क्रीडा

बुद्धिबळाची राणी कोण? दिव्या-हम्पी यांच्यात आजपासून विश्वचषकाची महाअंतिम फेरी

बुद्धिबळातील नवी राणी कोण ठरणार, याकडे अवघ्या विश्वाचे लक्ष लागून आहे. महिलांच्या विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेतील अंतिम फेरीत शनिवारपासून दिव्या देशमुख आणि कोनेरू हम्पी या दोन भारतीय स्पर्धकांमध्ये द्वंद्व पाहायला मिळणार आहे.

Swapnil S

बटुमी (जॉर्जिया) : बुद्धिबळातील नवी राणी कोण ठरणार, याकडे अवघ्या विश्वाचे लक्ष लागून आहे. महिलांच्या विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेतील अंतिम फेरीत शनिवारपासून दिव्या देशमुख आणि कोनेरू हम्पी या दोन भारतीय स्पर्धकांमध्ये द्वंद्व पाहायला मिळणार आहे. त्यामुळे १९ वर्षीय दिव्या व ३८ वर्षीय हम्पी यांच्यात कोण बाजी मारणार, हे पाहणे रंजक ठरेल. इतिहासात प्रथमच भारताच्या दोन महिलांनी विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली आहे, हे विशेष.

ग्रँडमास्टर हम्पीने गुरुवारी महिलांच्या विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. त्यासह तिने कँडिडेट्स स्पर्धेचीही पात्रता मिळवली. तर नागपूरच्या दिव्याने बुधवारी अंतिम फेरीतील स्थान पक्के केले होते. २०२१पासून महिलांच्या बुद्धिबळ विश्वचषकाला प्रारंभ झाला. यापूर्वी फक्त पुरुषांसाठीच विश्वचषक खेळवण्यात यायचा. यापूर्वी २०२१ व २०२३ मध्ये झालेल्या महिलांच्या विश्वचषकात भारताची एकही खेळाडू उपांत्य फेरीपर्यंतही पोहोचली नव्हती. यंदा मात्र भारताच्या दोन जणींनी थेट अंतिम फेरीत मजल मारून बुद्धिबळातील देशाची ताकद सिद्ध केली आहे. नागपूरच्या १९ वर्षीय दिव्याने बुधवारी चीनच्या तिसऱ्या मानांकित टॅन झोंगोईला १.५-०.५ असे नमवले होते. १५वी मानांकित दिव्या ही विश्वचषकाची अंतिम फेरी गाठणारी पहिलीच भारतीय महिला ठरली होती.

त्यानंतर गुरुवारी चौथ्या मानांकित हम्पीने चीनच्या अग्रमानांकित लेई टिंगेईवर टायब्रेकरमध्ये ५-३ अशी मात केली. दोन्ही खेळाडूंत पहिले दोन दिवस बरोबरी कायम होती. अखेरीस टायब्रेकरमध्ये हम्पीने बाजी मारली. त्यामुळे या दोघीही कँडिडेट्ससाठी पात्र ठरल्या आहेत.

महिला विश्वचषकातील अव्वल तीन खेळाडू (विजेती, उपविजेती, तिसऱ्या क्रमांकावरील) पुढील वर्षी होणाऱ्या कँडिडेट्स स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहेत. कँडिडेट्स स्पर्धेतील विजेता मग जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ लढतीत गतविजेतीशी दोन हात करेल. तिसऱ्या क्रमांकाची लढत जिंकून खेळाडूंना कँडिडेट्सची पात्रता मिळवण्याची संधी आहे. एप्रिलमध्ये कँडिडेट्स स्पर्धा होईल. ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या काळात महिलांची जागतिक बुद्धिबळ लढत रंगेल.

दरम्यान, भारतीय वेळेनुसार सायंकाळी ४.३० वाजता पहिल्या फेरीला सुरुवात होईल. रविवारी दुसरा डावही याचवेळी सुरू होईल. जर दोन डावांनतरही बरोबरी कायम राहिली, तर सोमवारी तिसऱ्या दिवशी टायब्रेकरचा अवलंब केला जाईल. चेस बेस इंडियाच्या यूट्यूब वाहिनीवर चाहत्यांना अंतिम फेरीचे थेट प्रक्षेपण पाहता येईल.

एकंदर गेल्या काही वर्षांत भारताने बुद्धिबळात दुहेरी प्रगती केली आहे. बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारताने दुहेरी विजेतेपद पटकावले. मग डिसेंबरमध्ये भारताच्या गुकेशने जगज्जेतेपदावर मोहोर उमटवली. महिलांमध्ये २०२४ या वर्षात भारताच्या हम्पी, वैशाली यांनी अनुक्रमे जलद व ब्लिट्झ प्रकारात विजेतेपद मिळवले. या सर्वांचे फळ म्हणूनच भारताला पुन्हा एकदा विश्वचषकाचे यजमानपद लाभले आहे.

भारताने यापूर्वी २०२२मध्ये बुद्धिबळ ऑलिम्पियाड, टाटा स्टील चेस, २०२४मध्ये कनिष्ठ जागतिक स्पर्धा आणि एप्रिल २०२५मध्ये महिलांची ग्रँड प्रिक्स अशा विविध जागतिक पातळीवरील बुद्धिबळ स्पर्धांचे यजमानपद भूषवलेले आहे.

मालदीवसोबत संबंध अधिक मजबूत करण्यासाठी भारत तयार; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

महायुतीत बेबनाव; संजय शिरसाट-माधुरी मिसाळ यांच्यात बैठकीवरून जुंपली

हिंजवडी आयटी पार्कचे वाटोळे; आयटी उद्योग बंगळुरू, हैदराबादला चालले; उपमुख्यमंत्री अजित पवारांचा संताप

शाळांचे सुरक्षा ऑडिट करणे बंधनकारक; केंद्राचे सर्व राज्ये, केंद्रशासित प्रदेशांना सूचनावजा आदेश

अटल सेतूमुळे सरकार मालामाल! आतापर्यंत १ कोटी ३० लाख वाहनांचा प्रवास