@ImTanujSingh
क्रीडा

अखेर चॅम्पियन्स ट्रॉफी बुमराविनाच! पाठदुखीमुळे संपूर्ण स्पर्धेला मुकणार; यशस्वीला वगळले; हर्षित, वरुण भारतीय संघात

अखेर तारांकित वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराविनाच भारताला आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत खेळावे लागणार आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : अखेर तारांकित वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराविनाच भारताला आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत खेळावे लागणार आहे. पाठदुखीमुळे बुमरा संपूर्ण स्पर्धेला मुकणार असल्याचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) मंगळवारी रात्री जाहीर केले. बुमराच्या जागी हर्षित राणाची भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. त्याशिवाय मुंबईचा सलामीवीर यशस्वी जैस्वालची राखीव खेळाडूंमध्ये गच्छंती झाली आहे. फिरकीपटू वरुण चक्रवर्तीचा यशस्वीच्या जागी १५ खेळाडूंच्या मुख्य संघात समावेश करण्यात आला आहे.

१९ फेब्रुवारीपासून पाकिस्तान आणि दुबई येथे चॅम्पियन्स ट्रॉफी रंगणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सर्व सामने दुबईत खेळणार आहे. अ-गटात भारतासह पाकिस्तान, बांगलादेश आणि न्यूझीलंड यांचा समावेश आहे. २० तारखेला भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध पहिली, तर २३ तारखेला पाकिस्तानविरुद्ध दुसरी लढत खेळणार आहे. त्यानंतर २ मार्चला भारत-न्यूझीलंड सामना रंगेल. ९ मार्च रोजी अंतिम सामना होणार आहे. या चॅम्पियन्स ट्रॉफीसह इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी राष्ट्रीय निवड समितीने १८ जानेवारीला भारतीय संघाची घोषणा केली होती. त्यावेळी निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी बुमरा इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यापर्यंत परतेल, असे सांगितले होते. तसे न झाल्यास किमान चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या अथवा दुसऱ्या लढतीपर्यंत तरी बुमराचे पुनरागमन अपेक्षित होते. मात्र आता बुमरा थेट आयपीएलमध्येच खेळताना दिसू शकतो.

“बुमरा आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीला मुकणार आहे. त्याच्या जागी हर्षितचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. तसेच वरुणलाही मुख्य संघात स्थान देण्यात आले असून यशस्वी राखीव खेळाडूंमध्ये असेल,” असे बीसीसीआयने पत्रकात म्हटले. यशस्वीसह अष्टपैलू शिवम दुबे आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज यांनाही राखीव खेळाडूंत स्थान लाभले आहे. मात्र मुख्य १५ खेळाडूंपैकी एखादा कोणी जायबंदी झाला अथवा माघार घेतली, तरच या तिघांना दुबईत पाठवण्यात येईल.

३१ वर्षीय बुमराने ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत अवघ्या १३.०६च्या सरासरीने तब्बल ३२ बळी मिळवले. बुमराने या मालिकेत १५०हून अधिक षटके गोलंदाजी केली. भारताने ही मालिका १-३ अशी गमावली. मात्र बुमराच मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. सिडनी येथील पाचव्या कसोटीत बुमरा भारताचे कर्णधारपद भूषवत होता. मात्र पाठदुखीमुळे दुसऱ्या डावात बुमरा गोलंदाजीसाठी आला नाही. पहिल्या डावातच गोलंदाजीच्या वेळेस त्याची पाठ दुखू लागल्याने स्टेडियम सोडून तो स्कॅन करण्यासही गेला होता.

