ब्रूकचे वेगवान द्विशतक व्यर्थ; श्रीलंकेकडून ४३० धावांचा पाठलाग, पवनच्या शतकासह शनका, फर्नांडोची धडाकेबाज खेळी; तिरंगी मालिकेत इंग्लंडचा दुसरा पराभव X - @cricinfo
क्रीडा

ब्रूकचे द्विशतक व्यर्थ; श्रीलंकेकडून ४३० धावांचा पाठलाग, पवनच्या शतकासह शनका, फर्नांडोची शानदार खेळी

इंग्लंडचा फलंदाज हॅरी ब्रूकने एकदिवसीय क्रिकेटमध्ये विक्रमी द्विशतक झळकावूनही श्रीलंकेला विजयापासून रोखता आले नाही.

Swapnil S

रावळपिंडी : इंग्लंडचा फलंदाज हॅरी ब्रूकने एकदिवसीय क्रिकेटमध्ये विक्रमी द्विशतक झळकावूनही श्रीलंकेला विजयापासून रोखता आले नाही. पाकिस्तान येथे सुरू असलेल्या तिरंगी मालिकेतील तिसऱ्या सामन्यात श्रीलंकेने ४३० धावांचे विशाल लक्ष्य यशस्वीरीत्या पार करत इंग्लंडवर सनसनाटी विजय मिळवला. एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक यशस्वी धावांचा पाठलाग ठरला.

प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने ब्रूकच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर ५० षटकांत चार गडी गमावून ४२९ धावा उभारल्या. मात्र, श्रीलंकेच्या फलंदाजांनी जबरदस्त प्रत्युत्तर देत इंग्लंडच्या गोलंदाजांना निष्प्रभ ठरवले. पवन रत्ननायकेने १०६ चेंडूंत १३० धावांची शतकी खेळी साकारली. तसेच दसुन शनकाने ५० चेंडूंत ९७ धावा फटकावल्या, तर आविष्का फर्नांडोने ८३ चेंडूंत ९७ धावांची खेळी साकारली. त्यामुळे श्रीलंकेने ४९.५ षटकांत विजय मिळवला. गेल्या महिन्यात भारताने विंडीजविरुद्ध ४०६ धावांचा पाठलाग केला होता. आफ्रिकेने २००६मध्ये ४३८ धावांचा पाठलाग केला होता. आता श्रीलंका या यादीत दुसऱ्या स्थानी आहे.

इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूक याने अवघ्या ११६ चेंडूंत २०२ धावांची वादळी खेळी केली. त्याच्या खेळीत २१ चौकार आणि १० षटकारांचा समावेश होता. पुरुषांच्या वनडे क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा ब्रूक हा इंग्लंडचा पहिला फलंदाज ठरला. तसेच त्याने केवळ ११६ चेंडूंत द्विशतक पूर्ण करत वनडे इतिहासातील सर्वात वेगवान द्विशतकाचा विक्रम नोंदवला. जो रूटने ६६ चेंडूंत ६९ धावा करत ब्रूकला चांगली साथ दिली. विल जॅक्सने अवघ्या ३० चेंडूंत नाबाद ६६ धावा ठोकत इंग्लंडला ४२९ धावांपर्यंत पोहोचवले.

४३० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेची सुरुवात अडखळती झाली. सुरुवातीलाच दोन विकेट्स गमावल्याने संघ अडचणीत सापडला. मात्र, अविष्का फर्नांडो आणि पवन रथनायके यांनी महत्त्वपूर्ण भागीदारी करत श्रीलंकेला सामन्यात पुन्हा आणले. फर्नांडोने ८३ चेंडूंत ९७ धावा केल्या. त्याचे शतक अवघ्या तीन धावांनी हुकले. दुसरीकडे, रथनायकेने १०६ चेंडूंत १३० धावांची शानदार खेळी साकारली. त्याच्या फलंदाजीमुळे श्रीलंकेच्या विजयाच्या आशा अधिक बळकट झाल्या. श्रीलंकेच्या डावाला निर्णायक वळण देण्याचे काम शनाकाने केले. त्याने अवघ्या ५० चेंडूंत ९७ धावा कुटल्या. त्यामुळे त्यांनी बाजी मारली.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी खुशखबर! दिवाळीनंतर कसारा मार्गावर १५ डब्यांच्या लोकल वाढणार

MLC Election 2026 : शिक्षक, ‘पदवीधर’साठी आज मतदान; मतदानासाठी यंत्रणा सज्ज; पाच जागांसाठी १८२ उमेदवार रिंगणात

CJP चे आज देशव्यापी आंदोलन; दीपके, राकेश टिकैतसह परकला सीतारामन, प्रकाश राज यांची उपस्थिती

मतवारी दुष्काळाची! छतावरचं पाणी, घरासमोरची टाकी; ब्राझीलची दहा लाख टाक्यांची चळवळ

नांदेड : दसरा गेला अंधारात, आता दिवाळीचं काय? फुले अक्षरशः फेकली रस्त्यावर; शेतकऱ्यांचा वाहतूक खर्चही निघाला नाही