FIFA World Cup 2026 : फ्रान्स, मोरोक्कोची उपांत्यपूर्व फेरीत धडक  (Photo-@Sportsgully)
क्रीडा

FIFA World Cup 2026 : फ्रान्स, मोरोक्कोची उपांत्यपूर्व फेरीत धडक

फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत शनिवारी मध्यरात्री झालेल्या दोन उपउपांत्यपूर्व लढतीत फ्रान्स आणि मोरोक्को यांनी शानदार विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरी गाठली.

Swapnil S

फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत शनिवारी मध्यरात्री झालेल्या दोन उपउपांत्यपूर्व लढतीत फ्रान्स आणि मोरोक्को यांनी शानदार विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरी गाठली. एकीकडे किलियान एम्बाप्पेच्या चमकदार कामगिरीमुळे फ्रान्सने पॅराग्वेचा प्रतिकार मोडीत काढला. दोन्ही संघांतील खेळाडूंमध्ये झालेली बाचाबाची व पॅराग्वेने केलेला घातक खेळ यामुळेही हा सामना गाजला. दुसरीकडे अझेदीन उनाहीच्या दोन गोलमुळे मोरोक्कोने यजमान कॅनडाचे पॅकअप केले. आता उपांत्यपूर्व फेरीत फ्रान्स आणि मोरोक्को एकमेकांविरुद्ध उभे ठाकणार आहेत. सोमवारी मध्यरात्री चाहत्यांना रोनाल्डोचा पोर्तुगाल विरुद्ध स्पेन आणि बेल्जियम विरुद्ध अमेरिका यांच्यातील उपउपांत्यपूर्व लढती पाहायला मिळतील.

पॅराग्वेचा प्रहार, एम्बाप्पेचे प्रत्युत्तर

फिलाडेल्फिया : फिफा विश्वचषकाचे जेतेपद मिळवण्यासाठी प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या फ्रान्सला शनिवारी मध्यरात्री यंदाच्या स्पर्धेत प्रथमच विजयासाठी संघर्ष करावा लागला. अखेरीस कर्णधार किलियान एम्बाप्पेने ७० व्या मिनिटाला पेनल्टीच्या रुपात केलेल्या एकमेव गोलच्या बळावर फ्रान्सने उपउपांत्यपूर्व लढतीत पॅराग्वेचा १-० असा पराभव केला.

याबरोबरच फ्रान्सने सलग चौथ्या विश्वचषकात उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. सामन्यादरम्यान पॅराग्वेच्या खेळाडूंनी फ्रान्सच्या खेळाडूंना डिवचण्याचा आणि वाद घालण्याचा प्रयत्न केला, मात्र एम्बाप्पेने शांत राहून खेळावर लक्ष केंद्रित केले. आता गुरुवारी मध्यरात्री होणाऱ्या उपउपांत्यपूर्व लढतीत फ्रान्सचा मोरोक्कोशी मुकाबला होईल. २०२२च्या विश्वचषकातील उपांत्य फेरीत उभय संघ आमनेसामने आले होते. त्यावेळी फ्रान्सने मोरोक्कोचा २-० असा पराभव केला होता.

पॅराग्वेच्या खेळाडूंनी सातत्याने केलेला घातकी खेळ, फ्रान्सच्या खेळाडूंनी गोल करण्याची गमावलेली संधी, दोन्ही संघांतील खेळाडूंत झालेली बाचाबाची आणि तब्बल ३८ अंश तापमानात झालेला संघर्ष यामुळे ही लढत चर्चेत राहिली. पॅराग्वेला मात्र २०१० नंतर प्रथमच उपांत्यपूर्व फेरी गाठण्यात अपयश आले. २०१४ ते २०२२ काळात झालेल्या तीन विश्वचषकांसाठी पॅराग्वे पात्र ठरला नव्हता. त्यांनी यंदा राऊंड ऑफ ३२ लढतीत जर्मनीला धक्का दिला होता. मात्र फ्रान्सकडून पराभूत झाल्याने त्यांचे आव्हान संपुष्टात आले आहे.

१२ जून ते २० जुलै या कालावधीत (भारतीय वेळ आणि तारखांनुसार) अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा येथे संयुक्तपणे फिफा विश्वचषकाच्या २३व्या पर्वाचा थरार रंगत आहे. यंदा प्रथमच तीन देश संयुक्तपणे विश्वचषकाचे यजमानपद भूषवत असून पहिल्यांदाच ४८ संघही सहभागी झाले होते. जर्मनी, नेदरलँड्स, उरुग्वे या संघांचे आव्हान संपुष्टात आले असून पहिलाच विश्वचषक खेळणारा केप व्हर्डे, जपान, काँगो प्रजासत्ताक या संघांनी गारद होण्यापूर्वी सर्वांची मने जिंकली. आता विश्वचषक स्पर्धेचा थरार उपउपांत्यपूर्व फेरीच्या टप्प्यावर असून प्रत्येकी लढतीनंतर थरार वाढत आहे.

