मियामी : प्रथमच फिफा विश्वचषकासाठी पात्र ठरलेल्या केप व्हर्डेने सलग दुसऱ्या सामन्यात पराक्रम केला. फक्त २.५ लाख लोकसंख्या असलेल्या या देशाने सोमवारी पहाटे झालेल्या एच-गटातील साखळी सामन्यात बलाढ्य उरुग्वेला २-२ असे बरोबरीत रोखले. त्यामुळे त्यांच्या बाद फेरी गाठण्याच्या आशा अद्याप कायम आहेत. केप संघाने पदार्पणाच्या लढतीत स्पेनला गोलशून्य बरोबरीत रोखले होते.
एकीकडे अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धजन्य स्थिती कायम असतानाच फिफा विश्वचषकाचा महासंग्राम जागतिक महासत्तेसह मेक्सिको व कॅनडाच्या रणभूमीवर सुरू झाला आहे. १२ जून ते २० जुलै या कालावधीत (भारतीय वेळ आणि तारखांनुसार) अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा येथे संयुक्तपणे फिफा विश्वचषकाच्या २३व्या पर्वाचा थरार रंगत आहे. यंदा प्रथमच तीन देश संयुक्तपणे विश्वचषकाचे यजमानपद भूषवत असून पहिल्यांदाच ४८ संघही सहभागी झाले आहेत. यंदा एका गटात प्रत्येकी चार संघ याप्रमाणे १२ गटांमध्ये ४८ संघांची विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक गटातून आघाडीचे दोन संघ आणि तिसऱ्या क्रमांकावरील सर्वोत्तम आठ संघ असे मिळून एकूण ३२ संघ पुढील फेरी गाठतील. त्यामुळे आता थरार आणखी वाढत आहे.
दरम्यान, मियामी स्टेडियम येथे झालेल्या या लढतीत केप व्हर्डेसाठी केविन पिनाने २१व्या मिनिटाला फ्री किकवर विश्वचषकातील पहिलावहिला ऐतिहासिक गोल नोंदवला. पिनाने उरुग्वेची बचावफळी भेदत गोलरक्षक फर्नांडो मुस्लेराला चकवले. त्यानंतर पहिल्या सत्राच्या उत्तरार्धात मॅक्सीमिलानो अराउजो आणि अगस्टिन कानोबियो यांनी लागोपाठ दोन गोल करत उरुग्वेला २-१ अशी आघाडी मिळवून दिली होती. त्यामुळे दुसऱ्या सत्रात केप व्हर्डे बरोबरी साधणार का, याची उत्सुकता होती.
मग बदली खेळाडू म्हणून आलेल्या हेलिओ वारेला याने ६१व्या मिनिटाला उरुग्वेच्या मथियास ऑलिव्हेराच्या चुकीच्या पासचा फायदा घेत रिकाम्या नेटमध्ये गोल केला आणि सामना २-२ अशा बरोबरीवर आणला. वारेलाचा हा पहिलाच आंतरराष्ट्रीय गोल ठरला. अखेरीस ९० मिनिटांसह भरपाई वेळेतही उरुग्वेला तिसरा गोल करण्यात अपयश आले आणि केप व्हर्डेने बरोबरीचा निर्णायक एक गुण कमावला.
सध्या एच-गटात केप व्हर्डे आणि उरुग्वे या दोन्ही संघांचे दोन सामन्यांतील दोन बरोबरींमुळे प्रत्येकी दोन गुण झाले आहेत. उरुग्वेला पहिल्या लढतीत सौदी अरेबियाविरुद्ध बरोबरीत समाधान मानावे लागले होते. आता केप व्हर्डेचा अंतिम सामना २७ जून रोजी सौदी अरेबियाविरुद्ध होणार आहे, तर उरुग्वेची त्याच दिवशी स्पेनशी गाठ पडेल.
केप व्हर्डेचे मुख्य प्रशिक्षक पेड्रो लेइटाओ ब्रिटो म्हणाले की, हा निकाल लहान देशांच्या संघर्षाला समर्पित आहे. संघात प्रचंड गुणवत्ता असून बाद फेरी गाठण्याचा आत्मविश्वास असल्याचेही त्यांनी यावेळी आवर्जून नमूद केले.
उरुग्वेला केप व्हर्डेविरुद्ध संघर्ष करताना पाहून त्यांचा माजी खेळाडू लुइस सुआरेझसुद्धा चिंतेत दिसला.
गोलफलक
उरुग्वे (२) केप व्हर्डे (२)
अराउजो (४४) पिना (२१)
अगस्टिन (४५) वारेला (६१)
हे नक्की वाचा!
सुमारे पाच लाख लोकसंख्या असलेला आफ्रिकेच्या पश्चिम किनारपट्टीवरील केप व्हर्डे हा लोकसंख्येच्या दृष्टीने विश्वचषकासाठी पात्र ठरणारा तिसरा सर्वात लहान देश आहे.
विश्वचषकाच्या इतिहासात ४० वर्षे किंवा त्याहून अधिक वय असलेले दोन गोलरक्षक एकाच सामन्यात मैदानात उतरण्याची ही पहिलीच वेळ होती. उरुग्वेचा गोलरक्षक फर्नांडो मुस्लेरा व केप व्हर्डेचा गोलरक्षक वोझिन्या यांनी हा विक्रम केला.