नागोया : महाराष्ट्राच्या अमरावती येथील युवा तिरंदाज कुमकुम मोहोड हिने दबावाच्या क्षणी अफलातून संयम राखत इतिहास घडवला. दक्षिण कोरियाच्या ओये जिनचा शूट-ऑफमध्ये ६-५ असा पराभव करत तिने आशियाई क्रीडा स्पर्धेतील महिलांच्या वैयक्तिक रिकर्व्ह प्रकारात भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले.
या विजयासह कुमकुम ही आशियाई क्रीडा स्पर्धेच्या वैयक्तिक रिकर्व्ह प्रकारात पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला तिरंदाज ठरली. तिच्या विजयावेळी भारतीय तिरंगा फडकला आणि राष्ट्रगीत सुरू होताच कुमकुमच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. "माझा स्वतःवर विश्वास होता. संघानेही सकारात्मक दृष्टिकोनातून मला साथ दिली," असे कुमकुमने विजयानंतर सांगितले.
अंतिम सामना अत्यंत चुरशीचा झाला. कुमकुमने सुरुवातीला ८ गुणांचा नेम साधल्याने पहिला सेट गमावला. मात्र, दुसऱ्या सेटमध्ये तिने बरोबरी साधली आणि तिसऱ्या सेटमध्ये सलग तीन वेळा १० गुण मिळवत आघाडी घेतली.
चौथ्या सेटमध्ये पुन्हा ८ गुणांचा नेम साधल्याने ओ ये-जिनने सेट जिंकत सामना ४-४ असा बरोबरीत आणला. निर्णायक पाचव्या सेटमध्ये कुमकुमने पुन्हा तीन अचूक १० गुण मिळवत सामना ५-५ असा बरोबरीत आणला.
जगज्जेत्यांना दिली मात
कुमकुमचा अंतिम फेरीपर्यंतचा प्रवासही उल्लेखनीय ठरला. उपांत्यपूर्व फेरीत तिने विद्यमान विश्वविजेत्या कांग चे-यॉन्गचा ६-४ असा पराभव केला. त्यानंतर उपांत्य फेरीत माजी जागतिक क्रमवारीतील अव्वल आणि विश्व अजिंक्यपद स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या चीनच्या झू जिंगयीचा ६-२ असा पराभव करत अंतिम फेरी गाठली.
तीन पदकांसह ऐतिहासिक स्पर्धा
कुमकुमसाठी ही आशियाई क्रीडा स्पर्धा संस्मरणीय ठरली. तिने एकूण तीन पदके (दोन सुवर्ण आणि एक रौप्य) जिंकली. कुमकुमने अंकिता भक्त आणि कीर्ती शर्मा यांच्यासोबत महिलांच्या सांघिक रिकर्व्ह प्रकारात सुवर्णपदक पटकावले. त्यानंतर शुक्रवारी धीरज बोम्मदेवरासोबत मिश्र सांघिक प्रकारात तिने रौप्यपदक जिंकले. "ही पदके गेल्या काही महिन्यांतील माझ्या मेहनतीचे आणि प्रयत्नांचे फलित आहेत. माझ्या संघाचे, भारतीय धनुर्विद्या संघटनेचे आणि क्रीडा प्राधिकरणांचे मी आभार मानते," असे कुमकुमने सांगितले.
लॉस एंजेलिस ऑलिम्पिकसाठी कोटा
कुमकुमच्या अंतिम फेरीतील प्रवेशामुळे २०२८च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकसाठी भारताला उपलब्ध असलेल्या दोन वैयक्तिक कोट्यांपैकी एक कोटा तिला मिळाला आहे. हा कोटा देशाच्या नावावर असून कुमकुमला थेट ऑलिम्पिक संघात स्थान मिळालेले नाही.
मिठाईचे दुकाने ते आशियाई सुवर्णपदक...
महाराष्ट्राच्या अमरावती येथील १७ वर्षीय तिरंदाज कुमकुम मोहोड हिने आशियाई क्रीडा स्पर्धेत इतिहास रचत भारताला महिलांच्या वैयक्तिक रिकर्ब तिरंदाजी प्रकारात पहिले-वहिले सुवर्णपदक मिळवून दिले. मिठाईच्या डब्यांचा लहानसा व्यवसाय चालवणारे आणि आर्थिक अडचणींचा सामना करणारे कुमकुमचे वडील अनिल यांनी मुलीच्या प्रशिक्षणात कोणतीही कमतरता पडू दिली नाही. आठ वर्षांच्या कठोर मेहनतीनंतर कुमकुमने हे मोठे यश मिळवले असून, आता २०२८ च्या ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकण्याचे तिचे स्वप्न असल्याचे तिचे वडील अनिल यांनी सांगितले. अमरावतीच्या 'राधे आर्चरी अकॅडमी 'मध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या कुमकुमने सोशल मीडियापासून दूर राहत आणि युट्यूबचे अॅप्लिकेशन डिलीट करून पूर्णपणे खेळावर लक्ष केंद्रित केले आहे. सकाळी सहा वाजल्यापासून सराव सुरू करणाऱ्या कुमकुमने कठोर परिश्रमांच्या बळावर हे यश संपादन केले आहे. कुमकुमच्या या ऐतिहासिक यशामुळे तिचा प्रशिक्षक प्रफुल्ल डंगे यांना अजिबात आश्चर्य वाटले नाही, कारण ती अत्यंत शिस्तप्रिय आणि अभ्यासू खेळाडू आहे. महाराष्ट्र तिरंदाजी असोसिएशनचे सचिव प्रमोद चांदूरकर यांनीही कुमकुमच्या या यशाचे कौतुक केले असून, आदिती स्वामी आणि ओजस देवतळे यांसारख्या खेळाडूंनी निर्माण केलेल्या प्रेरणादायी वातावरणामुळे तरुण खेळाडूंना प्रोत्साहन मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.