लिव्हरपूल : जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत गुरुवारी भारताच्या जास्मिन लंबोरिया व पूजा राणी या दोघींनी उपांत्य फेरीत धडक मारून पदक निश्चित केले. मात्र दुहेरी जागतिक विजेती निखत झरीनला पराभवाचा धक्का बसल्याने चाहत्यांची निराशा झाली. भारताची आतापर्यंत तीन पदके पक्की झाली आहेत.
लिव्हरपूल, इंग्लंड येथे जागतिक बॉक्सिंग स्पर्धा सुरू असून यामध्ये भारताचे महिला व पुरुष बॉक्सर मिळून २० खेळाडू सहभागी झाले आहेत. यंदा नव्या प्रशासकीय समितीच्या मार्गदर्शनात बॉक्सिंगची जागतिक स्पर्धा होणार आहे. यापूर्वी आयबीए म्हणजेच आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशनच्या अंतर्गत स्पर्धांचे आयोजन केले जायचे. ४ ते १४ सप्टेंबर या काळात रंगणाऱ्या या स्पर्धेत ६५ देशांतील ५५० बॉक्सर्स सहभागी होणार आहेत. यामध्ये १७ खेळाडू हे पॅरिस ऑलिम्पिकमधील पदकविजेते आहेत. त्यामुळे भारताला कडवे आव्हान मिळेल.
महिलांच्या ५७ किलो वजनी गटात जास्मिनने उझबेकिस्तानच्या मामाजोनाव्हाला ५-० अशी धूळ चारली. जास्मिनचे हे पहिलेच जागतिक पदक आहे. तसेच पूजाने ८० किलो वजनी गटात पोलंडच्या एमिलिया कोरेस्काला ३-२ असे पराभूत केले.
मात्र महिलांच्या ५१ किलो वजनी गटात निखतने निराशा केली. टर्कीच्या बुसनाझने निखतवर ५-० असे वर्चस्व गाजवले. २०२२ व २०२३च्या जागतिक स्पर्धेत निखतने सुवर्ण पटकावले होते. मात्र यावेळी ती उपांत्यपूर्व फेरीतच गारद झाली. लव्हलिना बोर्गोहैननेसुद्धा यावेळी निराशा केली.
तत्पूर्वी, दरम्यान, महिलांच्या ८२ किलो वजनी गटातील उपांत्यपूर्व फेरीत २६ वर्षीय नुपूरने उझबेकिस्तानच्या ओल्टोनी सोटीमबेव्हाला ४-१ असे पराभूत केले. त्यामुळे तिचे उपांत्य फेरीतील स्थान पक्के केले. बॉक्सिंगच्या जागतिक स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली, तरी पदक सुनिश्चित होते. कांस्यपदकासाठी वेगळी लढत खेळवली जात नाही. महान बॉक्सर हवा सिंग यांची नात असलेल्या नुपूरने प्रथमच जागतिक स्पर्धेत अशी कामगिरी नोंदवली. ऑलिम्पिकमध्ये ८० किलोच्या वजनी गटाचा समावेश नाही. मात्र तरीही नुपूरने मिळवलेले यश कौतुकास्पद आहे. आता राष्ट्रकुल व आशियाई स्पर्धेतही तिच्या कामगिरीवर लक्ष असेल.