मुंबईची हाराकिरी! समीर रिझवीच्या अर्धशतकामुळे दिल्लीचा सहा विकेट्सनी विजय X
क्रीडा

IPL 2026 : मुंबईची हाराकिरी! समीर रिझवीच्या अर्धशतकामुळे दिल्लीचा सहा विकेट्सनी विजय

बदली खेळाडू (सब्स्टिट्यूट) समीर रिझवीच्या दमदार फलंदाजीमुळे दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सचा सहा विकेट्स राखून पराभव केला. मुंबईच्या प्रमुख फलंदाजांनी केलेली कामगिरी त्यांच्या पराभवास कारणीभूत ठरली.

Swapnil S

नवी दिल्ली: बदली खेळाडू (सब्स्टिट्यूट) समीर रिझवीच्या दमदार फलंदाजीमुळे दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सचा सहा विकेट्स राखून पराभव केला. मुंबईच्या प्रमुख फलंदाजांनी केलेली कामगिरी त्यांच्या पराभवास कारणीभूत ठरली.

सूर्यकुमार यादव (५१), रोहित शर्मा (३५) आणि नमन धीर (२८) यांचा अपवाद वगळता मुंबई इंडियन्सच्या एकाही फलंदाजाला कामगिरी उंचावता आली नाही. त्यामुळे मुंबईला २० षटकांत ६ बाद १६२ धावांपर्यंतच मजल मारता आली. हे आव्हान पार करताना, दिल्ली कॅपिटल्सची सुरुवातही निराशाजनक झाली, मात्र समीर रिझवी आणि पाथून निसांका यांनी अप्रतिम फलंदाजी करत दिल्लीला ११ चेंडू आणि सहा विकेट्स राखून सहज विजय मिळवून दिला.

सलग दुसऱ्या सामन्यात दिल्लीच्या सलामीवीरांनी निराशा केल्यानंतर तुफान फॉर्मात असलेल्या समीर रिझवीने मुंबईच्या गोलंदाजांवर हल्लाबोल करत सात चौकार आणि सात षटकारांसह ५१ चेंडूंत ९० धावांची खेळी साकारली. त्याने पाथूम निसांकासह तिसऱ्या विकेटसाठी ६६ धावांची मोलाची भागीदारी रचत दिल्लीच्या डावाला स्थैर्य दिले. निसांकाने ३० चेंडूंत ४० धावा फटकावत त्याला चांगली साथ दिली.

रिझवीने नंतर चौथ्या विकेटसाठी डेव्हिड मिलरसह (नाबाद १७) ७८ धावांची भर घालत दिल्लीच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. मात्र २२ वर्षीय रिझवीला आपले आयपीएलमधील पहिलेवहिले शतक झळकावता आले नाही. कॉर्बिन बॉशच्या गोलंदाजीवर तिलक वमनि त्याचा झेल टिपला.

दिल्लीच्या तीन विकेट्स माघारी परतल्यानंतरही रिझवीने आक्रमक फटकेबाजी कायम ठेवली. त्याने बॉशच्या ११व्या षटकांत दोन चौकार आणि दोन षटकारांची आतषबाजी करत २० धावा वसूल केल्या. त्यानंतरच्या मयांक मार्कडेच्या षटकांत त्याने लागोपाठ दोन षटकार ठोकले.

तत्पूर्वी, दिल्लीच्या गोलंदाजांनीही मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांवर अंकुश ठेवत त्यांना १६२ धावांवरच रोखले. कर्णधार हार्दिक पंड्याच्या अनुपस्थितीत मुंबईची सूत्रे सूर्यकुमार यादवकडे सोपवण्यात आली होती. त्याच्या संयमी अर्धशतकी खेळीमुळे मुंबईला दीडशतकी पल्ला गाठता आला. एका बाजूने पडझड सुरू असताना सूर्यकुमारने ३६ चेंडूंत तीन चौकार आणि दोन षटकारांसह ५१ धावांची खेळी केली. दिल्लीच्या गोलंदाजांनी अचूक टप्पा आणि दिशा राखून गोलंदाजी केल्यामुळे मुंबईच्या फलंदाजांना मैदानावर जम बसवणे कठीण झाले होते. रोहित शमनि ३५ धावांचे योगदान दिले.

दिल्लीचा कर्णधार अक्षर पटेलने अप्रतिम गोलंदाजी करत चार षटकांत फक्त २२ धावा देत रोहित शर्माचा अडसर दूर केला. लेगस्पिनर विपराज निगम आणि कुलदीप यादवने फारशा धावा दिल्या नाहीत. वेगवान गोलंदाजांमध्ये मुकेश कुमारने २६ धावा देत २, तर लुंगी एन्गिडी आणि टी. नटराजन यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला.

हार्दिक पंड्या पडला आजारी

वानखेडे स्टेडियमवरील पहिला सामना जिंकल्यानंतर शनिवारी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध होणाऱ्या दुसऱ्या सामन्याआधी मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या अचानक आजारी पडला. त्याच्या आजाराचे नेमके कारण फ्रँचायझीकडून सांगण्यात आले नसले तरी त्याच्या ऐवजी सूर्यकुमार यादवने मुंबईचे नेतृत्व सांभाळले. "हार्दिकला बरे नसल्यामुळे माझ्यावर कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. या सामन्यात आम्ही सकारात्मक आहोत," असे सूर्यकुमारने सामन्याला सुरुवात होण्याआधी सांगितले.

आयपीएल गुणतालिका

(मंबई वि. दिल्ली सामन्यापर्यंत)

ठाण्यात घर खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी; १७ एप्रिलपासून MCHIचे प्रॉपर्टी प्रदर्शन

MNSकडून राज्यभर जिल्हा संपर्क अध्यक्षांची नियुक्ती; संघटनात्मक बांधणीला वेग

मच्छिमारीवरील डिझेल दरवाढ कायम; प्रति लिटर २२ रुपयांची वाढ, केंद्राकडून दिलासा नाही

उरणमध्ये हॉटेल व्यावसायिकांना लाकडी चुलीचा आधार; व्यावसायिक सिलिंडरवर निर्बंध, आंतरराष्ट्रीय तणावाचा फटका थेट सर्वसामान्यांच्या पोटाला

उल्हास नदीला मिळणार 'नवसंजीवनी'; राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरणात समावेश