डार्विन : बांगलादेशच्या तांझिद हसनने आपल्या कारकिर्दीतील केवळ दुसऱ्याच कसोटी सामन्यात पहिले शतक झळकावले. त्याच्या या खेळीच्या जोरावर पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी बांगलादेशने ६ बाद ३५१ धावांपर्यंत मजल मारली असून जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध १५३ धावांची मजबूत आघाडी घेतली आहे.
तांझिदने नॅथन लायनच्या चेंडूवर एक धाव घेत १८८ चेंडूंत आपले शतक पूर्ण केले. या संयमी खेळीत दोन जीवदाने मिळालेल्या तांझिदने मोमिनुल हकसोबत (४९) दुसऱ्या गड्यासाठी १०२ धावांची, तर कर्णधार नजमुल हुसेन शांतोसोबत तिसऱ्या गड्यासाठी ९३ धावांची भागीदारी केली. शांतो ८४ धावांवर बाद झाला. ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात १९८ धावांत गुंडाळल्यानंतर बांगलादेशने दुसऱ्या दिवशी १ बाद ९६ वरून पुढे खेळण्यास सुरुवात केली होती.
दिवसअखेर मेहिदी हसन मिराज (३२) आणि हसन महमूद (१३) यांनी सातव्या गड्यासाठी नाबाद ४३ धावांची भागीदारी करत संघाची पकड मजबूत केली. पॅट कमिन्स, जोश हेझलवूड, मिचेल स्टार्क आणि नॅथन लायम या ऑस्ट्रेलियाच्या प्रमुख गोलंदाजांना बांगलादेशी फलंदाजांनी समर्थपणे रोखून धरले. संघाला जशी गरज होती तशीच खेळी मी केली, असे १०० धावांची खेळी करणारा तांझिद सामन्यानंतर म्हणाला. २००३ नंतर ऑस्ट्रेलियन भूमीवर पहिलीच कसोटी खेळणाऱ्या बांगलादेश संघाने उत्कृष्ट शिस्त दाखवली आहे.
तत्पूर्वी, गुरुवारी पहिल्या दिवशी हसन मेहमूदसह (५५ धावांत ६ बळी) वेगवान गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यापुढे कांगारूंची फलंदाजी ढेपाळली. त्यामुळे बांगलादेशने पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ५३ षटकांत १९८ धावांत गुंडाळला. त्यानंतर बांगलादेशच्या फलंदाजांनी पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा १ बाद ९६ धावांपर्यंत मजल मारली होती.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने ४५ धावांची बिनबाद सुरुवात केली होती. मात्र हसनने आपल्या सलग दोन षटकांत जॅक वेदराल्ड (२३) आणि ट्रेव्हिड हेड (२२) या दोन्ही सलामीविरांना बाद करून ऑस्ट्रेलियाला धक्के दिले. त्यानंतर तस्कीन अहमद (२-५५) आणि इबादत हुसेन (२-३९) यांनी हसनला सुरेख साथ देत ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीला खिंडार पाडले. ऑस्ट्रेलियाकडून केवळ स्टीव्ह स्मिथ लढाऊ खेळ करत ७१ धावांची खेळी केली.
ऑस्ट्रेलियाचे मार्नस लबूशेन, कॅमेरून ग्रीन, कॅरी, ब्यू वेबस्टर हे फलंदाज फारशी छाप पाडू शकले नाहीत. आता बांगलादेशने मजबूत पकड मिळवली आहे.