Credits: Twitter
क्रीडा

सूर्या, श्रेयसच्या कामगिरीकडे लक्ष! ­­­­­बुची बाबू स्थानिक स्पर्धेला आजपासून प्रारंभ; सर्फराझकडे मुंबईचे नेतृत्व

बुची बाबू या प्रतिष्ठेच्या आणि तितक्याच जुन्या देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेला मंगळवारपासून प्रारंभ होणार आहे.

Swapnil S

तामिळनाडू : बुची बाबू या प्रतिष्ठेच्या आणि तितक्याच जुन्या देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेला मंगळवारपासून प्रारंभ होणार आहे. लाल चेंडूने खेळवण्यात येणाऱ्या या स्पर्धेत मुंबईसह १२ संघ सहभागी झाले आहेत. अजिंक्य रहाणेच्या अनुपस्थितीत युवा सर्फराझ खान मुंबईचे नेतृत्व करणार असून या स्पर्धेत प्रामुख्याने सूर्यकुमार यादव आणि श्रेयस अय्यर या खेळाडूंच्या कामगिरीवर चाहत्यांचे लक्ष असेल. मंगळवारी मुंबईसमोर आर. साईकिशोरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या तमिळनाडू क्रिकेट असोसिएशन (टीएनसीए) एकादशचे आव्हान असेल.

सप्टेंबरमध्ये भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध मायदेशात कसोटी मालिका खेळणार आहे. त्यानंतर न्यूझीलंडविरुद्धही ३ कसोटी सामने आहेत. बीसीसीआयने आता कसोटी क्रिकेटमधील संघनिवडीसाठी खेळाडूंना देशांतर्गत स्पर्धेत खेळणे अनिवार्य केले आहे. त्यामुळे भारताच्या कसोटी संघात परतण्यासाठी सूर्यकुमार, श्रेयसला या स्पर्धेसह आगामी दुलीप ट्रॉफीमध्येही चमक दाखवावी लागेल.

दरम्यान, बुची बाबू स्पर्धा ही भारतीय देशांतर्गत क्रिकेट हंगामाची सुरुवात मानली जाते. ही भारतातील सर्वात जुन्या स्पर्धांपैकी एक आहे. मोथावरपू वेंकट महिपती नायडू यांच्या पुढाकाराने या स्पर्धेचे नाव आले आहे. मोथावरपू वेंकट महिपती नायडू यांना बुची बाबू म्हणूनही ओळखले जायचे. बुची बाबू यांना मद्रासमध्ये क्रिकेटची ओळख करून देणारे अग्रणी मानले जाते.

या स्पर्धेत एकूण १२ संघ सहभागी होणार आहेत. यावेळी बुची बाबू स्पर्धेचे आयोजन तामिळनाडूमध्ये होणार आहे. तामिळनाडूतील तिरुनेलवेली, कोईम्बतूर, सेलम आणि नाथम यांचा समावेश आहे. रणजी स्पर्धेत खेळवल्या जाणाऱ्या चार दिवसांच्या फॉरमॅटनुसार ही स्पर्धा होईल. या स्पर्धेतील विजेत्या संघाला ३ लाख रुपये, तर उपविजेत्या संघाला २ लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येईल. त्यामुळे कोण बाजी मारणार, हे पाहणे रंजक ठरेल.

स्पर्धेची गटवारी

  • अ-गट : मध्य प्रदेश, झारखंड, हैदराबाद

  • ब-गट : रेल्वे, गुजरात, टीएनसीए अध्यक्ष एकादश

  • क-गट : मुंबई, हरयाणा, टीएनसीए एकादश

  • ड-गट : जम्मू आणि काश्मीर, छत्तीसगड, बडोदा

मुंबईचा संघ

  • सर्फराझ खान (कर्णधार), सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, अखिल हेरवाडकर, दिव्यांश सक्सेना, मुशीर खान, वेदांत मुरकर, सिद्धार्थ अधात्रो, सुर्यांश शेडगे, शम्स मुलाणी, तनुष कोटियन, हिमांशू सिंग, अथ‌र्व अंकोलेकर, रॉयस्टन डायस, मोहित अवस्थी, स्लेव्हस्टर डीसोजा, जुनैद खान

  • वेळ : सकाळी ९.३० वा.

  • थेट प्रक्षेपण : तामिळनाडू क्रिकेट संघटनेचे ॲप

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी