क्रीडा

Commonwealth Games 2026 : शर्मिला, शिल्पाचा डबल धमाका; पॅरा ॲथलेटिक्समधील गोळा फेक प्रकारात सुवर्ण-कांस्यकमाई

वयाच्या दुसऱ्या वर्षी पोलिओमुळे अपंगत्व आलेली आणि कौटुंबिक छळाचा सामना केलेल्या शर्मिला धनकरने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पैरा-गोळा फेक प्रकारात ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे.

Swapnil S

ग्लासगो : वयाच्या दुसऱ्या वर्षी पोलिओमुळे अपंगत्व आलेली आणि कौटुंबिक छळाचा सामना केलेल्या शर्मिला धनकरने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पैरा-गोळा फेक प्रकारात ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे. महिलांच्या एफ-५७ गोळाफेक प्रकारात सुवर्णपदक जिंकून राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारी ती भारताची पहिली पॅरा अॅथलीट ठरली आहे.

याच प्रकारात भारताची दुसरी खेळाडू शिल्पा सायला हिने ७.२६ मीटरची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी केली. भारतीय व्यवस्थापनाने नोंदवलेल्या आक्षेपानंतर पुनरावलोकनानंतर आणि शिल्पाला कांस्यपदक बहाल करण्यात आले. सुरुवातीला नायजेरियाच्या युचारिया अयियाझीला कांस्यपदक देण्यात आले होते, परंतु आक्षेपानंतर तिचा एकमेव वैध प्रयत्न फाऊल ठरवण्यात आला, ज्यामुळे चौथ्या स्थानावरील शिल्पाला कांस्यपदक मिळाले.

ग्लासगो येथे राष्ट्रकुलचे २३वे पर्व रंगत असून या स्पर्धेत क्रीडा प्रकारांची संख्या कमालीची घटवण्यात आली आहे. यावेळी फक्त १० खेळांचा स्पर्धेत समावेश आहे. बर्मिंगहॅम २०२२च्या तुलनेत यात ९ खेळ कमी करण्यात आले आहेत, जिथे भारताने २२ सुवर्ण, १६ रौप्य, २३ कांस्य अशा ६१ पदकांसह चौथे स्थान पटकावले होते. बॅडमिंटन, क्रिकेट, हॉकी, माऊंटेन बायकिंग, रग्बी, स्क्वॉश, टेबल टेनिस, कुस्ती, ट्रायथलॉन यांसारखे खेळ यंदा राष्ट्रकुलचा भाग नाहीत. भारताचे १२६ खेळाडू यावेळी स्पर्धेत सहभागी झाले आहेत. वेटलिफ्टिंग, अॅथलेटिक्स, बॉक्सिंग या क्रीडा प्रकारांतच भारताला पदकांची सर्वाधिक अपेक्षा आहे.

४० वर्षीय शर्मिलाने ९.८१ मीटर अंतरावर गोळा फेकून या हंगामातील तिची सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. या ऐतिहासिक कामगिरीसह तिने राष्ट्रकुल स्पर्धेतील पॅरा अॅथलेटिक्स पदकासाठीची भारताची २० वर्षांची प्रतीक्षा संपवली. हरयाणातील छिछोली येथील रहिवासी असलेल्या शर्मिलाचा आयुष्यातील प्रवास अत्यंत संघर्षाचा राहिला आहे. बालपणी पोलिओ झाल्यांनंतर तिचे लग्न झाले, परंतु कौटुंबिक छळातून बाहेर पडत तिने पुन्हा नवीन आयुष्य सुरू केले. रेवारी येथील व्यावसायिक अजित सिंग यांच्याशी विवाह झाल्यानंतर पतीच्या प्रोत्साहनाने तिने २०२० मध्ये प्रशिक्षक टेकचंद यांच्या मार्गदर्शनाखाली खेळण्यास सुरुवात केली. वर्षभरातच तिने राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा जिंकली. चालू वर्षात तिने फज्जा आंतरराष्ट्रीय पॅरा अॅथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते.

"माझ्या आईने माझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी संघर्ष केला. आता आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणे हे माझे पुढील ध्येय आहे," अशी भावना शर्मिलाने व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शर्मिलाच्या या ऐतिहासिक कामगिरीबद्दल तिचे अभिनंदन केले आहे. "ग्लासगोमध्ये इतिहास रचला गेला आहे. या कामगिरीने दोन दशकांची प्रतीक्षा संपवली आहे," असे पंतप्रधानांनी 'एक्स'वर नमूद केले.

भारताची पदकसंख्या १० झाली असून यामध्ये२ सुवर्ण, ५ रौप्य व ३ कांस्यपदकांचा समावेश आहे. भारत पदकतालिकेत आठव्या स्थानी आहे. सोमवारी मध्यरात्री १२ ते ३ या वेळेत भारताने चार पदके कमावली. मंगळवारी रात्री १० पर्यंत मात्र भारताला पदक जिंकता आले नाही.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Gurugram Hit-and-Run : महिला बाईक रायडरला कारची जोरदार धडक; फरार आरोपी पोलिसांच्या ताब्यात, थरारक घटना कॅमेऱ्यात कैद

Mumbai : मेट्रो ९ टप्पा २ साठी विशेष वाहतूक ब्लॉक; १५ ते २५ सप्टेंबर दरम्यान सकाळी वाहतूक उशीरा सुरू होणार

Jio-Airtel चा Vi ला दणका; मोबाईल नंबर पोर्टेबिलिटीवरून TRAI कडून चौकशी सुरू, नेमकं प्रकरण काय?

Mumbai : दादर पूर्व स्टेशन परिसर होणार कोंडीमुक्त; टॅक्सी, बेस्टसाठी स्वतंत्र मार्गीका, टॅक्सी स्टँड

परिचारिकांना महिन्याला आठ सुट्या द्या; राज्य शासनाच्या धर्तीवर ४० तासांचा आठवडा करा, परिचारिका संघटनेने BMC चे लक्ष वेधले