FIFA World Cup 2026 : नकोशा स्थानासाठी धडपड! उपांत्य फेरीतील पराभूत फ्रान्स-इंग्लंडमध्ये आज तिसऱ्या क्रमांकाची लढत X
क्रीडा

FIFA World Cup 2026 : नकोशा स्थानासाठी धडपड! उपांत्य फेरीतील पराभूत फ्रान्स-इंग्लंडमध्ये आज तिसऱ्या क्रमांकाची लढत

फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत तसा तर प्रत्येक सामना आणि विजय महत्त्वाचा असतो. मात्र तिसऱ्या स्थानासाठी खेळवण्यात येणारी लढत अनेक संघांना नकोशी वाटते. याच नकोशा स्थानासाठी शनिवारी मध्यरात्री फ्रान्स आणि इंग्लंड हे उपांत्य फेरीत पराभूत झालेले दोन संघ आमनेसामने येतील.

Swapnil S

मियामी : फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत तसा तर प्रत्येक सामना आणि विजय महत्त्वाचा असतो. मात्र तिसऱ्या स्थानासाठी खेळवण्यात येणारी लढत अनेक संघांना नकोशी वाटते. याच नकोशा स्थानासाठी शनिवारी मध्यरात्री फ्रान्स आणि इंग्लंड हे उपांत्य फेरीत पराभूत झालेले दोन संघ आमनेसामने येतील. मियामी स्टेडियमवर रंगणाऱ्या या लढतीत विजय मिळवून तिसरे स्थान पटकावत स्पर्धेचा निरोप घेण्याची दोन्ही संघांची इच्छा असेल.

गेल्या महिनाभरापासून सुरू झालेला फिफा विश्वचषकाचा थरार आता अंतिम टप्प्यात आहे. ४८ संघांपासून सुरू झालेला हा प्रवास उपांत्य फेरीतील चार संघांपर्यंत येऊन ठेपला, तेव्हा सर्वच संघ तुल्यबळ असल्याने कोण बाजी मारेल, हे ठामपणे सांगणे कठीण होते. पहिल्या उपांत्य लढतीत स्पेनने फ्रान्सची मक्तेदारी मोडीत काढून १६ वर्षांनी अंतिम फेरी गाठली, तर अर्जेंटिनाने इंग्लंडवर पिछाडीवरून सरशी साधत सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत धडक मारली. त्यामुळे फ्रान्सचे सलग तिसऱ्या अंतिम फेरीचे स्वप्न उद्ध्वस्त झाले, तसेच १९९६च्या विजेत्या इंग्लंडला ६० वर्षांनी अंतिम फेरी गाठण्यात अपयश आले.

दरम्यान, २७ वर्षीय किलियान एम्बाप्पेच्या नेतृत्वात खेळणाऱ्या फ्रान्सने यंदाच्या विश्वचषकात उपांत्य लढतीपूर्वी ६ सामन्यांत १६ गोल नोंदवले होते. त्यांनी साखळीत इराक, सेनेगल, नॉर्वे यांना धूळ चारली, तर राऊंड ऑफ ३२ लढतीत स्वीडनला नमवले. मग उपांत्यपूर्व सामन्यात मोरोक्कोला २-० असे नमवून फ्रान्सने सलग तिसऱ्यांदा विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठली. मात्र स्पेनविरुद्ध फ्रान्सची आक्रमण फळी पूर्ण निष्प्रभ ठरली. त्यामुळे त्यांना सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरी गाठण्यात अपयश आले. १९९८ व २०१८च्या विजेत्या फ्रान्सला २०२२मध्ये अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागला होता. तसेच एकंदर त्यांनी चौथ्यांदा उपांत्य फेरीत पराभव पत्करला.

दुसरीकडे हॅरी केनच्या नेतृत्वात खेळणाऱ्या इंग्लंडने साखळी फेरीत क्रोएशिया व पनामाला धूळ चारली, तर घानाविरुद्ध बरोबरी पत्करली. मग बाद फेरीत इंग्लंडने आक्रमणाची धार वाढवली. काँगोविरुद्ध २-१, तर मेक्सिकोविरुद्ध त्यांनी ३-२ अशी सरशी साधली. मग उपांत्यपूर्व फेरीत हालँडच्या नॉर्वेला २-१ असे नमवून एकंदर चौथ्यांदा उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. मात्र अर्जेंटिनाविरुद्ध ८५व्या मिनिटापर्यंत १-० असे आघाडीवर असतानाही बचावात्मक खेळाने इंग्लंडचा घात केला. अर्जेंटिनाने २-१ असा विजय मिळवला, तर इंग्लंडला १९९० व २०१८ प्रमाणेच पुन्हा एकदा उपांत्य फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले.

एम्बाप्पे-केनमध्ये चुरस कायम

या लढतीत प्रामुख्याने एम्बाप्पे आणि केन यांच्यावर लक्ष असेल. दोघेही अद्याप गोल्डन बूटच्या शर्यतीत कायम आहेत. एम्बाप्पेने ७ सामन्यांत ८ गोल व ३ असिस्ट केले असून तो अर्जेंटिनाच्या लिओनेल मेस्सीपेक्षा (८ गोल, ४ असिस्ट) एका असिस्टने मागे आहे. तसेच केन व इंग्लंडचाच ज्यूड बेलिंघम या दोघांच्याही नावे प्रत्येकी ६ गोल आहेत. त्यामुळे कोणी मेस्सीवर सरशी साधणार का, हे पाहणे रंजक ठरेल. इंग्लंडच्या बचावाचा कस लागेल. फ्रान्सला डेम्बेले, ओलिसेकडून कामगिरीत सुधारणा अपेक्षित आहे. फ्रान्सने १९५८ व १९८६मध्ये तिसरा क्रमांक मिळवलेला आहे. इंग्लंडला असे अद्याप एकदाही जमलेले नाही.

  • वेळ : मध्यरात्री २.३० वाजल्यापासून (रविवार)

  • थेट प्रक्षेपण : यूनाइट८ स्पोर्ट्स वाहिनी आणि झी५ ॲप

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

जेवणाची थाळी महागली...! शाकाहारी थाळी २९ रुपयांनी वाढली; ब्रॉयलर कोंबडी १० टक्क्यांनी महागली, मांसाहारी थाळीही महागच

Thane : कावेसरमध्ये महापालिकेची CBSE शाळा; पूर्व प्राथमिक ते दहावीपर्यंत शिक्षणाची सुविधा

स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी राज्यस्तरीय कृती दलाची स्थापना; अध्यक्षपदी डॉ. नीलम गोऱ्हे यांची नियुक्ती

राज्याच्या लॉजिस्टिक्स व सागरी क्षमतेला मोठा बूस्ट; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

पीएम-फिनटेक परिषद : मोदींचे UPI विस्ताराचे आवाहन