आशियाई क्रीडा स्पर्धा: नीरजच्या अनुपस्थितीत यशवीरला संधी; ॲथलेटिक्ससाठी भारताचा तब्बल ७७ खेळाडूंचा चमू (Photo-X)
क्रीडा

आशियाई क्रीडा स्पर्धा: नीरजच्या अनुपस्थितीत यशवीरला संधी; ॲथलेटिक्ससाठी भारताचा तब्बल ७७ खेळाडूंचा चमू

जपानमधील आयची-नागोया येथे १९ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय ॲथलेटिक्स महासंघाने (एएफआय) ७७ सदस्यीय ट्रॅक आणि फील्ड संघाची घोषणा केली आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे १९ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय ॲथलेटिक्स महासंघाने (एएफआय) ७७ सदस्यीय ट्रॅक आणि फील्ड संघाची घोषणा केली आहे. लुधियाना येथे आयोजित पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आलेल्या या संघात ३४ पुरुष आणि ४३ महिला खेळाडूंचा समावेश आहे.

दुखापतीमुळे तारांकित भालाफेकपटू नीरज चोप्रा स्पर्धेतून बाहेर पडला असून त्याच्या जागी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक विजेत्या यशवीर सिंगला संघात स्थान देण्यात आले आहे. दुसरीकडे, उत्तेजक द्रव्य चाचणीप्रकरणी राष्ट्रीय अँटी-डोपिंग एजन्सीने (नाडा) नोटीस बजावल्याने लांब अंतराचा धावपटू अभिषेक पाल याला संघातून वगळण्यात आले आहे. अभिषेकच्या नमुन्यात महिला प्रजनन औषधाचे अंश आढळून आले होते, जे निश्चित मर्यादेपेक्षा कमी असले तरी तपास प्रलंबित असल्याने एएफआयने कोणताही धोका न पत्करता हा निर्णय घेतला आहे, असे एएफआयच्या नियोजन आयोगाचे प्रमुख ललित भानोट यांनी स्पष्ट केले. तसेच ग्लास्गो राष्ट्रकुल खेळादरम्यान डाव्या पायाला दोन स्ट्रेस फ्रॅक्चर झाल्यामुळे ११० मीटर अडथळा शर्यतीतील धावपटू तेजस शिरसे यालाही संघातून वगळावे लागले आहे.

क्रीडा मंत्रालयाने सुरुवातीला जाहीर केलेल्या ७३ सदस्यीय संघातून अभिषेक आणि तेजस यांना वगळल्यानंतर, भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या (आयओए) विनंतीवरून सहा नव्या खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये २०० मीटर धावपटू हरिता भद्रा, ४०० मीटर धावपटू किरण पहल, पोल व्हॉल्टर सिंधुश्री जी, ट्रिपल जम्पर आय. आशा इलांगो, थाळीफेकपटू सान्या यादव आणि हातोडाफेकपटू प्रवीण कुमार यांचा समावेश आहे. 'एएफआय'चे अध्यक्ष बहादूर सिंग सागू आणि भानोट यांनी हाच अंतिम संघ असल्याचे जाहीर केले.

गेल्या आशियाई खेळांमध्ये सुवर्ण आणि रौप्यपदक जिंकणाऱ्या अविनाश साबळेला ३००० मीटर स्टीपलचेससह ५००० मीटर शर्यतीतही भाग घेण्याची परवानगी देण्यात यावी, अशी विनंती आयोजकांना करण्यात आली आहे. १० सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत होणाऱ्या स्पर्धेत १३ मिनिटे ३९.१८ सेकंदांची पात्रता वेळ पार केल्यास त्याला या स्पर्धेत संधी मिळेल. याशिवाय गुलवीर सिंग आणि पारुल चौधरी हे प्रत्येकी तीन प्रकारांमध्ये भाग घेणार आहेत. भारतीय संघ १२ सप्टेंबर रोजी जपानला रवाना होणार आहे.

हे महत्त्वाचे

२०२२च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने ॲथलेटिक्ससाठी ६८ खेळाडूंचा चमू पाठवला होता. भारताने त्यावेळी पदकांचे शतक गाठताना १०६ पदके जिंकली होती. त्यामध्ये २८ सुवर्ण, ३८ रौप्य, ४० कांस्यपदकांचा समावेश होता. भारत पदकतालिकेत चौथ्या स्थानी होता. नीरज व किशोर जेना यांनी भालाफेकीत अनुक्रमे सुवर्ण व कांस्यपदक जिंकले होते. आता नीरजच्या अनुपस्थितीत यशवीरकडून अपेक्षा असतील. तो अपेक्षेवर खरा उतरेल की नाही, हे पाहणे रंजक ठरेल.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

राज्याच्या 'विधि व न्याय' विभागाच्या सचिवांना HC चा दणका; बजावली अवमान नोटीस, माफीनामाही फेटाळला

नवी मुंबई विमानतळावरून ३० लाख प्रवाशांचा प्रवास; ४६ शहरांशी हवाई जोडणीचा विस्तार

...तरच व्यापार करार! भारताला सवलतीचे दर द्या; केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांचा अमेरिकेला इशारा

Palghar : रेशनकार्ड काढून देण्यासाठी लाचेची मागणी; तहसील कर्मचाऱ्याला ACB ने रंगेहाथ पकडले

Mumbai : बीकेसी-कुर्ला मार्गावर डबलडेकर बस चालवणे अशक्य; उंचीमुळे १५० नवीन ईव्ही डबलडेकर बस पुन्हा रखडल्या