विशाखापट्टणम : रोहित शर्मा आणि विराट कोहली या तारांकित खेळाडूंचे संघातील महत्त्व अनन्यसाधारणच आहे. मात्र या मालिकेत युवा खेळाडूंनी जबाबदारी घेत ज्याप्रकारे कामगिरी केली, त्याचा मला अधिक आनंद आहे. त्यांना या विजयाचे श्रेय देणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने व्यक्त केली.
गंभीरच्या मार्गदर्शनात आणि के. एल. राहुलच्या नेतृत्वात भारताने शनिवारी झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा ९ गडी व ६१ चेंडू राखून धुव्वा उडवला. आफ्रिकेला २७० धावांत गुंडाळल्यावर भारताने अवघ्या ३९.५ षटकांत विजयी लक्ष्य गाठले. मुंबईकर यशस्वी जैस्वालचे (१२१ चेंडूंत नाबाद ११६ धावा) शानदार शतक आणि रोहित (७५), विराट (नाबाद ६५) यांच्या अर्धशतकांमुळे भारताने सहज विजय नोंदवला. गोलंदाजीत फिरकीपटू कुलदीप यादव व प्रसिध कृष्णा यांनी प्रत्येकी ४ बळी घेत छाप पाडली. त्यामुळे भारताने एकदिवसीय मालिकेत २-१ असे यश संपादन केले. यशस्वी सामनावीर, तर ३ सामन्यांत २ शतक व १ अर्धशतकासह सर्वाधिक ३०२ धावा फटकावणारा विराट मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
या विजयानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत गंभीरने संघाच्या कामगिरीवर स्पष्ट भाष्य केले. “रोहित आणि विराट हे उच्च दर्जाचे खेळाडू आहेत. त्यांनी त्यांचे काम चोखपणे पार पाडले. त्यांचा अनुभव संघातील युवा खेळाडूंसाठी मैदानावर तसेच ड्रेसिंग रूमममध्येही प्रेरणादायी ठरत आहे. यापुढेही दोघे अशीच कामगिरी करत राहतील, याची आशा आहे,” असे गंभीर म्हणाला.
एकीकडे विराट मालिकावीर झालेला असतानाच रोहितनेसुद्धा या मालिकेत २ अर्धशतकांसह १४७ धावा केल्या. शुभमन गिल, श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या हे खेळाडू विविध दुखापतींच्या कारणास्तव संघाचा भाग नसताना विराट-रोहितने सूत्रे स्वत:च्या खांद्यावर घेतली. दुसऱ्या सामन्यात ऋतुराज गायकवाड, तर तिसऱ्या लढतीत यशस्वी या युवकांनी शतके झळकावून उत्तम साथ दिली. याकडे मग गंभीरने लक्ष वेधले.
“आफ्रिकेचा संघ हा पूर्ण तयारीसह आला होता. त्यामुळे काही प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत युवा खेळाडूंनी जबाबदारी समर्थपणे पेलली. गोलंदाजीतही जसप्रीत बुमरा व मोहम्मद सिराज यांच्या अनुपस्थितीत हर्षित, अर्शदीप, प्रसिध यांच्या वेगवान त्रिकुटाने चमक दाखवली. या तिघांनाही फारसा एकदिवसीय सामन्यांचा अनुभव नाही. फलंदाजीतही रोहित-विराटसह युवा खेळाडूंनी मोर्चा सांभाळला,” असेही गंभीरने नमूद केले. तसेच आठव्या क्रमांकावर हर्षितला यापुढेही संधी देण्यात येईल, याचे गंभीरने संकेत दिले.
दरम्यान, सध्या आफ्रिकेचा संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. त्यांनी कसोटी मालिकेत भारताला २-० अशी धूळ चारली होती, तर आता एकदिवसीय मालिकेत भारताने बाजी मारली. या मालिकेच्या निमित्ताने पुन्हा एकदा ३८ वर्षीय रोहित व ३७ वर्षीय विराट यांना खेळताना पाहण्याची संधी चाहत्यांना मिळाली. गिल व श्रेयस हे नियमित कर्णधार व उपकर्णधार विविध दुखापतीमुळे एकदिवसीय मालिकेला मुकल्याने राहुलवर नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.
उभय संघांतील पहिल्या एकदिवसीय लढतीत भारताने आफ्रिकेवर १७ धावांनी सरशी साधली होती. विराटचे ५२वे शतक आणि रोहितच्या अर्धशतकाच्या बळावर भारताने दिलेल्या ३५० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आफ्रिकेने कडवी झुंज दिली. मात्र ४९.२ षटकांत त्यांचा संघ ३३२ धावांत गारद झाला. मग दुसऱ्या लढतीतही विराटने शतक साकारले. त्याला ऋतुराजच्या शतकाचीही साथ लाभली. मात्र ३५८ धावांचा डोंगर उभारूनही भारतीय गोलंदाजांना बचाव करता आला नाही. तिसऱ्या लढतीत मात्र भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी घेतली. परिणामी भारताने गोलंदाजी, फलंदाजी व क्षेत्ररक्षण या तिन्ही विभागात सुधारणा केली व मालिकेवर कब्जा केला.
आता ९ डिसेंबरपासून उभय संघांत पाच सामन्यांची टी-२० मालिका सुरू होईल. सूर्यकुमार यादव भारताचे नेतृत्व करण्यास सज्ज असून गिलचेसुद्धा या मालिकेद्वारे पुनरागमन होईल. त्यामुळे आगामी टी-२० विश्वचषकाच्या निमित्ताने आता या मालिकेतील भारताच्या कामगिरीवर चाहत्यांचे लक्ष असेल.
आता जानेवारीत रोहित-विराट एकत्रित
न्यूझीलंडचा संघ पुढील महिन्यात भारत दौऱ्यावर येणार आहे. यामध्ये ३ एकदिवसीय व ५ टी-२० सामन्यांचा समावेश असेल. ११ जानेवारी रोजी एकदिवसीय मालिकेद्वारे या दौऱ्याला प्रारंभ होईल. त्यामुळे आता चाहत्यांना रोहित-विराटला भारताकडून एकत्रित खेळताना पाहण्यासाठी महिनाभर प्रतीक्षा करावी लागणार आहे. विशेष म्हणजे गेल्या दोन एकदिवसीय मालिकांमध्ये अनुक्रमे रोहित (ऑस्ट्रेलियाविरुद्ध) आणि विराटच (आफ्रिकाविरुद्ध) मालिकावीर पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. यावरून या दोन्ही खेळाडूंचे महत्त्व अधोरेखित होते. २४ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या विजय हजारे करंडक एकदिवसीय स्पर्धेत रोहित मुंबईकडून, तर विराट दिल्लीकडून खेळताना दिसेल. रोहित सध्या सुरू असलेल्या मुश्ताक अली टी-२० स्पर्धेतही बाद फेरीच्या सामन्यांसाठी मुंबईकडून खेळण्यास उत्सुक असल्याचे समजते. मात्र विराट थेट विजय हजारे स्पर्धेतच खेळताना दिसेल.
आयपीएलमधील संघमालकावर गंभीरचा निशाणा
पत्रकार परिषदेत गंभीरने आयपीएलमधील दिल्ली कॅपिटल्स संघाचे सहमालक पार्थ जिंदाल यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका गमावल्यानंतर जिंदाल यांनी भारतीय संघावर कडाडून टीका करतानाच कसोटी संघासाठी वेगळा प्रशिक्षक नेमण्याची विनंती बीसीसीआयला केली होती. त्यावर गंभीर म्हणाला की, “कसोटी मालिकेत निकाल आमच्या बाजूने लागला नाही. त्यावेळी अनेकांनी टीका करणे स्वाभाविक होते. मात्र यामध्ये काही असेही जण होते, ज्यांनी स्वत: कधी हातात बॅटसुद्धा पकडली नसेल. त्यांनी देखील प्रशिक्षक बदलण्याविषयी सुचवले. अशा व्यक्तींनी आपापल्या कामाकडे लक्ष दिले, तर अधिक योग्य ठरेल. भारतीय क्रिकेटमध्ये काय करावे व करू नये, हे सांगण्याचा त्यांना अधिकार नाही.” त्यामुळे गंभीरने नाव न घेता टीकाकारांसह अनेकांना प्रत्युत्तर दिले.