FIFA World Cup 2026 : पुनरावृत्ती की स्वप्नपूर्ती? अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात आज रंगणार फुटबॉल विश्वचषकाचा महामुकाबला (Photo-X)
क्रीडा

FIFA World Cup 2026 : पुनरावृत्ती की स्वप्नपूर्ती? अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात आज रंगणार फुटबॉल विश्वचषकाचा महामुकाबला

एकीकडे अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धजन्य स्थिती अद्याप कायम असतानाच रविवारी मध्यरात्री (भारतीय वेळेनुसार सोमवार, २० जुलै, १२.३० वाजता) फुटबॉलच्या महायुद्धात कोण बाजी मारणार, याकडे अवघ्या विश्वाचे लक्ष लागून आहे.

Swapnil S

ईस्ट रुदरफोर्ड : एकीकडे अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धजन्य स्थिती अद्याप कायम असतानाच रविवारी मध्यरात्री (भारतीय वेळेनुसार सोमवार, २० जुलै, १२.३० वाजता) फुटबॉलच्या महायुद्धात कोण बाजी मारणार, याकडे अवघ्या विश्वाचे लक्ष लागून आहे. न्यू जर्सीमधील मेटलाइफ स्टेडियमवर रंगणाऱ्या फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात गतविजेत्या अर्जेंटिनासमोर स्पेनचे कडवे आव्हान असेल. त्यामुळे लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वात खेळणारा अर्जेंटिना २०२२ची पुनरावृत्ती करून सलग दुसऱ्यांदा विश्वचषक उंचावणार की लॅमिन यमालच्या स्पेन संघाची १६ वर्षांनी विश्वविजयाची स्वप्नपूर्ती होणार, हे पाहणे रंजक ठरेल.

गेल्या महिनाभरापासून सुरू झालेला फिफा विश्वचषकाचा थरार आता अंतिम टप्प्यात आहे. भारतीय संघ या स्पर्धेत सहभागी नसला, तरी भारतातील नागरिकांमध्ये विश्वचषकाची चर्चा सातत्याने सुरू असते. यंदा प्रथमच तीन देश संयुक्तपणे या स्पर्धेचे यजमानपद भूषवत होते, तसेच प्रथमच ४८ संघ स्पर्धेत सहभागी झाले होते. १२ जूनपासून सुरू झालेला हा प्रवास उपांत्य फेरीतील चार संघांपर्यंत येऊन ठेपला, तेव्हा सर्वच संघ तुल्यबळ असल्याने कोण बाजी मारेल, हे ठामपणे सांगणे कठीण होते. अखेर पहिल्या उपांत्य लढतीत स्पेनने फ्रान्सची मक्तेदारी मोडीत काढून २०१० नंतर अंतिम फेरी गाठली, तर अर्जेंटिनाने इंग्लंडवर पिछाडीवरून सरशी साधत सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत धडक मारली आहे. अर्जेंटिना उपांत्य फेरीत आजवर एकदाही पराभूत झालेली नाही, हे विशेष.

अर्जेंटिनाने एकंदर तीन वेळा (१९७८, १९८६, २०२२) जेतेपद मिळवले आहे, तर स्पेनने फक्त एकदा (२०१०) ही स्पर्धा जिंकलेली आहे. या लढतीच्या निमित्ताने ३९ वर्षीय अनुभवी मेस्सी विरुद्ध १९ वर्षीय युवा यमाल यांच्यातील द्वंद्व सर्वांना पाहायला मिळेल. त्याशिवाय अर्जेंटिनाच्या आक्रमकांचा स्पेनच्या बचावफळीसह गोलरक्षक उनाई सिमॉनकडे कस लागेल. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प या लढतीसाठी उपस्थित राहणार आहेत. त्याशिवाय हॉलिवूडमधील तारांकित चेहरेही यावेळी हजर असतील. दरम्यान, गतविजेत्या अर्जेंटिनाने साखळीत सलग तीन विजय मिळवताना अनुक्रमे अल्जेरिया, ऑस्ट्रिया व जॉर्डन यांना धूळ चारली. त्यानंतर राऊंड ऑफ ३२ लढतीत केप व्हर्डे व उपउपांत्यपूर्व लढतीत इजिप्तविरुद्ध अर्जेंटिनाने अनुक्रमे ३-२ असा विजय मिळवला. उपांत्यपूर्व सामन्यात अतिरिक्त वेळेत त्यांनी स्वित्झर्लंडवर ३-१ अशी मात केली होती. मग उपांत्य फेरीत इंग्लंडवर ०-१ अशा पिछाडीवरून २-१ अशी सरशी साधून अर्जेंटिनाने एकंदर सातव्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला. मुख्य म्हणजे अर्जेंटिनाने गेल्या काही सामन्यांत सातत्याने पिछाडीवरून सरशी साधत थरारक विजय मिळवले आहेत. त्यामुळे दडपणात कामगिरी उंचावण्यात ते पटाईत आहेत.