दरम्यान, फिलाडेल्फिया स्टेडियम येथे ६८ हजार प्रेक्षकांच्या साक्षीने झालेल्या या लढतीत फ्रान्स सहज वर्चस्व गाजवेल, असे अपेक्षित होते. कारण फ्रान्सने यंदा आतापर्यंतच्या चारही सामन्यांत किमान ३ गोल झळकावत प्रतिस्पर्धी संघाला हैराण केले होते. मात्र पॅराग्वेने पहिल्या सत्रात त्यांना कडवी झुंज दिली. अँड्रेस कुबासने एम्बाप्पेला पाडल्यानंतर ३५व्या मिनिटाला दोन्ही संघांचे खेळाडू एकमेकांना ढकलत होते. मथियास गालार्झा यानेही एम्बाप्पेला ऑफ द बॉल कोपर मारून मैदानावर पाडले होते, ज्यावरून त्यांच्यात शाब्दिक युद्ध झाले.

अखेरीस दुसऱ्या सत्रात ६७व्या मिनिटाला पॅराग्वेच्या दिएगो गोमेझने डीझायरला पेनल्टी बॉक्समध्ये पाडल्याने फ्रान्सला पेनल्टी बहाल करण्यात आली. वीएआरद्वारे तपासणी केल्यानंतरही हा निर्णय कायम राहिला आणि ७०व्या मिनिटाला एम्बाप्पेने पेनल्टी किक घेत फ्रान्सला १-० अशी आघाडी मिळवून दिली. हाच गोल त्यांच्या विजयात निर्णायक ठरला. फ्रान्सच्या खेळाडूंनी मैदानातच नृत्य करून जल्लोष केला. अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या २५०व्या वर्धापनदिनानिमित्त या लढतीसाठी स्टेडियमबाहेर चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती.

  • १९ एम्बाप्पेच्या विश्वचषक कारकीर्दीतील एकूण गोलची संख्या १९ झाली आहे. फक्त अर्जेंटिनाचा लिओनेल मेस्सी (२० गोल) एम्बाप्पेच्या पुढे आहे.

  • एम्बाप्पेने या विश्वचषकात ७ सर्वाधिक गोल करणाऱ्यांच्या यादीत सात गोलसह संयुक्तपणे अग्रस्थान मिळवले. मेस्सीनेसुद्धा ७ गोल नोंदवले आहेत.

  • एम्बाप्पे हा तीन वेगवेगळ्या १ विश्वचषकांच्या बाद फेरीत (नॉकआऊट) किमान ३ गोल करणारा जगातील एकमेव खेळाडू ठरला आहे.

शारीरिक आणि शाब्दिक युद्ध

अॅड्रेस कुबासने एम्बाप्पेला पाडल्यानंतर ३५व्या मिनिटाला दोन्ही संघांचे खेळाडू एकमेकांना ढकलत होते. मथियास गालार्झा यानेही एम्बाप्पेला ऑफ द बॉल कोपर मारून मैदानावर पाडले होते, ज्यावरून त्यांच्यात शाब्दिक युद्ध झाले.

सामन्यानंतर पॅराग्वेचा २६ वर्षीय गोलकीपर ओरलैंडो गिल याने खिलाडूवृत्ती दाखवत हस्तांदोलनासाठी हात पुढे केला, मात्र एमबाप्पेने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. यामुळे संतापलेल्या गिलने बॉल थेट एम्बाप्पेच्या पाठीवर फेकला. "मी हस्तांदोलनाचा प्रयत्न केला, पण त्याने लक्ष न दिल्याने माझा पारा चढला, मात्र नंतर मी शांत झालो," असे गिल म्हणाला.

फ्रान्सचे प्रशिक्षक दिदिएर देशचॅम्प्स म्हणाले की, "ते प्रत्येक युक्ती वापरतात, हा असा फुटबॉल नाही, जो लोकांना स्टेडियममध्ये खेचून आणेल, तसेच त्यांच्या बेंचवरून आलेल्या शिवीगाळीची गरज नव्हती. ७७व्या मिनिटाला कैसेरेसने एम्बाप्पेच्या उजव्या पायावर लाथ मारली, तरीही पॅराग्वेला एकही पिवळे कार्ड मिळाले नाही. फ्रान्सला सामन्यात तीन पिवळी कार्डे मिळाली, तर पॅराग्वेला सामन्यानंतर पंचांशी वाद घातल्याबद्दल एक पिवळे कार्ड मिळाले.

