X - @BCCI
क्रीडा

अंतिम फेरीच्या मार्गात ऑस्ट्रेलियाचा अडथळा! दुबईच्या रणांगणात आज भारताचा कांगारूंशी उपांत्य सामना

रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळणारा भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेचे जेतेपद मिळवण्यापासून फक्त एक पाऊल दूर आहे.

Swapnil S

दुबई : रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळणारा भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेचे जेतेपद मिळवण्यापासून फक्त एक पाऊल दूर आहे. मात्र त्यांच्या मार्गात मंगळवारी सर्वात मोठा अडथळा असेल तो म्हणजे ऑस्ट्रेलियाचा. दुबईच्या रणांगणात मंगळवारी रंगणाऱ्या पहिल्या उपांत्य सामन्यात भारत-ऑस्ट्रेलिया एकेमकांविरुद्ध उभे ठाकणार आहेत. या लढतीत कांगारूंची फिरकीच्या जाळ्यात कोंडी करत भारतीय संघ सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरीत धडक मारणार का, हे पाहणे रंजक ठरेल.

१९ फेब्रुवारीपासून ८ संघांत सुरू झालेले चॅम्पियन्स ट्रॉफीचे नववे पर्व आता उपांत्य फेरीच्या टप्प्यावर आहे. पाकिस्तान या स्पर्धेचे यजमानपद भूषवत असला तरी आयसीसीशी केलेल्या करारानुसार भारतीय संघ त्यांचे सर्व सामने दुबईत खेळत आहे. अ-गटातून अग्रस्थानासह उपांत्य फेरी गाठणाऱ्या भारताने साखळीत विजयी हॅटट्रिक साकारली. प्रथम बांगलादेश व नंतर पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला भारताने धूळ चारली. रविवारी मग किवी म्हणजेच न्यूझीलंड संघाविरुद्ध फिरकीच्या बळावर भारताने २४९ धावांचा यशस्वी बचाव केला. त्यामुळे आता २००२ व २०१३नंतर तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी उंचावण्यासाठी आतुर असलेला भारतीय संघ ऑस्ट्रेलियाचाही काटा काढणार का, याकडे अवघ्या विश्वाचे लक्ष लागून आहे. मुख्य म्हणजे २०२३च्या एकदिवसीय विश्वचषकात ऑस्ट्रेलियानेच अंतिम फेरीत भारताला पराभूत करून कोट्यवधी चाहत्यांचा अपेक्षाभंग केला होता. त्या पराभवाचा वचपा घेण्याची भारताकडे यावेळी संधी आहे.

दुसरीकडे स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाने ब-गटातून दुसऱ्या स्थानासह उपांत्य फेरीत प्रवेश केला. मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स व जोश हेझलवूड यांसारखे प्रमुख वेगवान गोलंदाज संघात नसतानाही कांगारूंनी फलंदाजीच्या बळावर आगेकूच केली. इंग्लंडविरुद्ध ३५० धावांचा पाठलाग केल्यावर त्यांचे दक्षिण आफ्रिका व अफगाणिस्तानविरुद्धचे सामने पावसामुळे रद्द झाले. मात्र ऑस्ट्रेलियाने सर्व सामने पाकिस्तानमध्ये खेळले होते. आता दुबईत रविवारीच दाखल झाल्यावर ते तेथील वातावरण व खेळपट्टीशी किती लवकर जुळवून घेणार, हे लढतीच्या दृष्टीने निर्णायक ठरेल. २०२४च्या टी-२० विश्वचषकात भारताने ऑस्ट्रेलियाला सुपर-८ फेरीत नमवून त्यांचे आव्हान संपुष्टात आणले होते. त्यामुळे कांगारूही त्या पराभवाची परतफेडी करण्याच्या निर्धाराने मैदानात उतरतील.

तूर्तास, दोन्ही संघांत प्रतिभावान खेळाडू असल्याने दुबई स्टेडियमवर दुपारी २.३० वाजल्यापासून रंगणाऱ्या या लढतीकडे संपूर्ण क्रीडाविश्व लक्ष ठेवून आहे.

पुन्हा फिरकी चौकडीवर विश्वास?

न्यूझीलंडविरुद्ध हर्षित राणाला वगळून वरुण चक्रवर्तीला संधी देण्यात आली. फिरकीपटू वरुणने ५ बळी मिळवून त्या संधीचे सोने केले. त्यामुळे आता भारतीय संघाची डोकेदुखी वाढली असेल. मोहम्मद शमी व हार्दिक वेगवान माऱ्याची धुरा वाहतील. मात्र हर्षित संघात परतल्यास एखादा फिरकीपटू संघाबाहेर जाऊ शकतो. त्यातच अक्षर व जडेजा फलंदाजीतही योगदान देत असल्याने वरुण किंवा चायनामन कुलदीप यादव यांच्यापैकी एकावर ही वेळ ओढवू शकते. मात्र खेळपट्टीचे स्वरूप पाहता भारतीय संघ पुन्हा चारही फिरकीपटूंना संधी देईल, असे वाटते.

हेड पुन्हा ठरू शकतो डोकेदुखी

भारताविरुद्ध नेहमीच धडाकेबाज कामगिरी करणारा ट्रेव्हिस हेड पुन्हा एकदा १५० कोटी भारतीयांसाठी डोकेदुखी ठरू शकतो. त्याशिवाय मार्नस लबूशेन, स्मिथ यांच्यावर कांगारूंची फलंदाजी अवलंबून आहे. मॅथ्यू शॉर्ट स्पर्धेबाहेर गेल्याने हेडसह जेक फ्रेसर सलामीला येऊ शकतो. ग्लेन मॅक्सवेल, जोश इंग्लिस यांच्यामुळे ऑस्ट्रेलियाची फलंदाजी आणखी बळकट झाली आहे. मात्र भारताच्या दर्जेदार फिरकीपटूंसमोर त्यांचाही कस लागेल.