दुसरीकडे रॉड्रीच्या नेतृत्वात खेळणाऱ्या स्पेनने यंदा साखळी फेरीत ह- गटातून अग्रस्थानासह आगेकूच करताना सौदी अरेबिया व उरुग्वे यांना धूळ चारली, तर केप व्हर्डेविरुद्ध बरोबरी पत्करली. त्यानंतर बाद फेरीत (राऊंड ऑफ ३२) स्पेनने ऑस्ट्रियाला ३-० असे नेस्तनाबूत केले, तर उपउपांत्यपूर्व लढतीत रोनाल्डोच्या पोर्तुगालचा स्वप्नभंग करताना १-असा विजय मिळवला. या पाचही लढतीत स्पेनने एकही गोल स्वीकारलेला नव्हता. उपांत्यपूर्व फेरीत बेल्जियमविरुद्ध त्यांनी २-१ असा विजय मिळवला. मग उपांत्य लढतीत बलाढ्य फ्रान्सला २-० अशी धूळ चारून स्पेनने दुसऱ्यांदा अंतिम फेरी गाठली. स्पेनची बचावफळी त्यांची खरी ताकद आहे. तसेच छोट्या स्वरुपाचे पासेस देण्यासाठी ते ओळखले जातात.

एकूणच फिफा विश्वचषकाच्या अंतिम सामन्याची उत्कंठा आता शिगेला पोहोचली आहे. मेस्सीच्या कारकीर्दीतील हा अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना ठरण्याची शक्यता आहे. त्याचवेळी यमालच्या रूपात नवा तारा विश्वाला गवसल्याचे स्पेनच्या विजेतेपदाद्वारे स्पष्ट होईल. म्हणूनच उभय संघांतील या लढतीमध्ये कोण विजेता ठरणार, याची आता उत्सुकता लागून आहे.

आमनेसामने

उभय संघांत आतापर्यंत १४ सामने झाले असून अर्जेंटिनाने ६, तर स्पेननेदेखील ६ लढती जिंकल्या आहेत आहेत. उर्वरित दोन सामचे वरोवरीत सुटले आहेत.

फिफा विश्वचषकात अर्जेटिना-स्पेन यापूर्वी एकदाच आमनेसामने आले आहेत. १९६६ मध्ये झालेल्या त्या लढधीत अर्जेटिनाने २-१ अशा बाजी मारली होती.

मैदान ठरणार निर्णायक?

अंतिम सामन्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मैदानावर पाऊस पडल्यास अधिक वेगवान खेळ पाहायला मिळेल. या मैदानावरील खेळपट्टी उखडू नये किंवा फाटू नये म्हणून नैसर्गिक गवतामध्ये कृत्रिम धाग्यांची सिलाई करण्यात आली आहे. या स्पर्धेत आतापर्यंत झालेल्या पहिल्या सात सामन्यांमध्ये या मैदानाबाबत खेळाडू आणि तज्ज्ञांमध्ये तीव्र मतभेद पाहायला मिळाले आहेत. कर्मचारी आणि मैदान व्यवस्थापनाला या मैदानाची स्थिती जास्तीत जास्त सुधारण्यासाठी सुमारे दोन आठवड्यांचा कालावधी मिळाला होता.

हे चुकवू नका!

