क्रीडा

लिरेनचा गुकेशला पराभवाचा धक्का! १२व्या फेरीनंतर दोघांच्या खात्यात प्रत्येकी ६ गुण

भारताचा १८ वर्षीय युवा ग्रँडमास्टर डी. गुकेशने सोमवारी जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ लढतीत जेतेपदाच्या दिशेने कूच करण्याची उत्तम संधी होती. मात्र चीनचा विद्यमान जगज्जेता डिंग लिरेनने १२व्या फेरीत गुकेशला पराभवाचा धक्का दिला. त्यामुळे आता दोन्ही खेळाडूंच्या खात्यात प्रत्येकी ६ गुण जमा असून फक्त शेवटच्या २ फेऱ्या शिल्लक आहेत. मंगळवारी विश्रांतीचा दिवस आहे.

Swapnil S

सिंगापूर : भारताचा १८ वर्षीय युवा ग्रँडमास्टर डी. गुकेशने सोमवारी जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ लढतीत जेतेपदाच्या दिशेने कूच करण्याची उत्तम संधी होती. मात्र चीनचा विद्यमान जगज्जेता डिंग लिरेनने १२व्या फेरीत गुकेशला पराभवाचा धक्का दिला. त्यामुळे आता दोन्ही खेळाडूंच्या खात्यात प्रत्येकी ६ गुण जमा असून फक्त शेवटच्या २ फेऱ्या शिल्लक आहेत. मंगळवारी विश्रांतीचा दिवस आहे.

२५ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या या लढतीत पहिल्या फेरीत गुकेशला पराभवाचा धक्का बसला होता. मात्र दुसऱ्या फेरीत गुकेशने लिरेनला बरोबरीत रोखले. तिसऱ्या फेरीतील विजयासह गुकेशने त्याच्यातील कौशल्य दाखवून दिले. त्यानंतर मात्र १०व्या फेरीपर्यंत दोन्ही खेळाडूंमध्ये सातत्याने बरोबरीच पाहायला मिळाली. रविवारी गुकेशने सर्वस्व पणाला लावून विजय मिळवत एका गुणाची आघाडी घेतली होती. सर्वप्रथम ७.५ गुणांपर्यंत पोहोचणारा खेळाडू या लढतीत विजेता ठरतो. त्यामुळे गुकेशला सोमवारी आणखी एका विजयासह ७ गुणांपर्यंत पोहोचण्याची संधी होती. मात्र ३२ वर्षीय लिरेनने ३९ चालींमध्ये गुकेशचा प्रतिकार मोडीत काढून पुन्हा ६-६ अशी बरोबरी साधली आहे. गेल्या वेळेसही लिरेनने १२व्या फेरीत त्यावेळचा जगज्जेता नेपोम्नियाशीला नमवले होते आणि पुढे जाऊन जगज्जेतेपदही मिळवले. त्यामुळे गुकेशला गाफील राहून चालणार नाही. बुधवारी १३वी, तर गुरुवारी १४वी फेरी रंगणार आहे. त्यामध्ये निकाल न लागल्यास शुक्रवारी टायब्रेकरचा अवलंब केला जाईल.

जागतिक लढतीत एकूण १४ पारंपरिक (क्लासिकल) डाव होतील. सर्वप्रथम ७.५ गुणांचा टप्पा गाठणारा खेळाडू विजेता ठरतो. पहिल्या ४० चालींसाठी १२० मिनिटे, पुढील २० चालींसाठी ६० मिनिटे आणि उर्वरित चालींसाठी १५ मिनिटांचा कालावधी खेळाडूंना उपलब्ध असेल. काळ्या मोहऱ्यांनी खेळाडूच्या ४० चाली होत नाहीत, तोवर सामना बरोबरीत सोडवता येणार नाही. तसेच १४ डावांअंती लढतीत बरोबरी असल्यास विजेता ठरवण्यासाठी जलद प्रकारात ‘टायब्रेकर’ खेळवण्यात येईल.

डिंगने गतवर्षी रशियाच्या इयन नेपोम्नियाशीला पराभूत करून बुद्धिबळाच्या विश्वातील पहिला चिनी जगज्जेता म्हणून मिरवण्याचा मान मिळवला होता. मात्र, त्यानंतर त्याची कामगिरी खालावली आहे. त्यामुळे गुकेशला यावेळी जेतेपदाची उत्तम संधी आहे. भारताकडून फक्त विश्वनाथन आनंदने जगज्जेतेपदावर मोहोर उमटवली आहे.

आज मी पहिल्या सत्रात निराशाजनक खेळ केला. त्यामुळे सातत्याने दडपण जाणवले. मात्र अद्याप २ फेऱ्या शिल्लक आहेत. त्यामुळे मी नक्कीच कामगिरी उंचावेन.

- डी. गुकेश

IIT बॉम्बेतील साहिल वाकोडे आत्महत्येप्रकरणी प्राध्यापक निलंबित; 'त्या' निवेदनावरून संस्थेची माफी

Mumbai : ‘बटरफ्लाय’ रोखणार पाणी गळती; जलवाहिन्यांवर बटरफ्लाय झडपा बसवणार, गणेश खणकर यांच्या मागणीची दखल

Mumbai : चौपाटी, विसर्जनस्थळी चोख व्यवस्थापन; देशभरातील तज्ज्ञांकडून पालिका, पोलिसांचे कौतुक

गणेश विसर्जनासाठी BMC सज्ज; ३८३ कृत्रिम तलावांची व्यवस्था, ६७ नैसर्गिक विसर्जनस्थळांवरही सुविधा, २५ हजार अधिकारी-कर्मचारी तैनात

बार्सिलोनामध्ये ‘गणपती बाप्पा मोरया’; महाराष्ट्र मंडळ स्पेनतर्फे गणेशोत्सव, स्पॅनिश कलाकारांचाही सहभाग