दुबईत पार पडलेल्या भारत विरुद्ध न्यूझीलंड चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या फायनलमध्ये भारतीय क्रिकेट संघाने धमाकेदार विजय मिळवला अन् चषकावर आपले नाव कोरले. टीम इंडियाने न्यूझीलंडवर ४ गडी आणि ६ चेंडू राखून दणक्यात विजय मिळवल्यानंतर पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर चांगलीच टीका केली.
खरंतर चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चे यजमानपद अधिकृतपणे पाकिस्तानकडे होते, मात्र भारताचे सर्व सामने दुबईमध्ये खेळले गेले. अंतिम सामन्यानंतर पुरस्कार वितरण समारंभ पार पडला, या पुरस्कार वितरण समारंभात मात्र यजमानपद असलेल्या पाकिस्तान क्रिकेट मंडळाचा (PCB) एकही प्रतिनिधी उपस्थित नव्हता. त्यामुळेच शोएब अख्तरने पीसीबीवर टीकास्त्र सोडले.
शोएबने सोशल मीडियावर पोस्ट केला व्हिडिओ -
शोएब अख्तरने आपल्या सोशल मीडियाच्या अकाउंटवर याबाबतचा एक व्हिडिओ पोस्ट केलाय. "भारताने ICC चॅम्पियन ट्रॉफी जिंकली आहे. मात्र मला एक गोष्ट विचित्र वाटली की यंदाचे चॅम्पियन ट्रॉफीचे यजमानपद पाकिस्तानकडे असूनही पाकिस्तान क्रिकेट मंडळाचा (PCB) कोणताच प्रतिनिधी चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलच्या पुरस्कार वितरण समरंभास हजर नव्हता. ही गोष्ट मला न समजण्यासारखी आहे. ट्रॉफी देण्यासाठी किंवा टॉफी वितरण सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी कोणीच का नव्हतं. हा मुद्दा विचार करण्यासारखा आहे. जागतिक स्तरावर हा कार्यक्रम होत होता आणि तुमच्याकडे यजमानपद असताना एकतरी प्रतिनिधी उपस्थित असायला हवा होता, पण वाईट वाटतं की मला कोणीही दिसलं नाही", असे तो म्हणाला.
२९ वर्षांनंतर यजमानपद
यापूर्वी पाकिस्तानने १९९९ मध्ये अखेरची आयसीसी स्पर्धा आयोजित केली होती. त्यानंतर यंदा २९ वर्षांनंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडे आयसीसी ट्रॉफीचे यजमानपद आले होते.