Asian Games 2026 : रिले शर्यतीत महिलांची सुवर्णदौड (Photo-X/PTI)
क्रीडा

Asian Games 2026 : रिले शर्यतीत महिलांची सुवर्णदौड

आशियाई क्रीडा स्पर्धेत मंगळवारी किरण पहल, पवित्रा माचेत्तिरा, प्राची चौधरी आणि विथ्या रामराज या भारतीय चौकटीने ऐतिहासिक कामगिरी करत ॲथलेटिक्समधील महिलांच्या ४ बाय ४०० मीटर रिले शर्यतीत सुवर्णपदक पटकावले.

Swapnil S

नागोया : आशियाई क्रीडा स्पर्धेत मंगळवारी किरण पहल, पवित्रा माचेत्तिरा, प्राची चौधरी आणि विथ्या रामराज या भारतीय चौकटीने ऐतिहासिक कामगिरी करत ॲथलेटिक्समधील महिलांच्या ४ बाय ४०० मीटर रिले शर्यतीत सुवर्णपदक पटकावले.

भारतीय संघाने ३ मिनिटे २९.६९ सेकंद वेळ नोंदवत प्रथम क्रमांक पटकावला आणि ॲथलेटिक्समधील यंदाचे पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. या स्पर्धेत बहारीन आणि चीन अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानी राहिले. या विजयामुळे भारताची पवित्रा हिच्या कारकीर्दीत आणखी एक सुवर्ण अध्याय जोडला गेला आहे. यापूर्वी २०१४ आणि २०१८ मधील आशियाई स्पर्धेतही तिने ४ बाय ४०० मीटर रिले संघासहित सुवर्णपदक जिंकले होते.

दुसरीकडे विथ्या हिने याआधी सोमवारी महिलांच्या ४०० मीटर अडथळा शर्यतीत वैयक्तिक सर्वोत्कृष्ट ५४.७५ सेकंद वेळ नोंदवत कांस्यपदक जिंकले होते, तसेच पी. टी. उषा यांच्या ४२ वर्षे जुन्या राष्ट्रीय विक्रमाला गवसणी घातली होती. मंगळवारी अंतिम फेरीत विथ्याने अखेरच्या टप्प्यात उत्कृष्ट वेग घेत चीन व बहारीनच्या खेळाडूंना मागे टाकत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. किरणने सुरुवात करताना भारताला तिसऱ्या क्रमांकावर नेले. त्यानंतर अनुभवी पवित्राने भारताला आघाडीवर नेले. प्राचीने ती आघाडी कायम ठेवली आणि विथ्याने विजयीरेषा गाठली.

सुवर्णविजेत्यांचे मोदींकडून कौतुक

“आशियाई क्रीडा स्पर्धेतील महिलांच्या ४×४०० मीटर रिले शर्यतीत शानदार कामगिरी केल्याबद्दल किरण पहल, पवित्रा, प्राची आणि विथ्या यांचे अभिनंदन. त्यांच्या वेगवान कामगिरीने आणि जिद्दीने भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. भारतीय ॲथलेटिक्ससाठी हा अभिमानाचा क्षण आहे आणि सांघिक प्रयत्नांतून काय साध्य करता येते, याचे हे एक उत्तम उदाहरण आहे. या खेळाडूंना त्यांच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा,” अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

आंतरराष्ट्रीय स्तरावर रोजगाराच्या संधी उपलब्ध करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

Mumbai : लालबागच्या राजाच्या प्रसादातून वीज निर्मिती; ४२ टन ओला कचरा जैविक प्रक्रियेत, रुग्णालयातील वॉर्डला मिळणार वीज

Mumbai : पालिका शाळांत आता रोबोटिक्सचे धडे; IIT मुंबईच्या मदतीने तंत्रज्ञानाचे शिक्षण, ५० शिक्षक-अधिकाऱ्यांचा अभ्यास दौरा

खंडणी प्रकरणात निलेश घायवळसह सर्व आरोपी निर्दोष

AI बनतोय मुलांचा शिक्षण सहाय्यक; 'क्राय' संस्थेच्या सर्वेक्षणातील निष्कर्ष