नवी दिल्ली : आयपीएलमध्ये सोमवारी होणाऱ्या लढतीत दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांचा रॉयल चॅलेंजर्सं बंगळुरूच्या फलंदाजांविरुद्ध कस लागणार आहे. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर (कोटला) ही लढत रंगणार असून येथे चौकार-षटकारांची आतषबाजी अपेक्षित असल्याने गोलंदाजांची अग्निपरीक्षा असेल.
मार्च महिन्याच्या सुरुवातीला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर टी-२० विश्वचषकाच्या महामुकाबल्यात भारताने न्यूझीलंडचा ९६ धावांनी फडशा पाडला. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारताने एकंदर तिसऱ्यांदा, तर सलग दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम केला. भारताच्या या विश्वविजयात अनेक हिऱ्यांचे मोलाचे योगदान लाभले. भारत हा सलग दोन टी-२० विश्वचषक जिंकणारा तसेच मायदेशात जेतेपद मिळवणारा पहिलाच संघ ठरला. त्यानंतर काही दिवसांच्या विश्रांतीनंतर भारताचे सर्व तारे पुन्हा आयपीएलच्या निमित्ताने मैदानात दिसत आहेत.
२८ मार्चपासून आयपीएलच्या १९व्या पर्वाला प्रारंभ झाला. बहुतांश लढतींमध्ये धावांचा पाठलाग करणारा संघ जिंकला. मात्र गेल्या काही दिवसांत प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांनीही बाजी मारली आहे. त्यामुळे बॅट-बॉलमधील द्वंद्व रंगतदार होत आहे. नाणेफेकीच्या कौलावर विसंबून न राहता कोणत्याही क्षणी सामन्यांची दिशा बदलत आहे. आता प्रत्येक संघाचे किमान ७ ते ८ सामने झाले असून गुणतालिकेचे समीकरण आणखी रंजक होणार आहे. त्यामुळेच आयपीएलचा ज्वर हळूहळू वाढणार आहे.
अक्षर पटेलच्या नेतृत्वात खेळणाऱ्या दिल्लीला दोन दिवसांपूर्वीच पंजाबविरुद्ध क्लेशकारक पराभव पत्करावा लागला. २६५ धावांचे टार्गेट देऊनही दिल्लीच्या गोलंदाजांना बचाव करता आला नाही. तसेच त्यांनी खराब क्षेत्ररक्षण केले. राहुलने या लढतीत दीडशतक साकारले होते. मात्र दिल्लीच्या पदरी निराशा पडली. आता पुन्हा एकदा हा संघ विजयपथावर परतण्यास आतुर असेल. लुंगी एन्गिडीच्या अनुपस्थितीत दुश्मंता चमीराला संधी मिळण्याची शक्यता आहे. तसेच पृथ्वी शॉ, अभिषेक पोरेलला स्थान मिळू शकते.
दुसरीकडे रजत पाटीदारच्या नेतृत्वात खेळणारा गतविजेता बंगळुरूचा संघ यंदाही उत्तम लयीत आहेत. बंगळुरूने गेल्या लढतीत गुजरातला नमवले. विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, पाटीदार व जितेश शर्मा असे दमदार भारतीय फलंदाज, तर टिम डेव्हिड व शेफर्ड असे विदेशी फलंदाज त्यांच्या ताफ्यात आहेत. फिल सॉल्ट दुखापतीमुळे या लढतीसही मुकण्याची शक्यता आहे. गोलंदाजीत भुवनेश्वर कुमार, जोश हेझलवूड यांची वेगवान जोडी बंगळुरूची ताकद आहे. उभय संघांत या हंगामात झालेल्या पहिल्या टप्प्यातील लढतीत दिल्लीने बंगळुरूला नमवले होते.
प्रतिस्पर्धी संघ
दिल्ली कॅपिटल्स : अक्षर पटेल (कर्णधार), अभिषेक पोरेल, अजय मंडल, आशुतोष शर्मा, आकिब नबी, डेव्हिड मिलर, दुश्मंता चमीरा, करुण नायर, के. एल. राहुल, कुलदीप यादव, कायले जेमिसन, लुंगी एन्गिडी, माधव तिवारी, मिचेल स्टार्क, मुकेश कुमार, नितीश राणा, पथुम निसांका, पृथ्वी शॉ, साहिल पारेख, समीर रिझवी, टी. नटराजन, त्रिपुराना विजय, ट्रिस्टन स्टब्स, विपराज निगम, रेहान अहमद.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : रजत पाटीदार (कर्णधार), जॉर्डन कॉक्स, विराट कोहली, टिम डेव्हिड, देवदत्त पडिक्कल, फिल सॉल्ट, जितेश शर्मा, जेकब बेथल, कनिष्क चौहान, वेंकटेश अय्यर, विहान मल्होत्रा, मंगेश यादव, कृणाल पंड्या, रोमारिओ शेफर्ड, अभिनंदन सिंग, सात्विक देस्वाल, जेकब डफी, जोश हेझलवूड, भुवनेश्वर कुमार, विकी ओस्तवाल, रसिक सलाम, सुयश शर्मा, स्वप्निल सिंग, नुवान थुशारा.
वेळ : सायंकाळी ७.३० वाजता
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी आणि जिओहॉटस्टार ॲप