नवी दिल्ली: टी-२० वर्ल्डकप स्पर्धेसाठी भारतात येण्यास नकार देणे बांगलादेशला चांगलेच महागात पडले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) टी-२० वर्ल्डकपसाठी बांगलादेशला डच्चू दिला असून त्यांच्या जागी बदली म्हणून स्कॉटलंड संघाची निवड केली आहे.
आंतरारष्ट्रीय क्रिकेट परिषदेने दिलेल्या माहितीनुसार, बांगलादेशच्या संघाने स्पर्धेतून माघार घेतल्यानंतर त्यांच्या जागी स्कॉटलंड संघ स्पर्धेत सहभागी होईल. नियोजित वेळापत्रकानुसार, बांगलादेशच्या जागी क गटात स्कॉटलंडचा समावेश असेल. या गटात इंग्लंड, इटली, नेपाळ आणि वेस्ट इंडिज हे अन्य संघ आहेत.
आयसीसीकडून जारी करण्यात आलेल्या अधिकृत निवेदनानुसार, स्पर्धेच्या काही दिवसआधी बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या मागण्या पूर्ण करणे शक्य नव्हते. त्यामुळेच हा कठोर निर्णय घ्यावा लागला. भारतामध्ये नियोजित सामन्यांच्या आयोजनासंदर्भात बीसीबीने व्यक्त केलेल्या चिंतांवर तोडगा काढण्यासाठी आयसीसीने सविस्तर प्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतरच हा निर्णय घेण्यात आला आहे, असेही आयसीसीने स्पष्ट केले आहे.
तीन आठवड्यांहून अधिक काळ आयसीसी आणि बीसीबी यांच्यात या भारतातील सुरक्षेच्या मुद्द्यावरून बांगलादेश क्रिकेट बोर्ड आणि आयसीसीमध्ये चर्चा सुरू होती. बीसीबीने भारतीय मैदानात खेळण्यासाठी नकार देताना मांडलेल्या सर्व मुद्द्यांचा आढावा घेण्यात आला. अंतर्गत आणि बाह्य तज्ज्ञांकडून स्वतंत्र सुरक्षा मूल्यांकन करून त्यावर सखोल विचार करण्यात आला. आयसीसी बिझनेस कॉर्पोरेशन बोर्डासोबत झालेल्या चर्चासह अनेक टप्प्यांत बीसीबीला ही आश्वासने देण्यात आली होती.
आयसीसीच्या मूल्यांकनानुसार, भारतामध्ये बांगलादेशच्या राष्ट्रीय संघाला, अधिकाऱ्यांना किंवा चाहत्यांना कोणताही धोका नव्हता. या निष्कर्षांवर विचार केल्यानंतर आयसीसीने ठरवले की, सामन्यांच्या वेळापत्रकात बदल करणे योग्य नाही. बुधवारी झालेल्या बैठकीनंतर बांगलादेश क्रिकेट बोर्डाला २४ तासांची मुदत देण्यात आली होती, ज्यामध्ये त्यांनी निश्चित वेळापत्रकानुसार भारतात सहभागी होणार की नाही, याची खात्री द्यायची होती. ठरलेल्या वेळेत कोणतीही पुष्टी न मिळाल्याने आयसीसीने बदली संघाची प्रक्रिया राबवली.