क्रीडा

फ्लेमिंग, पाँटिंगसह लक्ष्मण मुख्य प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) पुरुष संघाच्या नव्या प्रशिक्षकाचा शोध सुरू केला असून यासाठी इच्छुकांना अर्ज सादर करण्याचे आवाहन करणारी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली.

Swapnil S

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) पुरुष संघाच्या नव्या प्रशिक्षकाचा शोध सुरू केला असून यासाठी इच्छुकांना अर्ज सादर करण्याचे आवाहन करणारी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. मुख्य प्रशिक्षकाचा कार्यकाळ साडेतीन वर्षांचा असेल असेही या जाहिरातीत स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच न्यूझीलंडचा स्टीफन फ्लेमिंग, ऑस्ट्रेलियाचा रिकी पाँटिंग आणि भारताचा व्हीव्हीएस लक्ष्मण हे माजी क्रिकेटपटू प्रशिक्षकपदासाठी शर्यतीत असल्याचे समजते.

सध्याचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडचा कार्यकाळ आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेनंतर संपुष्टात येणार आहे. द्रविडला पुन्हा अर्ज करण्याची मुभा असली, तरी ‘बीसीसीआय’ नवा प्रशिक्षक नेमण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे. द्रविड नोव्हेंबर २०२१ पासून भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षकपद सांभाळत आहे. प्रत्यक्षात त्याचा करार गेल्या वर्षीच्या एकदिवसीय विश्वचषकानंतर संपुष्टात आला होता. मात्र, ‘बीसीसीआय’कडून त्याला जूनमध्ये होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषकापर्यंत मुदतवाढ देण्यात आली. आता द्रविड पुन्हा अर्ज करणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. अर्ज करण्यासाठी २७ मेपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. “निवड प्रक्रियेमध्ये अर्जांचे सखोल पुनरावलोकन, त्यानंतर निवडलेल्या उमेदवारांच्या वैयक्तिक मुलाखती आणि त्यांचे मूल्यांकन करण्यात येईल,” असे ‘बीसीसीआय’कडून सांगण्यात आले.

नवा प्रशिक्षक १ जुलैपासून कार्यभार सांभाळेल आणि त्याचा करार ३१ डिसेंबर, २०२७ पर्यंतचा असेल. या कालावधीत भारतीय संघ चॅम्पियन्स करंडक (२०२५), ट्वेन्टी-२० विश्वचषक (२०२६) आणि एकदिवसीय विश्वचषक (२०२७) अशा महत्त्वाच्या स्पर्धा खेळणार आहे. शिवाय भारतीय संघ ऑस्ट्रेलिया (२०२४-२५) आणि इंग्लंडच्या (२०२५) दौऱ्यावरही जाणार आहे. लक्ष्मण सध्या बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा (एनसीए) प्रमुख असल्याने नवीन प्रशिक्षक नेमायचे झाल्यास तो या शर्यतीत वरचढ ठरू शकतो.

द्रविडच्या मार्गदर्शनाखाली भारताने २०२३चा एकदिवसीय विश्वचषक तसेच जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. मात्र दोन्ही वेळेस जेतेपदाने भारताला हुलकावणी दिली. त्याशिवाय २०२२च्या टी-२० विश्वचषकातही भारताने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. मात्र आयसीसी जेतेपदाचा दुष्काळ संपुष्टात आणण्यात द्रविडही अपयशी ठरला आहे. त्यामुळे आता आगामी टी-२० विश्वचषकात त्याच्याकडे सर्वांचे लक्ष असेल.

जूनपासून अमेरिका आणि वेस्ट इंडिज येथे टी-२० विश्वचषक रंगणार असून भारतीय संघ ५ तारखेला आयर्लंडविरुद्ध सलामीची लढत खेळणार आहे.

कोण करू शकणार अर्ज?

  • वय ६० वर्षांपेक्षा कमी, किमान ३० कसोटी किंवा ५० एकदिवसीय सामने खेळण्याचा अनुभव.

  • अथवा ‘आयसीसी’चे पूर्ण सदस्यत्व असलेल्या कसोटी संघाचे किमान दोन वर्षांसाठी प्रशिक्षकपद भूषवण्याचा अनुभव.

  • सहयोगी (असोसिएट्स) देश वा ‘आयपीएल’ संघाचे किमान तीन वर्षे प्रशिक्षकपद भूषवण्याचा अनुभव असलेल्या व्यक्तीलाच भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज करता येणार आहे.

अदानी पुन्हा गोत्यात; सौरऊर्जा कंत्राट मिळविण्यासाठी दिली 2000 कोटींची लाच, अमेरिकेतील कोर्टात आरोप

मुख्यमंत्रीपदावरून रणकंदन! महायुतीत फडणवीस, शिंदे, अजित पवारांच्या नावाचे दावे

अपक्ष, बंडखोरांवर सत्ता स्थापनेची मदार; महायुती व मविआची जोरदार मोर्चेबांधणी

रशियाचा युक्रेनवर आंतरखंडीय क्षेपणास्त्राने हल्ला

कोल्हापूरच्या चेतन पाटीलला जामीन मंजूर; जयदीप आपटेच्या जामिनावर सोमवारी सुनावणी