अर्जेंटिनाने या स्पर्धेत आतापर्यंत ७ सामन्यांत एकूण १९ गोल केले आहेत. यंदाच्या विश्वचषकाच्या सर्वाधिक गोल त्यांच्याच नावे आहेत. तसेच प्रथमच अर्जेंटिनाने एखाद्या स्पर्धेत इतके गोल केले. यापूर्वी १९३०च्या विश्वचषकात त्यांनी ५ सामन्यांत १८ गोल नोंदवले होते.

अर्जेंटिनाने विश्वचषकातील सलग १३ सामन्यांत किमान २ किंवा त्याहून अधिक गोल करण्याचा पराक्रम केला आहे. त्यांनी उरुग्वेचा ७४ वर्षांपूर्वीचा ११ सामन्यांचा विक्रम मागेच मोडला. अर्जेंटिनाने २०२२च्या विश्वचषकात मेक्सिकोविरुद्धच्या लढतीपासून या विक्रमाची सुरुवात केली आहे.

स्पेनने केप व्हर्डे विरुद्धच्या गोलशून्य बरोबरीनंतर प्रतिस्पर्ध्यावर १२-१ अशी मात केली आहे. फ्रान्सविरुद्धच्या विजयामुळे स्पेनची मार्च २०२४ पासूनची नियमित वेळेतील अजिंक्य राहण्याची मालिका ३७ सामन्यांपर्यंत (२८ विजय आणि ९ बरोबरी) पोहोचली आहे.

विजेत्यावर ४८१ कोटींचा वर्षाव आणि गोल्ड रिंग

विश्वचषक विजेत्याला तब्बल ४८१ कोटींचे पारितोषिक देण्यात येईल. त्याशिवाय यंदा विजेत्या संघातील प्रत्येक खेळाडूला विशेष 'गोल्ड' अंगठी देण्यात येईल. 'चॅम्पियनशीप रिंग' असे नाव असलेल्या या अंगठीवर विश्वचषकाची प्रतिकृती असून दुसऱ्या बाजूला विजेत्या ठरणाऱ्या संघाची ओळख किंवा प्रतीक चिन्हांकित केले जाईल. त्याशिवाय विश्वविजेत्या संघातील प्रत्येक खेळाडूला पदक तर दिलेच जाते. उत्तर अमेरिकन क्रीडा जगतात १९व्या शतकाच्या उत्तरार्धापासून विजेत्या संघांना अंगठ्या देण्याची परंपरा आहे, मात्र जगातील इतर भागांमध्ये ही पद्धत अजूनही सर्रास पाहायला मिळत नाही. यंदाची अंतिम फेरी अमेरिकेत होत असल्याने फिफाने या परंपरेला मानाचा मुजरा दिल्याचे दिसून येत आहे. विजेत्या संघाला कालांतराने ३० कस्टमाइज्ड अंगठ्या सुपूर्द केल्या जातील.

मेस्सी-रॉड्री काय म्हणाले?

न्यूयॉर्कमध्ये पार पडलेल्या 'फॅनेटिक्स फेस्ट'च्या मंचावर क्रीडा विश्वातील अनेक दिग्गज खेळाडू एकाच वेळी एकत्र आले होते. यामध्ये सर्वोत्तम सुपर बाउल विजेता टॉम ब्रँडी, टेनिस जगतातील सर्वाधिक ग्रँड स्लॅम विजेता नोव्हाक जोकोव्हिच आणि बास्केटबॉलच्या इतिहासात चार वेळा ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकणारा केव्हिन डुरंट यांचा समावेश होता. हा सोहळा संपण्यापूर्वी या सर्व महान खेळाडूंनी फुटबॉलचा मेस्सीसोबत सेल्फी घेतला. या पार्श्वभूमीवर बोलताना, आम्ही आमचे सर्वस्व पणाला लावू. आम्ही कधीही लढणे सोडत नाही. त्यामुळेच इथवर मजल मारली आहे, असे मेस्सी म्हणाला. स्पेनचा कर्णधार रॉड्रीनेदेखील मेस्सीचे कौतुक करताना आम्ही अर्जेंटिनाला नमवू, असा विश्वास व्यक्त केला.

