दिल्ली : ‘खो-खो’च्या पहिल्या विश्वचषकाला दणक्यात प्रारंभ झाल्यानंतर आता लवकरच ‘खो-खो’च्या राष्ट्रकुल अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात येईल. भारतीय खो-खो महासंघाचे (केकेएफआय) अध्यक्ष सुधांशू मित्तल यांनी ‘नवशक्ति’ला दिलेल्या मुलाखतीत याविषयी माहिती दिली.
महाराष्ट्राच्या मातीतील खो-खो हा खेळ आता नव्या रंगात, नव्या ढंगात जगभरात झेप घेत आहे. गेल्या काही वर्षांपासून खो-खो झपाट्याने भरारी घेत आहे. राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पातळीवरील खो-खो स्पर्धांना नेहमीच दर्दी क्रीडाप्रेमी गर्दी करतात. त्यानंतर अनुक्रमे पुणे आणि ओदिशा येथे झालेल्या अल्टिमेट खो-खो लीगच्या दोन पर्वांनाही चाहत्यांचा दमदार प्रतिसाद लाभला. त्यामुळे ऑक्टोबरमध्ये केकेएफआयने ‘खो-खो’च्या पहिल्या विश्वचषकाची घोषणा केली. सध्या नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय इनडोअर स्टेडियममध्ये पहिली विश्वचषक खो-खो स्पर्धा थाटात सुरू आहे. सहा खंडांमधील २३ देश या स्पर्धेत सहभागी झाले असून पुरुष व महिला अशा दोन्ही गटांत मिळून ३९ संघांत ही स्पर्धा खेळवण्यात येत आहे.
२०३० मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धा रंगणार आहे. तसेच २०३२ मध्ये ब्रिस्बेन येथे ऑलिम्पिक होईल. या दोन्ही स्पर्धांमध्ये ‘खो-खो’चा समावेश असावा, यासाठी महासंघ प्रयत्नशील आहे. “सध्या ५५ देशांमध्ये खो-खोचे महासंघ आहेत. किमान ७५ देशांत तुमच्या क्रीडा प्रकाराचे महासंघ असले, तर आशियाई आणि ऑलिम्पिक स्पर्धेच्या समावेशासाठी तुमचा विचार केला जाऊ शकतो. मात्र आमचे लक्ष्य ९० देशांत पोहोचण्याचे आहे. त्यामुळे या वर्षाच्या अखेरीस अधिकाधिक देशांमध्ये खो-खो कसा पोहोचेल, याकडे आम्ही लक्ष देणार आहोत,” असे मित्तल म्हणाले.
“तीन-चार वर्षांपूर्वी जेव्हा जबलपूर येथील राष्ट्रीय स्पर्धेत आपण खो-खो विश्वचषकाचा उल्लेख केला होता, त्यावेळी तुम्हालाही वाटले नसेल की हे एक दिवस खरे होईल. मात्र आज खो-खो विश्वचषक प्रत्यक्षात सुरू आहे. त्यामुळे खो-खो आणि भारतीय महासंघ आता थांबणार नाही. ‘खो-खो’ची राष्ट्रकुल अजिंक्यपद स्पर्धा आयोजित करण्यासाठी भारतीय महासंघ पूर्णपणे जोर लावत आहे. पुढील दोन ते तीन महिन्यांत याविषयी निर्णय घेण्यात येईल. या स्पर्धेच्या आयोजनाद्वारे आम्ही ऑलिम्पिक पात्रतेच्या आणखी जवळ जाऊ,” असेही मित्तल यांनी नमूद केले.
विश्वचषक स्पर्धेत मंगळवारपर्यंत भारतीय पुरुषांनी दोन विजय नोंदवले असून महिला संघाने विजयी सलामी दिली आहे. राजधानी दिल्लीत सुरू असलेल्या या स्पर्धेत जगभरातील प्रेक्षक मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. पहिला-वहिला विश्वचषक उंचावण्यासाठी जगभरातील संघ जीवतोड खेळताना दिसत आहेत.
... तर राज्यातील खेळाडूंना प्रत्येकी तीन कोटी?
भारतीय संघाने खो-खो विश्वचषकाचे विजेतेपद मिळवल्यास राज्यातील खेळाडूंना महाराष्ट्र शासनातर्फे प्रत्येकी तीन कोटींचे पारितोषिक देण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. सध्या पुरुष संघात महाराष्ट्राचे पाच, तर महिला संघात राज्यातील तीन खेळाडू आहेत. राज्य शासनाने या स्पर्धेसाठी दहा कोटींचा निधीसुद्धा दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे खेळाडू कोट्याधीश होण्याची ही संधी साधणार का, हे पाहणे रंजक ठरेल.