क्रीडा

दुबईतील स्थितीचा भारताला पूर्ण अंदाज! न्यूझीलंडचा फलंदाज विल्यम्सनचे मत

भारतीय संघाविरुद्ध खेळताना तुम्हाला नेहमीच सर्वोत्तम कामगिरी करावी लागते. त्यामुळे आता चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत भारताविरुद्ध खेळण्यास आतुर आहे, असे मत न्यूझीलंडचा फलंदाज केन विल्यम्सनने व्यक्त केले.

Swapnil S

लाहोर : भारतीय संघाविरुद्ध खेळताना तुम्हाला नेहमीच सर्वोत्तम कामगिरी करावी लागते. त्यामुळे आता चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत भारताविरुद्ध खेळण्यास आतुर आहे, असे मत न्यूझीलंडचा फलंदाज केन विल्यम्सनने व्यक्त केले.

“भारतीय संघाला दुबईतील वातावरण तसेच खेळपट्टींचा आता पूर्ण अंदाज आहे. स्पर्धेच्या आयोजनावरून मला काहीही बोलायचे नाही. शेवटी तो निर्णय आयसीसीचा असतो. मात्र आम्हीही दुबईत खेळलेलो आहे. त्यामुळे त्या अनुभवाद्वारे अंतिम फेरीत कामगिरी करू,” असेही विल्यम्सन म्हणाला. “तसेच भारताविरुद्ध साखळी सामना ज्या खेळपट्टीवर झाला, तेथेच अंतिम सामना होईल की नाही, हे आम्हा दोन्ही संघांना ठाऊक नाही. त्यामुळे एखाद्या संघाला खेळपट्टीचा अधिक फायदा होईल, असे मला वाटत नाही,” असेही विल्यम्सनने नमूद केले.

दरम्यान, रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारताने सलग तिसऱ्यांदा आणि एकंदर पाचव्यांदा स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. या स्पर्धेत भारत अद्याप अपराजित असून त्यांना तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी उंचावण्याची संधी आहे. रविवारी भारताची अंतिम फेरीत न्यूझीलंडशी गाठ पडणार आहे. मिचेल सँटनरच्या नेतृत्वात खेळणाऱ्या न्यूझीलंडने एकंदर तिसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्यामुळे या दोन्ही संघांतील जुगलबंदीची सगळीकडे चर्चा रंगत असून कोण बाजी मारणार, हे पाहणे रंजक ठरेल.

खेळपट्टी कोणती, हे कुणालाच ठाऊक नाही : रचिन

दुबईत होणारा अंतिम सामना नेमका कोणत्या खेळपट्टीवर होईल, हे आम्हाला लढतीच्या एक दिवस अगोदरच समजेल. भारतीय संघसुद्धा स्टेडियममध्ये नव्हे, तर आयसीसीच्या अकादमीत सराव करत आहे. येथील एका खेळपट्टीवर चेंडूला वळण लाभते, तर दुसऱ्या खेळपट्टीवर चेंडूची उंची कमी-जास्त होते. त्यामुळे कोणत्याही एका संघाचे पारडे जड आहे, असे आताच म्हणता येणार नाही, अशी प्रतिक्रिया न्यूझीलंडचा सलामीवीर रचिन रवींद्रने व्यक्त केली.

रहिमची एकदिवसीय प्रकारातून निवृत्ती

ढाका : बांगलादेशचा अनुभवी फलंदाज मुशफिकूर रहिमने गुरुवारी एकदिवसीय प्रकारातून निवृत्ती जाहीर केली. ३७ वर्षीय रहिमने फेसबुकद्वारे निवृत्तीचा निर्णय घोषित केला. २००६मध्ये पदार्पण करणाऱ्या रहिमने २७४ एकदिवसीय सामन्यांत बांगलादेशचे प्रतिनिधित्व केले. त्याने ९ शतकांसह ७,७९५ धावा केल्या. तसेच २४३ झेल व ५६ यष्टिचीतही केले. २०१७मध्ये बांगलादेशला चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत नेण्यात रहिमचा मोलाचा वाटा होता. तसेच २००७च्या एकदिवसीय विश्वचषकात बांगलादेशने भारताला नमवले होते. त्यावेळी रहिमने निर्णायक योगदान दिले. रहिम टी-२० तून आधीच निवृत्त झाला आहे. कसोटीत मात्र तो खेळत राहणार आहे. लवकरच तो बांगलादेशकडून १०० कसोटी खेळणारा पहिला खेळाडू ठरू शकतो.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक