क्रीडा

विजयी हॅट्‌ट्रिकसाठी चेन्नई सज्ज! लखनऊ सुपर जायंट्सशी आज सामना; दुबे गोलंदाजी करण्याची शक्यता

ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नईने गेल्या दोन लढतींमध्ये कोलकाता व मुंबईला धूळ चारली. महेंद्रसिंह धोनी कर्णधार नसला तरी त्याची उपस्थिती या संघासाठी लाभदायी ठरत असून ३० वर्षीय दुबेला गवसलेला सूर, हे याचेच एक उदाहरण.

Swapnil S

लखनऊ : तब्बल पाच वेळा इंडियन प्रीमियर लीगचे (आयपीएल) विजेतेपद मिळवणारा चेन्नई सुपर किंग्जचा संघ यंदाही उत्तम लयीत आहे. सहापैकी चार सामने जिंकून गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी असलेला चेन्नईचा संघ शुक्रवारी विजयी हॅट‌्ट्रिक साकारण्याच्या निर्धाराने मैदानात उतरेल. लखनऊ सुपर जायंट्सशी चेन्नई दोन हात करणार असून या लढतीत मुंबईकर शिवम दुबे गोलंदाजी करण्याची दाट शक्यता आहे. अटल बिहारी वाजपेयी म्हणेजच लखनऊ येथील इकाना स्टेडियमवर ही लढत होईल.

ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नईने गेल्या दोन लढतींमध्ये कोलकाता व मुंबईला धूळ चारली. महेंद्रसिंह धोनी कर्णधार नसला तरी त्याची उपस्थिती या संघासाठी लाभदायी ठरत असून ३० वर्षीय दुबेला गवसलेला सूर, हे याचेच एक उदाहरण. दुबेने आतापर्यंतच्या सहा सामन्यांत फलंदाजीद्वारे छाप पाडताना २ अर्धशतकांसह २४२ धावा केल्या आहेत. मात्र त्याने एकाही लढतीत गोलंदाजी केलेली नाही. आता आगामी टी-२० विश्वचषकासाठी भारताला अष्टपैलू खेळाडूंचा शोध असून दुबेला या जागेसाठी दावेदारी पेश करायची असल्यास गोलंदाजी करणे गरजेचे आहे. सरावातही तो गोलंदाजी करताना आढळला. त्यामुळे लखनऊविरुद्ध दुबे गोलंदाजी करणार का, हे पाहणे रंजक ठरेल.

दुसरीकडे के. एल. राहुलच्या लखनऊने सहापैकी तीन लढती जिंकल्या असून ते गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर आहेत. गेल्या दोन सामन्यांत लखनऊला दिल्ली व कोलकाता या संघांकडून पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे ते पराभवाची हॅट्‌ट्रिक टाळून घरच्या मैदानात विजयपथावर परतण्यास आतुर असतील. इकाना स्टेडियमवर लखनऊने या हंगामात तीनपैकी दोन लढती जिंकल्या असून येथे १६० ते १८० धावांचा पाठलाग करणेही कठीण जाऊ शकते. त्यामुळे गोलंदाजांना येथे फलंदाजांवर वर्चस्व गाजवण्याची उत्तम संधी आहे.

कॉन्वेच्या जागी ग्लिसन चेन्नईकडे

न्यूझीलंडचा सलामीवीर डेवॉन कॉन्वे डाव्या हाताच्या अंगठ्याला झालेल्या दुखापतीमुळे संपूर्ण आयपीएलला मुकणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्याच्या जागी चेन्नईने इंग्लंडचा ३६ वर्षीय वेगवान गोलंदाज रिचर्ड ग्लिसनची निवड केली आहे. चेन्नईचा मुस्तफिझूर हा १ मेपर्यंतच आयपीएल खेळणार आहे. त्यामुळे तो बांगलादेशला माघारी परतल्यावर ग्लिसनला चेन्नईच्या संघात स्थान मिळेल, असे दिसते. ग्लिसनला चेन्नईने ५० लाखांत खरेदी केले असून त्याने इंग्लंडसाठी ६ टी-२० सामने खेळले आहेत. ग्लिसनकडे १४० किमीपेक्षा अधिक वेगाने गोलंदाजी करण्याची क्षमता आहे.

धोनीच्या फटकेबाजीची उत्सुकता; पाथिरानाचा धोका

धोनीने मुंबईविरुद्ध ४ चेंडूंत ३ षटकारांसह २० धावा फटकावून चाहत्यांची मने जिंकली. लखनऊविरुद्धही तो फलंदाजीसाठी येईल, अशी आशा आहे. धोनी या हंगामात उत्तम लयीतही दिसत आहे. मात्र लखनऊला सर्वाधिक धोका असेल तो श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज मथीशा पाथिरानाकडून. त्याशिवाय मुस्तफिझूर रहमान, शार्दूल ठाकूर व तुषार देशपांडे यांच्या वेगवान त्रिकुटामुळे चेन्नईची गोलंदाजी समतोल वाटत आहे. फलंदाजी ऋतुराज व रचिन रवींद्र यांच्याकडून चेन्नईला मोठी खेळी अपेक्षित आहे. त्याशिवाय अजिंक्य रहाणे व डॅरेल मिचेल यांनीही फारशी चमक दाखवलेली नाही. दुबेवर चेन्नईची फलंदाजी अवलंबून असून अखेरच्या षटकात रवींद्र जडेजा, धोनीसारखे फलंदाज हाणामारी करण्यात पटाईत आहेत. चेन्नईकडे नवव्या क्रमांकापर्यंत फलंदाजी आहे, हे विशेष.

राहुलकडून धडाकेबाज सुरुवात अपेक्षित

लखनऊचा कर्णधार राहुलने ६ सामन्यांत २०४ धावा केल्या असल्या तरी तो धडाकेबाज सुरुवात करून देण्यात अपयशी ठरत आहे. त्यामुळे क्विंटन डीकॉक, मार्कस स्टोईनिस यांच्यावर दडप‌ण वाढत आहे. निकोलस पूरन हा त्यांचा हुकमी एक्का असून आयुष बदोनी व दीपक हुडा यांना कामगिरी उंचावणे गरजेचे आहे. कृणाल पंड्याच्या खेळात चढ-उतार पाहायला मिळाला आहे. गेल्या दोन सामन्यांत लखनऊच्या फलंदाजांना १७० धावांपुढेही मजल मारता आली नाही. गोलंदाजीत मयांक यादवची अनुपस्थिती गुजरातला भासत आहे. त्यामुळे शामर जोसेफ, मोहसिन खान यांनी प्रभावी मारा करणे गरजेचे आहे. फिरकीपटू रवी बिश्नोई त्यांच्यासाठी सातत्याने छाप पाडत आहे. दुबेविरुद्ध बिश्नोईची जुगलबंदी पाहण्यास मजा येईल.

प्रतिस्पर्धी संघ

लखनऊ सुपर जायंट्स : के. एल. राहुल (कर्णधार), क्विंटन डीकॉक, निकोलस पूरन, आयुष बदोनी, कायले मेयर्स, मार्कस स्टोइनिस, दीपक हुडा, देवदत्त पडिक्कल, रवी बिश्नोई, नवीन उल हक, कृणाल पंड्या, युधवीर सिंग, प्रेरक मंकड, यश ठाकूर, अमित मिश्रा, शामर जोसेफ, मयांक यादव, मोहसिन खान, के. गौतम, अर्शीन कुलकर्णी, एम. सिद्धार्थ, ॲश्टन टर्नर, डेव्हिड विली, अर्शद खान, मॅट हेन्री.

चेन्नई सुपर किंग्ज : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), महेंद्रसिंह धोनी, मोईन अली, दीपक चहर, तुषार देशपांडे, शिवम दुबे, राजवर्धन हंगर्गेकर, रवींद्र जडेजा, अजय मंडल, मुकेश चौधरी, अजिंक्य रहाणे, शेख रशीद, मिचेल सँटनर, सिमरजीत सिंग, निशांत सिंधू, प्रशांत सोलंकी, महीष थिक्षणा, रचिन रवींद्र, शार्दूल ठाकूर, डॅरेल मिचेल, समीर रिझवी, मुस्तफिझूर रहमान, अरावेल्ली अविनाश, रिचर्ड ग्लिसन.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी