क्रीडा

झ्वेरेव्ह, जोकोव्हिच, गॉफ, पेगुला यांची दमदार विजयी सलामी; फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेत दुसऱ्या दिवसातील काही लढतींवर पावसाचे पाणी

फ्रेंच ओपन खुल्या टेनिस स्पर्धेत जर्मनीचा अलेक्झांडर झ्वेरेव्ह, सर्बियाचा नोव्हाक जोकोव्हिच, अमेरिकेची कोको गॉफ व अमेरिकेचीच जेसिका पेगुला यांनी विजयी सलामी नोंदवली.

Swapnil S

पॅरिस : फ्रेंच ओपन खुल्या टेनिस स्पर्धेत जर्मनीचा अलेक्झांडर झ्वेरेव्ह, सर्बियाचा नोव्हाक जोकोव्हिच, अमेरिकेची कोको गॉफ व अमेरिकेचीच जेसिका पेगुला यांनी विजयी सलामी नोंदवली.

फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेला रविवारपासून प्रारंभ झाला. चार प्रतिष्ठित ग्रँडस्लॅम स्पर्धांपैकी एक असलेल्या या स्पर्धेत यंदा राफेल नदाल नसेल. मात्र त्याच्यासह रॉजर फेडरर, नोव्हाक जोकोव्हिच व अँडी मरे या चौकडीला रविवारी कोर्टवर आमंत्रित करण्यात आले होते. तसेच चौघांचाही विशेष सन्मान करण्यात आला.

मंगळवारी पुरुष एकेरीत तिसऱ्या मानांकित झ्वेरेव्हने लर्नर टिनला ६-४, ६-३, ६-४ अशी धूळ चारली. सहाव्या मानांकित जोकोव्हिचने मॅक्डोनाल्डला ६-३, ६-३, ६-३ असे नेस्तनाबूत केले. या दोघांनीही २ तासांच्या आत आपापले सामने जिंकले.

महिला एकेरीत तिसऱ्या मानांकित पेगुलाने तोडोनीला ६-३, ६-४ असे नामोहरम केले. दुसऱ्या मानांकित गॉफने गॅडेकीला ६-२, ६-२ असे पराभूत करून आगेकूच केली.

२०व्या मानांकित त्सित्सिपासने थॉमस एचिव्हेरीला ७-५, ६-३, ६-४ असे तीन सेटमध्ये पराभूत केले. अल्कराझने इटलीच्या झिपेरीवर ६-३, ६-४, ६-२ अशी मात केली. चौथ्या मानांकित टेलर फ्रिट्झला मात्र गाशा गुंडाळावा लागला. सातव्या मानांकित कॅस्पर रूडने आगेकूच केली. जपानच्या तारांकित ओसाकाने मात्र निराशा केली. स्पेनच्या पाओलो बडासाने तिला धूळ चारली. इगा स्विआटेकने मात्र सहज विजय नोंदवून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.

दरम्यान, यंदा नदाल निवृत्त झाल्याने स्पर्धेत सहभागी नाही. तसेच जोकोव्हिचही दुखापतीपासून झुंजत आहे. त्यामुळे अल्कराझ व अग्रमानांकित जॅनिक सिनर यांना जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे. महिला एकेरीत पोलंडची इगा स्विआटेक व बेलारूसची आर्यना सबालेंका यांना जेतेपद मिळवण्याची उत्तम संधी आहे. १४ जूनपर्यंत हा हंगाम रंगणार आहे.

सुप्रीम कोर्टाचा मोठा आदेश! दिल्ली-NCR मधील सर्व भटक्या कुत्र्यांना उचला, शेल्टरमध्ये सोडा; अडथळा आणणाऱ्यांवर कारवाई करा

Pune : कुंडेश्वर दर्शनाला जाताना काळाचा घाला; खचाखच भरलेली पिकअप व्हॅन रस्त्याच्या उतारावरून २५-३० फूट खाली कोसळली, ७ जणांचा मृत्यू

मुंबई-गोवा महामार्गाचा महाराजा! सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आगळेवेगळे आंदोलन; यंदा थेट महामार्गावरच गणेशोत्सव

वेगमर्यादेचे उल्लंघन! Mumbai Pune Expressway वर ४७० कोटींचे चलन जारी, मात्र...

गरज पडल्यास शस्त्रेही उचलू; जैन मुनी निलेशचंद्र विजय यांचा इशारा