रोनाल्डो अन् पोर्तुगालच्या मार्गात स्पेनचा अडथळा

अर्लिंग्टन : तारांकित फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोचे विश्वचषक विजयाचे स्वप्न अद्याप कायम आहे. आता सोमवारी मध्यरात्री रोनाल्डोच्या पोर्तुगाल संघाची झुंजार वृत्तीच्या स्पेनशी पडणार आहे. त्यामुळे पोर्तुगाल त्यांना नमवून उपांत्यपूर्व फेरी गाठणार का, याकडे अवघ्या विश्वाचे लक्ष लागून आहे.

एकीकडे अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धजन्य स्थिती कायम असतानाच फिफा विश्वचषकाचा महासंग्राम जागतिक महासत्तेसह मेक्सिको व कॅनडाच्या रणभूमीवर सुरू आहे. १२ जून ते २० जुलै या कालावधीत (भारतीय वेळ आणि तारखांनुसार) अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा येथे संयुक्तपणे फिफा विश्वचषकाच्या २३व्या पर्वाचा थरार रंगत आहे. यंदा प्रथमच तीन देश संयुक्तपणे विश्वचषकाचे यजमानपद भूषवत असुन

पहिल्यांदाच ४८ संघही सहभागी झाले होते. जर्मनी, नेदरलँड्स, उरुग्वे या संघांचे आव्हान संपुष्टात आले असून पहिलाच विश्वचषक खेळणारा केप व्हर्डे, जपान, काँगो प्रजासत्ताक या संघांनी गारद होण्यापूर्वी सर्वांची मने जिंकली. आता विश्वचषक स्पर्धेचा थरार उपउपांत्यपूर्व फेरीच्या टप्प्यावर असून प्रत्येकी लढतीनंतर थरार वाढत आहे.

दरम्यान, पोर्तुगालने राऊंड ऑफ ३२ लढतीत क्रोएशियावर २-१ अशी सरशी साधली होती. २५ वर्षीय आक्रमणपटू गॉझालो रामोसने भरपाई वेळेत केलेल्या निर्णायक गोलच्या बळावर पोर्तुगालने क्रोएशियावर २-१ अशी पिछाडीवरून मात केली.

रोनाल्डोने या स्पर्धेत आतापर्यंत ३ गोल केले आहेत. मात्र तरीही त्याला लौकिकानुसार खेळ करता आलेला नाही, असे जाणकारांचे म्हणणे आहे. २०१८मध्ये स्पेनविरुद्धच रोनाल्डोने हॅटट्रिक साकारली होती. त्यामुळे आता ८ वर्षांनी रोनाल्डो पुन्हा चमक दाखवून टीकाकारांची तोंडे बंद करणार का, हे पाहणे रंजक ठरेल. दुसरीकडे स्पेनचा संघ सांघिक कामगिरीसाठी ओळखला जातो. त्यांची मदार लॅमिन यमाल, ओयरझबाल, पेड्री या खेळाडूंवर आहे. स्पेनला यंदा जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात असून त्यांनी या विश्वचषकात अद्याप एकही गोल प्रतिस्पर्धी संघाला करू दिलेला नाही. त्यामुळे पोर्तुगालच्या आक्रमकांचा स्पेनच्या बचावपटूंविरुद्ध कस लागेल.

आजचे सामने

  • स्पेन वि. पोर्तुगाल (मध्यरात्री १२.३० वाजता)

  • बेल्जियम वि. अमेरिका (मंगळवारी पहाटे ५.३० वाजता)

  • थेट प्रक्षेपण: यूनाइट८ स्पोर्ट्स, झी सिनेमा आणि झी५ ॲप

Mumbai Rain : मुसळधार पावसाचा धोका वाढला; खासगी कंपन्यांसाठी 'वर्क फ्रॉम होम'च्या सूचना, सरकारी कर्मचाऱ्यांना हाफ डे

Mumbai Rain : मुंबईसाठी रेड अलर्ट! ताशी ९० किमी वेगाने वादळी वारे; अतिवृष्टीचा इशारा, १५ हजार कर्मचारी तैनात

मुंबईत पावसाचा कहर! पूरस्थितीत उपयोगी ठरणार 'हे' ६ अ‍ॅप्स, रिअल-टाइम अलर्टपासून लोकल अपडेट्सपर्यंत सर्व माहिती एका क्लिकवर

Mumbai : फुटपाथवर आता कमी उंचीची सावली देणारी झाडे; BMC देणार उद्यान विभागाला धडे

वारकऱ्यांसाठी प्रथमच एअर ॲम्बुलन्सची सुविधा; आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती