँगकाँगने मोंगोलियाविरुद्ध २०२ धावा केल्या होत्या.
२ भारतीय महिलांचे हे क्रिकेटमधील दुसरे आशियाई सुवर्णपदक ठरले. २०१० व २०१४मध्ये पाकिस्तानने अशी कामगिरी केली होती. भारताने २०२३मध्ये पहिल्याच प्रयत्नात सुवर्ण जिंकले व यंदा सलग दुसरे सुवर्ण पटकावले.
१४७ भारताने श्रीलंकेला १४७ धावांनी धूळ चारून टी-२० प्रकारातील सर्वात मोठा विजय नोंदवला. यापूर्वी २०१८मध्ये भारताने मलेशियाला आशिया चषकात १४२ धावांच्या फरकाने हरवले होते.
१३ भारताने या सामन्यात १३ षटकार लगावत ७८ धावा केल्या. त्या तुलनेत श्रीलंकेचा संघ ६९ धावांतच गारद झाला. टी-२० क्रिकेटमध्ये एखाद्या संघाने षटकारांसह केलेल्या धावा पराभूत संघाच्या एकूण धावांपेक्षा अधिक ठरण्याची ही सातवीच वेळ आहे.
संक्षिप्त धावफलक
भारत : २० षटकांत ३ बाद २१६ (स्मृती मानधना ७९, शफाली वर्मा ४८, रिचा घोष नाबाद ४९; चामुंडी प्रबोदा १/३४) विजयी वि.
श्रीलंका : १५.४ षटकांत सर्व बाद ६९ (चामरी अटापटू २९; दीप्ती शर्मा ३/६)