अखिल भारतीय फुटबॉल महासंघावर (एआयएफएफ) लादलेली बंदी उठविण्याचा निर्णय ‘फिफा’ने अखेर ११ दिवसांनी घेतला. या निर्णयामुळे आता कुमारी (१७ वर्षांखालील) विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या आयोजनाचा मार्ग मोकळा झाला आहे. ‘एआयएफएफ’च्या कारभारात प्रशासकीय समितीचा हस्तक्षेप होत असल्याचे कारण दाखवत ‘फिफा’ने १५ ऑगस्ट रोजी ‘एआयएफएफ’बंदी घातली होती.
‘फिफा’ समितीने ‘एआयएफएफ’वरील बंदी उठविण्याच्या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे ऑक्टोबरमध्ये होणारी कुमारी विश्वचषक फुटबॉल स्पर्धा भारतातच होईल, असे ‘फिफा’ने ‘एआयएफएफ’ला पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने प्रशासकीय समिती हटविण्याचा आदेश दिल्यानंतर ‘फिफा’ने बंदी उठविण्याचा निर्णय घेतला. ‘एआयएफएफ’च्या निवडणुकीवर ‘फिफा’ व ‘एएफसी’ यांची नजर ठेवून असणार आहे. निवडणूक सुरळीत होण्यासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल, असेही पत्रात म्हटले आहे.