क्रीडा

जेतसनमुळे ग्लोरियस क्रिकेट क्लबचा थरारक विजय; प्रकाश पुराणिक स्मृती करंडक महिलांच्या टी-२० स्पर्धेला राज ठाकरेंच्या उपस्थितीत शानदार प्रारंभ

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत या स्पर्धेला दणक्यात प्रारंभ झाला.

Swapnil S

मुंबई : अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या थरारक सामन्यात जेतसन ची हिच्या नाबाद २९ धावांच्या बळावर ग्लोरियस क्रिकेट क्लबने प्रकाश पुराणिक स्मृती करंडक महिलांच्या टी-२० क्रिकेट स्पर्धेत दमदार विजय नोंदवला. त्यांनी पय्याडे स्पोर्ट्स क्लबचा ६ गडी राखून पराभव केला. त्याशिवाय दिलीप वेंगसरकर फाऊंडेशन, राजावाडी क्रिकेट क्लब यांनीही आगेकूच केली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत या स्पर्धेला दणक्यात प्रारंभ झाला.

माहीम ज्युवेनाईल स्पोर्ट्स क्लब आणि शिवाजी पार्क जिमखान्याच्या जडणघडणीत सिंहाचा वाटा असलेल्या क्रिकेटपटू प्रकाश पुराणिक यांच्या कर्तृत्वाला मानाचा मुजरा करण्यासाठी दोन्ही संस्थांनी एकत्र येऊन सुरू केलेल्या या स्पर्धेचे हे दुसरे पर्व आहे. १६ संघांचा समावेश असलेली ही स्पर्धा २३ फेब्रुवारीपर्यंत रंगणार आहे. राज ठाकरे यांच्याव्यतिरिक्त मुंबई क्रिकेट संघटनेचे सचिव अजिंक्य नाईक, अॅपेक्स कमिटीचे दीपक पाटील, अभय हडप, नीलेश भोसले तसेच आयोजक माहीम ज्युवेनाईल आणि शिवाजी पार्क जिमखान्याचे विजय येवलेकर, सुनील पाटील, राजन गुप्ता, विकास खानोलकर, महेश शेट्ये, संजीव खानोलकर, सुनील रामचंद्रन, सुशांत मांजरेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

पय्याडे क्लबने २० षटकांत ५ बाद ११५ धावा केल्या. जिया मांद्रवाडकरने नाबाद ५४ धावा फटकावल्या. मग जेतसनने रिद्धी सिंगसह चौथ्या विकेटसाठी ४१ धावांची भागीदारी रचली. अखेरच्या षटकात ७ धावांची आवश्यकता असताना जेतसननेच संघाला विजय रेषा ओलांडून दिली. त्यामुळे तिला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. इरा जाधवने ३४ धावांचे योगदान दिले.

उद्घाटनीय लढतीत राजावाडी क्लबने दहिसर स्पोर्ट्स क्लबचा ९० धावांनी धुव्वा उडवला. प्रथम फलंदाजी करताना राजावाडी संघाने क्षमा पाटेकरच्या ३७ चेंडूंतील ५८ धावांमुळे ६ बाद १४६ धावा केल्या. मग मानसी बोडके व वृषाली भगत यांनी प्रत्येकी दोन बळी पटकावून दहिसरला ५६ धावांतच गुंडाळले. वेंगसरकर फाऊंडेशनने २० षटकांत ३ बाद १४९ धावा केल्या. श्वेता कलपतीने ५३ धावा केल्या. मग त्यांनी स्पोर्टिंग युनियन क्लबला ९ बाद ९७ धावांत रोखले. समृद्धी राऊळने ३, तर लकिशा लब्धे व प्राप्ती निब्दे यांनी दोन बळी मिळवले.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी