क्रीडा

ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा: बोपण्णा-एब्डनची अंतिम फेरीत धडक; पुरुष दुहेरीतील पहिल्या ग्रँडस्लॅम जेतेपदासाठी शनिवारी झुंज

बेलारूसची गतविजेती आर्यना सबालेंका आणि चीनची १२वी मानांकित क्विनवेन झेंग यांनी महिला एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.

Swapnil S

मेलबर्न : भारताचा रोहन बोपण्णा आणि त्याचा ऑस्ट्रेलियन सहकारी मॅथ्यू एब्डन यांनी गुरुवारी ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली. जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी विराजमान झालेला ४३ वर्षीय बोपण्णा पुरुष दुहेरीतील पहिल्या ग्रँडस्लॅम जेतेपदापासून अवघा एक पाऊल दूर असून शनिवारी तो यासाठी दावेदारी पेश करेल.

रॉड लेव्हर एरिना येथे झालेल्या पुरुष दुहेरीच्या उपांत्य लढतीत बोपण्णा-एब्डन यांच्या दुसऱ्या मानांकित जोडीने झँग झिझेन आणि थॉमस मॅच या बिगरमानांकित जोडीवर ६-३, ३-६, ७-६ (१०-७) अशी तीन सेटमध्ये मात केली. २ तास आणि २ मिनिटांच्या संघर्षानंतर हा सामना जिंकणाऱ्या बोपण्णा-एब्डनची आता शनिवारी होणाऱ्या अंतिम लढतीत सिमोन बोलेली आणि आंद्रे वॅवासोरी या इटलीच्या बिगरमानांकित जोडीशी गाठ पडेल. एब्डनने यापूर्वी अन्य सहकाऱ्यासह २०२२मध्ये विम्बल्डनच्या पुरुष दुहेरीचे जेतेपद मिळवले होते. बोपण्णा मात्र प्रथमच पुरुष दुहेरीत एखाद्या ग्रँडस्लॅम जेतेपदाला गवसणी घालणार का, याकडे अवघ्या भारताचे लक्ष लागले आहे.

“एब्डन आणि माझी घनिष्ठ मैत्री आहे. त्यामुळे कोर्टवरही आमचा खेळ उत्तम होतो. उपांत्य लढतीत झँग व थॉमस आम्हाला कडवी झुंज देतील, याची कल्पना होती. मात्र त्यांना नमवण्यात यशस्वी ठरल्याचे समाधान आहे. आता अंतिम फेरीचे फारसे दडपण न बाळगता कामगिरीत सातत्य राखण्याचा प्रयत्न करू,” असे बोपण्णा सामन्यानंतर म्हणाला. दोन सेटनंतर दोघांमध्येही बरोबरी असताना तिसरा सेट टायब्रेकरपर्यंत रंगला. तेथे मात्र बोपण्णा व एब्डन यांनी अनुभवाच्या बळावर माजी मारली. बोपण्णानेच शानदार ‘ऐस’ लगावून विजयावर शिक्कामोर्तब केले.

सबालेंका-झेंग अंतिम फेरीत

बेलारूसची गतविजेती आर्यना सबालेंका आणि चीनची १२वी मानांकित क्विनवेन झेंग यांनी महिला एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. दुसऱ्या मानांकित सबालेंकाने अमेरिकेच्या चौथ्या कोको गॉफचा ७-६ (७-२), ६-४ असा सरळ दोन सेटमध्ये पराभव केला. सबालेंकाला दुसरे ग्रँडस्लॅम जिंकण्याची संधी आहे. दुसरीकडे झेंगने युक्रेनच्या बिगरमानांकित डायना यास्त्रेस्काला ६-४, ६-४ अशी सहज धूळ चारून प्रथमच एखाद्या ग्रँडस्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी गाठली.

दरम्यान, शुक्रवारी पुरुष एकेरीच्या उपांत्य सामन्यांमध्ये सर्बियाचा नोव्हाक जोकोव्हिच विरुद्ध इटलीचा जॅनिक सिनर आणि रशियाचा डॅनिल मेदवेदेव विरुद्ध जर्मनीचा अलेक्झांडर झ्वेरेव्ह आमनेसामने येतील. अग्रमानांकित जोकोव्हिचला २५वे ग्रँडस्लॅम जेतेपद खु‌णावत आहे. दुसरा मानांकित कार्लोस अल्कराझ स्पर्धेबाहेर गेल्याने जोकोव्हिचला कोण रोखणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

Maratha Reservation : ''मराठा-कुणबी एकच, जीआरशिवाय उपोषण थांबणार नाही''; शिंदे समितीशी चर्चा : मनोज जरांगे ठाम

Maratha Reservation : शिंदे समितीची मनोज जरांगे यांच्याशी चर्चा; मराठा आरक्षणावर निर्णायक टप्पा?

Maratha Reservation : मराठा वादळाने मुंबईला हादरा; आता माघार नाही – मनोज जरांगेंचा निर्धार; पावसामुळे आंदोलकांचे प्रचंड हाल

मुंबईला पावसाने झोडपले; पुढील तीन दिवस मध्यम पावसाची शक्यता

महायुतीच्या घोडचुकीमुळे मुंबईकर वेठीस; मराठा आंदोलनामुळे मुंबईत गोंधळाची स्थिती