आघाडीच्या फळीवर भारताची भिस्त

रोहित, शुभमन गिल आणि विराट कोहली हे आघाडीचे तीन फलंदाज भारताची ताकद आहेत. न्यूझीलंडविरुद्धचे अपयश बाजूला सारून पुन्हा हे त्रिकुट छाप पाडण्यास आतुर असेल. श्रेयस अय्यरने भारतासाठी या स्पर्धेत आतापर्यंत सर्वाधिक १५० धावा केल्या आहेत. हार्दिक पंड्या, अक्षर पटेल व रवींद्र जडेजा या अष्टपैलूंमुळे भारताची फलंदाजी खोलवर लांबली आहे. मात्र यष्टिरक्षणात गचाळ कामगिरी करणाऱ्या के. एल. राहुलऐवजी भारतीय संघ डावखुऱ्या ऋषभ पंतला संधी देणार का, हे पाहणे रंजक ठरेल. राहुलने फलंदाजीत मात्र दोन सामन्यांत नाबाद ४१ व २३ असे योगदान दिले आहे.

ऑस्ट्रेलियाला गोलंदाजांची चिंता

इंग्लंडविरुद्ध ३५१ व अफगाणिस्तानविरुद्ध २७३ धावा लुटणाऱ्या गोलंदाजांची ऑस्ट्रेलियाला चिंता सतावत असेल. फिरकीपटू झाम्पाला अद्याप प्रभाव पाडता आलेला नाही. दुबईत झाम्पाच्या साथीने तन्वीर संघाला संधी मिळू शकते. नॅथन एलिस, स्पेन्सर जॉन्सन यांच्यावर वेगवान माऱ्याची भिस्त आहे. मात्र ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करून २५० ते २७५ धावा केल्या, तर त्यांच्या गोलंदाजांविरुद्ध भारतीय संघ नक्कीच हे लक्ष्य गाठू शकतो.

दुबई आमच्यासाठीही आव्हानात्मक : रोहित

वरुणने न्यूझीलंडविरुद्ध त्याच्यातील कौशल्य दाखवले. त्यामुळे उपांत्य सामन्यात किती फिरकीपटूंना संधी द्यावी, याचा निर्णय मंगळवारीच घेण्यात येईल. संघातील प्रत्येक खेळाडू संधी मिळेल तेव्हा छाप पाडण्यास आतुर आहे. ऑस्ट्रेलियाच्या एका फलंदाजावर लक्ष न देता संपूर्ण संघाला कसे रोखता येईल, यावर आमचा भर असेल. तसेच आम्ही दुबईत राहत नाही. त्यामुळे येथील खेळपट्ट्या आमच्यासाठीही आव्हानात्मकच आहेत. अन्य मुद्द्यांविषयी मी अधिक बोलू इच्छित नाही, असे भारताचा कर्णधार रोहित सोमवारी सायंकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत म्हणाला.

खेळपट्टी आणि वातावरणाचा अंदाज

दुबईतील खेळपट्टीवर दव येत नसल्याने येथे २५० ते २६० धावा विजयासाठी पुरेशा ठरत आहेत.

फिरकीपटू दोन्ही डावांत निर्णायक भूमिका बजावतील. त्यामुळे नाणेफेकीचा कौल फारसा महत्त्वाचा ठरणार नाही.

दिवसभर २५ ते ३० डीग्री सेल्सियसमध्ये तापमान राहील. पावसाची येथे शक्यता नाही. त्यामुळे चुरशीची लढत पाहायला मिळेल.

पहिला उपांत्य सामना

भारत वि. ऑस्ट्रेलिया

स्थळ : दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई

वेळ : दुपारी २.३० वा.

प्रतिस्पर्धी संघ

भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, के. एल. राहुल, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, रवींद्र जडेजा, वरुण चक्रवर्ती.

ऑस्ट्रेलिया : स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), ट्रेव्हिस हेड, जोश इंग्लिस, ॲलेक्स कॅरी, ग्लेन मॅक्सवेल, आरोन हार्डी, सीन ॲबट, नॅथन एलिस, ॲडम झाम्पा, स्पेन्सर जॉन्सन, मार्नस लबूशेन, जेक फ्रेसर, बेन ड्वारशुईस, तन्वीर संघा, कूपर कोनोली.

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स, स्पोर्ट्स १८ वाहिनी, जिओहॉटस्टार ॲप

गणपती गेले गावाला...! 'पुढच्या वर्षी लवकर या'चा घुमला जयघोष; दहा दिवसांच्या गणेश मूर्तीचे उत्साहात विसर्जन

Mumbai : लालबागचा राजाच्या विसर्जनाला विलंब? तराफ्यावर मूर्ती चढवताना अडचणी

Maharashtra : बाप्पाच्या निरोपावेळी दुर्दैवी घटना; राज्यात ७ जणांचा मृत्यू

मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देणारा गजाआड; गोंधळ माजवण्यासाठी पाठवला संदेश

चौकशीची मागणी माझी वैयक्तिक! अंजना कृष्णा धमकीप्रकरणी मिटकरी यांचे घूमजाव