अंतिम सामना नव्हे, फिनालिसिमा

दक्षिण अमेरिकन आणि युरोपियन फुटबॉल महासंघाद्वारे दर ४ वर्षांनी फिनालिसिमाचे आयोजन केले जाते. यामध्ये कोपा अमेरिका स्पर्धेतील विजेता विरुद्ध युरो चषकातील विजेता आमनेसामने येतात. २०२४मध्ये अर्जेंटिनाने कोपा अमेरिका स्पर्धा जिंकली, तर त्याच वर्षी स्पेनने युरो चषकाचे जेतेपद काबिज केले. मात्र काही वादामुळे यांच्यातील फिनालिसिमा लढत होऊ शकली नाही. आता विश्वचषकाच्या अंतिम सामन्याच्या निमित्ताने उभय संघ आमनेसामने येतील.

अर्जेंटिना

जागतिक क्रमवारीतील स्थान

सर्वोत्तम कामगिरी : विजेतेपद (१९७८, १९८६, २०२२)

आतापर्यंतचा प्रवास साखळी फेरी

  • विजयी वि. अल्जेरिया (३-०) विजयी वि. ऑस्ट्रिया (२-०) विजयी वि. जॉर्डन (३-१)

  • राऊंड ऑफ ३२ विजयी वि. केप व्हर्डे (३-२)

  • उपउपांत्यपूर्व फेरी विजयी वि. इजिप्त (३-२)

  • उपांत्यपूर्व फेरी विजयी वि. स्वित्झर्लंड (३-१)

  • उपांत्य फेरी विजयी वि. इंग्लंड (२-१)

संभाव्य संघ आणि रचना

(४-४-२) इमिलियानो मार्टिनेझ (गोलरक्षक), नाहुएल मोलिना, ख्रिस्टियन रोमेरो, लिसांड्रो मार्टिनेझ, निकोलस टॅगलियाफिको, जुलियानो सिमोन, लिएंड्रो पेरेडेस, अॅलेक्सिस मॅक अॅलिस्टर, एन्झो फर्नांडेझ, ज्युलियन अल्वारेझ, लिओनेल मेस्सी.

प्रशिक्षक : लिओनेल स्कलोनी

अर्जेंटिनाने एकंदर सातव्यांदा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. त्यांनी यापूर्वी १९७८, १९८६, २०२२मध्ये जेतेपद मिळवले आहे. १९३०, १९९०, २०१४मध्ये अर्जेंटिनाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.

मेस्सीवर पुन्हा नजरा; मार्टिनेझकडून अपेक्षा

अर्जेंटिनाच्या संघाची भिस्त पुन्हा एकदा तारांकित मेस्सीवर असेल. ३९ वर्षीय मेस्सीने अर्जेंटिनासाठी सर्वाधिक ८ गोल केले असून तो गोल्डन बूटच्या शर्यतीत पहिल्या दोन स्थानांत आहे. गेल्या दोन लढतींमध्ये मेस्सीला गोल करता आला नाही. मात्र त्याने गोलसहाय्य (असिस्ट) करत विजयात योगदान दिले. मेस्सी हा विश्वचषकात सर्वाधिक १० असिस्ट करणारा पहिलाच खेळाडू ठरला आहे. त्याने अर्जेंटिनाच्याच दिएगो मॅराडोना यांचा विक्रम मोडीत काढला. त्याशिवाय ज्युलियन अल्वारेझ, लॉटारो मार्टिनेझ, एन्झो फर्नांडेझ यांच्याकडून मेस्सीला सहाय्य अपेक्षित आहे. अल्वारेझने स्वित्झर्लंडविरुद्ध नेत्रदीपक गोल केला होता, तर फर्नांडेझ, मार्टिनेझ दडपणाखाली कामगिरी उंचावत आहे. अर्जेंटिनाचा गोलरक्षक एमिलियानो मार्टिनेझला अद्याप छाप पाडता आलेली नाही. आता अंतिम फेरीत त्याच्याकडून सुधारणा अपेक्षित आहे.