त्यानंतर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात बुमरा बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) दाखल झाला. तेथे बुमराची तंदुरुस्ती चाचणी घेण्यात आली. बुमराच्या पाठदुखीचे स्वरूप फारसे गंभीर नाही, असे समजते. एनसीएचे प्रमुख नितीन पटेल यांनी बुमराने सर्व चाचण्या योग्यरित्या दिल्या. असेही सांगितले. मात्र १० षटके गोलंदाजी करण्याव्यतिरिक्त क्षेत्ररक्षण करण्यासाठी आवश्यक असलेली तंदुरुस्ती मिळवण्यासाठी त्याला आणखी काही काळ लागू शकतो. त्यामुळे निवड समितीने अंतिम निर्णय घ्यावा, असे ते म्हणाले. त्यानुसार निवड समितीने धोका न पत्करण्याचे ठरवले. त्यामुळे आता बुमराच्या अनुपस्थितीत इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत पदार्पण करणारे हर्षित, वरुण चॅम्पियन्स ट्रॉफीतही त्यांची निवड सार्थ ठरवतील, अशी अपेक्षा ठेवण्यावाचून भारतीय चाहत्यांना पर्याय नाही.

बुमरा इतका महत्त्वाचा का?

बुमरा सध्या कारकीर्दीतील सर्वोच्च शिखरावर होता. डिसेंबर-जानेवारीत झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत त्याने एकूण ३२ बळी मिळवून जवळपास सर्व लढतींमध्ये भारतीय गोलंदाजीचा भार वाहिला.

बुमराला काही दिवसांपूर्वीच आयसीसीने २०२४ या वर्षातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू तसेच सर्वोत्तम कसोटीपटूचा पुरस्कार जाहीर केला. बुमराने २०२४मध्ये झालेल्या टी-२० विश्वचषकातसुद्धा सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार पटकावला.

मोहम्मद शमी नुकताच भारतीय संघात पुनरागमन करत असून अद्याप पूर्णपणे लयीत दिसलेला नाही. अशा स्थितीत हर्षित व अर्शदीप सिंग यांच्यावर दडपण येऊ शकते. त्यामुळे बुमरा भारतीय संघात असणे गरजेचे होते.

प्रशिक्षक गंभीरमुळे हर्षित, वरुणला संधी?

बीसीसीआयच्या एका पदाधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार प्रशिक्षक गौतम गंभीरच्या सल्ल्यानुसार बुमरासंबंधी निवड समितीने धोका पत्करला नाही, असे समजते. बुमराच्या पाठदुखीविषयी जानेवारीपासूनच सगळीकडे चर्चा सुरू होती. त्यामुळे हर्षितला इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी स्थान देण्यात आले. तसेच टी-२० मालिकेत छाप पाडणारा वरुणही अनपेक्षितपणे एकदिवसीय संघात आला. या दोघांनाही पदार्पणाची संधी देण्यात आली. बुमराला १५ खेळाडूंत स्थान देत मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत प्रतीक्षा करता आली असती. कारण एनसीएच्या वैद्यकीय चमूने बुमरा संपूर्ण गोलंदाजी तसेच क्षेत्ररक्षणासाठी तंदुरुस्त होण्याकरता आणखी २-३ आठवडे लागतील, असे सांगितले. मात्र गंभीरच्या सांगण्यावरून निवड समितीने धोका न पत्करता हर्षितला प्राधान्य दिले. आयपीएलमध्ये गंभीर २०२४पर्यंत कोलकाता संघाचा मार्गदर्शक होता. याच संघातून हर्षित व वरुण खेळतात.

भारताचा सुधारित संघ

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, के. एल. राहुल, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती.

राखीव : यशस्वी जैस्वाल, मोहम्मद सिराज, शिवम दुबे.

एकत्र आणणं माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं; राज ठाकरेंचा हल्लाबोल

उद्धव ठाकरे यांचे आक्रमक भाषण; म्हणाले ''हिंदू आणि हिंदुस्थान मान्य आहे; पण हिंदीची सक्ती मान्य नाही!''

''कुठचाही 'झेंडा' नाही, मराठी हाच 'अजेंडा'; माझ्या मराठीकडे-महाराष्ट्राकडे वेड्यावाकड्या नजरेने पाहायचं नाही,'' वाचा राज ठाकरे यांचं संपूर्ण भाषण

दोघा पुतण्यांचे हात धरून सुप्रिया सुळेंनी काकांच्या शेजारी केलं उभं; पहा Video

''जर इथे येऊन धंदा करताय तर मराठी बोलायची लाज कसली?'' अभिनेते भरत जाधव यांचा संतप्त सवाल