मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने पुरुष निवड समितीमधील रिक्त जागा भरण्यासाठी मंगळवारी अर्ज मागवले. निवड समितीचे अध्यक्षपद भूषवणाऱ्या अजित आगरकर यांचा कार्यकाल ४ ऑक्टोबर रोजी संपल्यामुळे ही जागा रिक्त झाली आहे.
आगरकरांनी १८ सप्टेंबर रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीनंतर आपल्या कराराला मुदतवाढ देणार नसल्याची माहिती बीसीसीआयला दिली होती. माजी भारतीय फिरकीपटू प्रज्ञान ओझा सध्या पुरुष संघासाठी निवड समितीचे अंतरिम अध्यक्ष म्हणून काम पाहत असून, शिव सुंदर दास, अजय रात्रा आणि आर. पी. सिंह हे इतर सदस्य आहेत.
अर्जाची अंतिम तारीख १४ ऑक्टोबर
बीसीसीआयने आपल्या संकेतस्थळावर पुरुष निवड समितीमधील एका जागेसाठी अर्ज मागवले असून अर्ज करण्याची अंतिम तारीख १४ ऑक्टोबर आहे. प्रज्ञान ओझा, पार्थिव पटेल यांच्यासोबतच व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्या नावाची या जागेसाठी चर्चा आहे. ओझाने २४ कसोटी सामने खेळले आहेत, तर चर्चा असलेल्या पार्थिव पटेलने २५ कसोटी सामने खेळल्यामुळे ते वरिष्ठतेच्या आधारावर ओझा यांच्यापेक्षा पुढे जाऊ शकतात. बीसीसीआयच्या नियमांनुसार उमेदवाराने किमान ७ कसोटी, ३० प्रथम श्रेणी सामने किंवा १० एकदिवसीय आणि २० प्रथम श्रेणी सामने खेळलेले असावेत आणि किमान पाच वर्षे आधी क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली असावी, असा नियम आहे. तर व्हीव्हीएस लक्ष्मण सध्या बीसीसीआयच्या 'सेंटर ऑफ एक्सीलन्स'चे प्रमुख आहेत. नुकत्याच झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ साठी (Asian Games 2026) भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची धुराही व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्या खांद्यावर देण्यात आली होती.