नवी दिल्ली : फलंदाज म्हणून शुभमन गिलने प्रभावी कामगिरी केली आहे. तसेच कर्णधार म्हणूनही या युवा खेळाडूने चांगले संकेत दिले आहेत. परंतु इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत भारतीय संघ १-२ ने पिछाडीवर असून गिलच्या नेतृत्वाची खरी परीक्षा आता सुरू झाली आहे, असे ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार ग्रेग चॅपेल म्हणाले.
लॉर्ड्स कसोटी भारताने २२ धावांनी गमावली असून इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत भारतीय संघ १-२ ने पिछाडीवर आहे. अँडरसन -तेंडुलकर ट्रॉफी मालिकेतील चौथा कसोटी सामना २३ जुलैपासून मँचेस्टर येथे सुरू होणार आहे.
भारतीय संघ मालिकेतील शेवटच्या दोन कसोटी सामन्यांसाठी तयारी करत आहे. २५ वर्षीय कर्णधार शुभमन गिलकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. फलंदाज म्हणून गिलने मालिकेतील तीन कसोटी सामन्यांमध्ये शानदार कामगिरी केली आहे. तसेच कर्णधार म्हणून या २५ वर्षीय खेळाडूने त्याच्यातील नेतृत्वाचे संकेत दिले आहेत. मात्र ही वेळ त्याच्यातल्या नेतृत्व कौशल्याची परीक्षा घेणारी असल्याचे चॅपेल म्हणाले.
इंग्लंडमध्ये खेळणे हे सोपे काम नाही. मात्र याच संधीचा फायदा गिलला घ्यायचा आहे, असे चॅपेल यांना वाटते.
चॅपेल म्हणाले की, गिलने संघासाठी आदर्श निर्माण करायला हवा. त्यासाठी संघात शिस्त आवश्यक आहे.
सर्वोत्कृष्ट संघ हा क्षेत्ररक्षणात देखील उत्कृष्ट असतो. तो सहज धावा देत नाही, संधी गमावत नाही, असे चॅपेल म्हणाले.
कोणत्या खेळाडूवर विश्वास ठेवावा हे कर्णधार आणि निवड समितीने मिळून ठरवावे. त्यामुळे खेळाडूंची निवड महत्त्वाची आहे. सामन्याची योजनाही महत्त्वाची आहे. येथे गोंधळास वाव नाही, असे चॅपेल म्हणाले.
जर गिलला महान कसोटी कर्णधार बनायचे असेल, तर हीच वेळ आहे. त्याने नेतृत्वात ठसा उमटवला पाहिजे. केवळ बॅटने नव्हे, तर निर्णायक कृतीने त्याने त्याच्यातील नेतृत्व गुण दाखवण्याची आवश्यकता आहे. खेळाडूंवर विश्वास ठेवा, प्रत्येक खेळाडूला जबाबदारी द्या आणि त्यानुसार अपेक्षा ठेवा, असा सल्ला चॅपेल यांनी गिलला दिला.
महान कर्णधार हा उत्तम संवादक
चॅपेल यांच्या मते, महान कर्णधार हा उत्तम संवादक असतो. गिलनेही ते कौशल्य आत्मसात करणे गरजेचे आहे. सराव सत्र, सामन्यादरम्यान स्पष्ट संवाद आवश्यक असतो. त्याची फक्त बॅट बोलू शकत नाही. नेतृत्व करताना संवादातून विश्वास निर्माण करणे आवश्यक आहे, असे चॅपेल यांना वाटते.