स्पेन

जागतिक क्रमवारीतील स्थान

सर्वोत्तम कामगिरी : विजेतेपद (२०१०)

आतापर्यंतचा प्रवास साखळी फेरी

  • बरोबरी वि. केप व्हर्डे (०-०) विजयी वि. सौदी अरेबिया (४-०) विजयी वि. उरुग्वे (१-०)

  • राऊंड ऑफ ३२ विजयी वि. ऑस्ट्रिया (३-०)

  • उपउपांत्यपूर्व फेरी विजयी वि. पोर्तुगाल (१-०)

  • उपांत्यपूर्व फेरी विजयी वि. बेल्जियम (२-१)

  • उपांत्य फेरी विजयी वि. फ्रान्स (२-०)

संभाव्य संघ आणि रचना (४-४-२) उनाई सिमॉन (गोलरक्षक), पेद्रो पोरो, पाऊ कुबारसी, एमेरिक लापोर्ट, मार्क कुकुरेला, रॉड्री, डॅनी ओल्मो, फॅबियन रुईझ, लॅमिन यमाल, मिकेल ओयारझबाल, अॅलेक्स बेना.

प्रशिक्षक : लुईस फुएन्टे

स्पेनने दुसऱ्यांदा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. यापूर्वी २०१०मध्ये त्यांनी अंतिम फेरी गाढून विजेतेपद पटकावले होते. आता स्पेन १६ वर्षांनी पुन्हा जगज्जेतेपद मिळवण्यासाठी उत्सुक असेल.

यमालवर लक्ष; सिमॉन ताकद

स्पेनचा गोलरक्षक सिमॉनसह अन्य बचावपटूंना भेदण्यात बेल्जियमवव्यतिरिक्त कोणालाही यश लाभलेले नाही. त्यामुळेच स्पेनच्या बचावफळीविरुद्ध अर्जेंटिनाच्या आक्रमकांचा कस लागेल. मुख्य म्हणजे विश्वचषकातील ७ पैकी फक्त एकाच सामन्यात स्पेनने गोल स्वीकारला आहे. यामध्ये कुबारसीचा मोलाचा वाटा असून तो स्पर्धेतील सर्वोत्तम युवा खेळाडू ठरू शकतो. त्याशिवाय मिकेल ओयारझबाल, ११ वर्षीय यमाल असे प्रतिभावान आक्रमक व डॅनी ओल्मो, पेड्री, कर्णधार रॉड्री असे मध्यरक्षक स्पेनच्या ताफ्यात आहेत. ओयारझबालने स्पेनकडून या विश्वचषकात सर्वाधिक ५ गोल केले आहेत. तसेच पोर्तुगाल व बेल्जियमविरुद्ध निर्णायक गोल करणारा मिकेल मेरिनो स्पेनसाठी तारणहार ठरत आहे. कुकुरेला, पोरो, कुबारसी व लापोर्ट अशी स्पेनची बचावफळी अर्जेंटिनाच्या तारांकित मेस्सीविरुद्ध कशी कामगिरी करणार, यावर सामन्याचे भवितव्य अवलंबून असेल.

अर्जेंटिना वि. स्पेन

  • स्थळ : मेटलाइफ स्टेडियम, न्यू जर्सी (ईस्ट रुदरफोर्ड)

  • वेळ : मध्यरात्री १२.३० वाजल्यापासून (सोमवार)

  • थेट प्रक्षेपण : यूनाइट८ स्पोर्ट्स, झी सिनेमा आणि झी५ अॅप

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

ऑनलाइन डिलिव्हरी घेताना तुमचे अधिकार काय? घराची सुरक्षितता राखण्यासाठी 'या' गोष्टी जाणून घ्या

Mumbai : कोस्टल रोडवर भरधाव पोर्शे कार डिव्हायडरवर धडकली; भीषण अपघातात गाडीचा पुढील भाग चक्काचूर

विवस्त्र होऊन मंदिरात गेली, देवीची मूर्ती घेऊन तलावात उडी; सॉफ्टवेअर इंजिनिअरच्या मृत्यूमागचं गूढ काय?

Mumbai : एसी लोकलखालून धूर अन् ठिणग्या; घाटकोपर स्थानकात नेमकं काय घडलं? Video

मुंबईच्या धरणांचा पाणीसाठा ५० टक्क्यांवर