क्रीडा

यू मुंबाला गतवैभव मिळवून देण्याचे कर्णधार सुनीलचे लक्ष्य; प्रो कबड्डी लीगचा ११वा हंगाम आजपासून

यू मुंबाने माझ्यावर विश्वास दर्शवून विक्रमी किमतीत मला खरेदी केले. त्यामुळे आता हा विश्वास सार्थ ठरवण्याची जबाबदारी माझी आहे. प्रो कबड्डीच्या इतिहासातील यशस्वी संघांमध्ये यू मुंबाची गणना केली जाते. त्यामुळे...

ऋषिकेश बामणे

मुंबई : यू मुंबाने माझ्यावर विश्वास दर्शवून विक्रमी किमतीत मला खरेदी केले. त्यामुळे आता हा विश्वास सार्थ ठरवण्याची जबाबदारी माझी आहे. प्रो कबड्डीच्या इतिहासातील यशस्वी संघांमध्ये यू मुंबाची गणना केली जाते. त्यामुळे कर्णधार म्हणून पुन्हा या संघाला गतवैभव मिळवून देण्यास मी आतुर आहे, अशी प्रतिक्रिया कबड्डीपटू सुनील कुमारने व्यक्त केली.

शुक्रवार, १८ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या प्रो कबड्डी लीगच्या ११व्या हंगामासाठी बचावपटू सुनीलवर यू मुंबाच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सुनीलला यू मुंबाने लिलावादरम्यान १ कोटी १५ लाख रुपयांना करारबद्ध केले. स्पर्धेच्या इतिहासातील तो भारताचा सर्वात महागडा बचावपटू ठरला. गेल्या ८ वर्षांपासून प्रो कबड्डी खेळणारा सुनील यंदा प्रथमच यू मुंबाकडून खेळताना दिसेल. तसेच दोन वर्षांपूर्वी जयपूर पिंक पँथर्सकडून खेळताना त्याने प्रो कबड्डी लीग जिंकण्याचाही अनुभव घेतला.

दुसरीकडे २०१४पासून सुरू झालेल्या प्रो कबड्डी लीगच्या दुसऱ्या हंगामाचे यू मुंबाने जेतेपद मिळवले होते. तसेच एकूण ३ वेळा या संघाने अंतिम फेरी गाठली आहे. मात्र गेल्या ३ हंगामांमध्ये मुंबईला बाद फेरी गाठता आलेली नाही. त्यामुळे यावेळी यू मुंबाकडून चांगली कामगिरी अपेक्षित आहे.

“परवेश भैस्वालसोबत पुन्हा एकदा जोडीने खेळायला मिळणार असल्याने मी उत्सुक आहे. तसेच यू मुंबाने माझ्यावर दाखवलेला विश्वास मी सार्थ ठरवेन. यंदाच्या स्पर्धेत आम्ही यू मुंबाला गतवैभव मिळवून देऊ. स्पर्धेपूर्वी झालेल्या शिबिरादरम्यान आम्ही उत्तम सराव केला आहे. आमच्याकडे विविध पर्याय उपलब्ध असून गरजेनुसार आम्ही खेळाडूंना संधी देऊ,” असे सुनील म्हणाला. तसेच प्रो कबड्डीच्या लोकप्रियतेमुळे आणखी देशांत हा खेळ पोहोचेल व एकदिवस ऑलिम्पिकमध्येही कबड्डीचा समावेश होईल, असे भाकीत सुनीलने वर्तवले.

प्रो कबड्डी लीगचा ११वा हंगाम आजपासून

हैदराबाद : प्रो कबड्डी लीगच्या ११व्या हंगामाला शुक्रवार, १८ ऑक्टोबरपासून प्रारंभ होणार आहे. हैदराबाद येथील गचीबोवली स्टेडियमवर तेलुगू टायटन्स विरुद्ध बंगळुरू बुल्स यांच्यातील लढतीद्वारे स्पर्धेची सुरुवात होईल. शुक्रवारी रात्री होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात यू मुंबासमोर दबंग दिल्लीचे आव्हान असेल. नेहमीप्रमाणे ८ व ९ वाजता सामने सुरू होणार असून स्टार स्पोर्ट्स वाहिनीवर थेट प्रक्षेपण करण्यात येईल. नव्या हंगामाच्या निमित्ताने हैदराबादमधील बंजारा हिल्स येथे १२ संघांचे कर्णधार तसेच स्पर्धेचे कमिशनर व मशाल स्पोर्ट्सचे प्रमुख अनुपम गोस्वामी यांच्या उपस्थितीत शानदार कार्यक्रम पार पडला. यावेळी प्रदर्शनीय सामनाही झाला. यंदा १८ ऑक्टोबर ते ९ नोव्हेंबर दरम्यान हैदराबाद, १० नोव्हेंबर ते १ डिसेंबर दरम्यान नोएडा, तर ३ ते २४ डिसेंबर दरम्यान पुणे अशा तीन टप्प्यांमध्ये ही स्पर्धा होईल.

आता 'नाईन्टी'चा फॉर्म्युला! मविआचे तिन्ही प्रमुख पक्ष ८५ नव्हे, प्रत्येकी ९० जागा लढवणार

पूर्व लडाखमधून भारत-चीन सैन्याची माघार सुरू; वेगवेगळ्या दिवशी गस्त घालण्याचा दोन देशांचा निर्णय

ज्ञानवापीच्या अतिरिक्त सर्वेक्षणाची हिंदू पक्षकारांची मागणी फेटाळली; उच्च न्यायालयात दाद मागणार

राष्ट्रवादी अजित पवार गटात 'आयारामां'ची चलती; सात उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

महायुतीचे २७७ जागांवर ठरले; भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांची माहिती